ईश्वराने सोडली भाजपची साथ.! भाजपची मक्तेदारी चव्हाट्यावर.!

           
अकोले (प्रतिनिधी) :- 
               "मी" पुन्हा येईल, "मी" पुन्हा येईल हे फडणवीस साहेबांचे वाक्य जनतेच्या "जिव्हारी" लागले आणि १०५ चा आकडा असून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. अर्थात एका नेत्याच्या "मी" जागा झाला आणि राष्ट्रीय पक्षाला फार मोठा फटका बसला. त्याचे विष झारखंडपर्यंत जाऊन पोहचले. त्यामुळे, देशात चार राज्यात भाजपला सत्ता गमवावी लागली. उद्या एक-एक मिळून ३१ राज्यातील सत्ता जाऊन केंद्रात देखील विरोधात बसावे लागले. तर, वाईट वाटू देऊ नका. त्यामुळे, ईश्वर भाजपवर कोपला आहे की काय ! असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. अर्थात राज्यात आणि देशात काय झाले माहित नाही. पण, अकोले तालुक्यात तरी भाजपचा अंतर्गत वाद विकोप्याला गेला आणि त्याचा कोप माजी आमदर पिचड यांना सहन करावा लागला. आता साहेबांचे निकटवर्ती पांडे यांनी त्यांची साथ सोडली आणि त्या पाठोपाठ ईश्वर वाकचौरे यांनी देखील भाजपची साथ सोडली आहे. हे सर्व राष्ट्रवादीच्या प्रवाहात जाणार आहेत.
     अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला आणि तालुक्यातील सगळी राजकीय परिस्थिती बदलून गेली. राज्यकर्त्यांना काही घेणेदेणे नाही.! पण, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांची सर्वात मोठी गोची झाली. यात प्रस्तापित नेते यांचे काही नुकसान झाले नाही. उलट उमेदवारांकडून गडगंज माल जमा करण्यात त्यांना यश आले. येथे म्हातारी मेली आणि काळही सोकावल. तर संधीसाधू नेत्यांना त्याचे काही घेणेदेणे नाही. अर्थातच पिचड साहेब पडले आणि पैसाही खर्च झाला. तरी संधीसाधुंना "सोईरसुतक" नाही. उलट साहेबांच्या जवळ जाऊन नेत्यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी तोडले. त्याचा परिणाम काय झाला. हे आपण पाहिले. त्यातील एक कार्यकर्ता म्हणजे ईश्वर वाकचौरे होय.! वाकचौरे यांनी भाजपचे संघटन बांधताना फार डेडीकेशन दिले आहे. तालुक्यात कोणी भाजपत यायला तयार नसताना त्यांनी युवकांचे संघटन बांधले. पण, जशी राज्यात सत्ता आली. तसे तालुक्यात काही निवडक पुढाऱ्यांनी भाजपची सुत्रे हाती घेतली. त्यानंतर कार्यकर्ते म्हणून हे वाकचौरे मागे राहिले आणि भलत्याच वाकचौऱ्यांनी भाजपवर मक्तेदारी करु पाहिली.

एक एक कार्यकर्ता महत्वाचा.!

        जेव्हा वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्या आसपास सामान्य पदाधिकारी जाऊ नये. त्यासाठी प्रस्तापित पुढाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. अशा परिस्थितीत ईश्वर वाकचौरे पिचड साहेबांना भेटू पाहिले. तेव्हा, आम्हाला न विचारता तुम्ही अर्थपुर्ण तडजोडी करु पाहतात की काय ? असा त्यांच्यावर आरोप झाला. हे वाक्य त्यांच्या मनाला प्रचंड वेदना देऊन गेले. तेव्हापासून त्यांच्या मनात ही अस्वस्थता होती. पिचड साहेब भाजपकडून निवडून यावेत यासाठी त्यांनी प्रचंड यातायात करु पाहिली. पण, त्यांना प्रचारादरम्यान भाजपकडूनच वारंवार डावलण्यात आले. या निमित्तेने पिचड साहेबांना एका राष्ट्रवादीच्या तरुणाने पत्र लिहीले होते. साहेब.! तुम्ही आमच्यासाठी आजही तितकेच प्रिय आहे. जितके काल होते. फक्त तुमच्या आवतीभोवती जी पिलावळ आहे. त्यांनी तुमच्या पराभवाचे  षड़यंत्र रचले आहे. ही त्या कार्यकर्त्यांची सल आहे. पण, ती अनेकांचे प्रतिनिधीत्व करते. इश्वर वाकचौरे यांची देखील हिच सल होती. पण, ती अनेक दिवस अदखलपात्र ठरली. वाकचौरे यांना स्वभावत: माननारा मोठा वर्ग आहे. तसेच ते कळसचे उपसरंच होते. त्यांनी जनसामान्यांसाठी चांगले काम केले आहे. त्यांनी पक्ष सोडण्याने भाजपचा चांगलाच मोठा तोटा होणार आहे.!