तू इथून चालता हो..! वाळुतस्करांना पाठीशी घालत तहसिल भडकले.! तक्रारदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धमक्या.!

प्रशासकीय वरदहस्त..!

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                    संगमनेर तालुक्यात गेली काही वर्षांपासून "वाळु तस्करांनी उच्छाद" माजविला आहे. त्यावर अंकुश बसविण्याची जबाबदारी असणारे  महसूल पर्यावरणाचे व गौणखनिजाचे "रक्षक" नाही. तर, "भक्षक" झाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे, वाळु "तस्कर सुसाट" सुटले असून प्रशासन त्यांच्याकडे "डोळेझाक" करताना दिसत आहे. प्रशासन मात्र "झोपेचे सोंग" घेऊन बसले आहे. असेच काहीसे चित्र संगमनेर तालुक्यात पाहायला मिळत आहे.  यात "शोकांतीका" अशी की, जे प्रशासनाला वाळुतस्करीची माहिती देतात किंवा निसर्गाचे संवर्धन करु पाहतात, त्यांनाच अधिकारी अपशब्द वापरुन तहसिल कार्यालयातून चालते व्हा.! अशी वागणूक देतात. त्यामुळे, ज्या जनतेने प्रचंड मताधीक्याने आ.  बाळासाहेब थोरात यांना निवडून दिले. तेच  महसुल मंत्री झाले असून आता तरी ही वाळू तस्करी थांबेल का ? आणि जनतेला न्याय मिळेल का ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

बेदखल....तक्रार.!


     या संदर्भात एक धक्कादायक घटना अशी की, दि.५ डिसेंबर २०१९ रोजी संगमनेर तालुक्यातील  नंदुरखंदरमाळ-मोरेवडी  परिसरात माती मिश्रीत वाळुचा लिलाव झाला होता. अद्याप त्याची काही प्रक्रिया सुुरुच आहे. परंतु, खळबळजनक माहिती अशी. की, ज्या ठिकाणी लिलावाची जागा आहे. तेथे  कुठल्याही प्रकारची वाळु नाही. तरी देखील गोरख धंद्यांना वाव देण्यासाठी येथे लिलाव करण्यात आला आहे. वास्तवात नसणाऱ्या गोष्टी वास्तववादी असल्याचे भासवून तहसीलदारांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हा लिलाव केल्या असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश आहेर यांनी केला आहे. स्थानिक ठिकाणी प्रशासन आणि वाळुतस्कर यांनी खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ठेवल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण, वाळुलिलाव माती मिश्रीतचा असून वाळुउपसा मात्र नदीपात्रातुन होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. वाळुलिलावाच्या नावाखाली दहा ते बारा वाहने अवैधरित्या सुरू आहेत. यामध्ये शासनाचा लाखोंचा महसुल बुडत असल्याने आहेर यांनी लिलावाची प्रत तहसील कार्यालयातुन मागितली असता त्यांना तहसिलदारांकडुन उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. इतकेच काय.! कार्यालयातील कर्मचारी व साहेबांकडून देखील अपमानास्पद वागणूक मिळाली.

तूू येथून चालता हो..!!


गणेश आहेर यांना वाळुमाफिया व काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनकडुन धमकावण्यात आले आहे. आहेर यांच्या जिवीतास वाळुतस्करांकडून धोका असून त्यांना प्रशासनाचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे, आहेर यांनी पोलीस अधिक्षक व पोलीस महानिरिक्षक नाशिक यांना पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले आहे. हे जिवावर घेण्याचे दु:ख इतकेच की, निसर्गाची हानी होत आहे. संगमनेरात पठार भाग परिसरात भुकंपाचे धक्के वाढू लागले आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पैशासाठी जमिनीची आब्रु वेशीवर टांगली जाऊ लागली आहे. त्याहुन महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांना कायद्याचे रक्षण करायला शासनाने महसुल अधिकारी म्हणून निवडले. तेच शासनाला व महसुलचे लुटारु असल्याचे दिसत आहे. त्याहुन महत्वाचे म्हणजे, सत्तेचा गैरवापर करुन काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य जनतेवर धावून जाऊ लागले असून वाळुसाठी ते जीव घेण्याच्या भाषा करु लागले आहेत. त्यांना हे बळ कोणी दिले ? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. संगमनेर तालुक्यात महसुलकडून गौणखनिज साठ्याची तीन तेरा नऊ बारा झाले आहे.

   

संगमनेर की  बिहार.!!

     
  एकंदर विचार करता संगमनेरात दिवसा ढवळ्या वाळुची तस्करी होऊ लागली आहे. प्रांताधिकारी, तहसिल, डेप्युटी, पोलीस निरिक्षक, शहर, ग्रामीण, आश्वी व घारगाव असे पाच पोलीस कार्यालये, दोन महसुल तर याच ठिकाणी राज्याचा महसुल मंत्री.! हा विषय किती शोकांतीकेचा आहे. संगमनेर हा जिल्हा व्हावा अशी मागणी जोर धरत असताना. येथे भर दिवसा प्रवरेची   आब्रु लुटली जात आहे,   वाळू तस्करी, गलिच्छ कचरा, सांडपाणी, रक्तमिश्रीत पाणी आणि याही पलिकडे वाढती गुन्हेगारी.  त्यामुळे, संगमनेर जिल्हा करुन तालुक्याचा बिहार करायचा आहे का ? की, वर्ग २ च्या जमिनी ठराविक झेडपी सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांच्या घशात घालून संगमनेर येथे "एकाच कुटूंबाचे साम्राज्य" ऊभे करून राजेशाही आणायची आहे का. ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

  - सुशांत पावसे

=============

                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख २ हजार वाचक)