अकोल्याच्या "राष्ट्रवादी" आमदाराला संगमनेर काँग्रेसचा ठेकेदार "पीए".!


अकोले (प्रतिनिधी) :- 
                  गेली ४० वर्षे पिचड कुटुंबाच्या "जहागिरीचे" "खंडण" करत जनतेने तालुक्यात नवे "आशेचे किरण प्रज्वलित" केले. हे "परिवर्तन" घडवून आणत असताना. अगदी तळागाळातून "बदलाचे वारे" वाहिले गेले. एकीकडे प्रस्तापित धनबलाढ्य पोसलेले बहुजन नेते. तर, दुसरीकडे सगळ्या लंगड्या गायी.! पण, तिनका-तिनका जमा करून त्यांनी अकोल्यात राष्ट्रवादीचे घरटे बांधले. आज ना उद्या आपल्या कष्टाचे चिज होईल, असे म्हणत कोणी पत्रकार, कोणी दुकानदार, कोणी मजूर, कोणी शेतकरी, कष्टकरी आणि अगदी सामान्यातल्या अतिसामान्य व्यक्तींनी घर घालून "आमदारकीचा नाद" केला. पण, यात कोणाच्याही वाट्याला काही आले नाही. आले ते कोणाच्या वाट्याला ? तर ते "ठेकेदारांच्या" वाट्याला. ते ही "कुठले" ठेकेदार. तर ते संगमनेरचे.! का.? आता याचे उत्तर नव्याने सांगायला नको. वा रे उद्धवा.! अजब तुझे सरकार.! ज्या तालुक्यातील "सुशिक्षित तरुणांनी" दिवस रात्र एक करुन "राष्ट्रवादीचा प्रचार" केला. आपले डॉक्टर असे म्हणत नोकरीत सुट्या टाकून राबले. त्या अकोल्यातील मतदान करणारा एकही व्यक्ती तुम्हाला स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून ठेऊ वाटला नाही.! जो संगमनेरचा ठेकेदार योग्य वाटला. हा अट्टाहास कशासाठी ? हेच काम तालुक्यातील एखाद्या हुशार, होतकरु मुलास दिले असते. तर, त्याच्या कुटुंबाचा कणा ताट राहु शकला असता. तुमच्या रुपाने रोजगाराचे पहिले पाऊल पडले असते. पण, उद्याचे "अर्थ"पुर्ण हितसंबंध पाहुन "गाव सोडून आपण वेशिवर गेलात". असे आम्ही नाही.! तर, आपल्याच जवळचे "कार्यकर्ते" आता "कुजबुजू" लागले आहेत. "जनता"  व "व्यक्तीनिष्ठेत बुडालेले" कार्यकर्ते आता आंधळे झालेले आहेत. मात्र, काही जाणकारांनी माध्यमांचा आधार घेत. या "वास्तवावर" प्रकाश टाकण्याची भूमिका घेतली आहे. आता हे कोणाला "पटो ना पटो". पण, रोखठोक मांडणे.! हिच निर्भिड, निष्पक्ष व लाचार नसलेल्या माध्यमांचे काम आहे.!

आमदारासोबत आता पीएचीही विमानवारी.!

                  जेव्हा एखादा "आमदार" विधानसभा किंवा राज्यसभेवर जातो. तेव्हा त्यास वैयक्तीक पगार व भत्त्यांसह १ लाख ८३ हजार ४४० रुपये मिळत असतात. त्यात स्वीय सहाय्यक म्हणून २५ हजार रुपयांची तरतूद असते. अर्थात जनतेच्या माहितीस्तव सांगावेसे वाटते. की, सद्या २८८ + १ विधानसभा आमदार आणि  ७८ विधानपरिषद आमदार यांना मिळून वार्षिक ६६ कोटी रुपये मानधन व भत्त्यापोटी वाटले जातात. या व्यतिरिक्त १ हजार ५७२ माजी आमदार यांना १२५ कोटी रुपये पेन्शन दिली जाते. म्हणजे तब्बल २०० कोटी वार्षिक रक्कम ही "आपल्या म्हणजे जनतेच्या" तिजोरीतून यांच्यासाठी उधळली जाते. हीच रक्कम जर शेतकऱ्यांना द्यायची म्हटलं. तर, यांचा जीव किती खालीवर होतो.! हे आपण पाहिलेच आहे. त्यामुळे, "आपलं ते पोरगं आणि लोकाचं ते कारटं".! हे आपल्या संस्कृतीला काही नवे नाही. 
                कारण, या पीए पदावरुनच बघा ना.! आपण ज्यांना आपले समजतो. ते आपले फक्त आपलाच विचार करु पाहतात. पण, आपल्यांचा विचार कोणी करायलाच तयार नाहीत. आता अकोल्याच्या राष्ट्रवादी आमदारांना संगमनेरच्या काँग्रेसचा कार्यकर्ता पीए झाला आहे. जे महाशय पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे "ठेकादार" आहेत. एक "विश्वसनिय" बाब अशी. की, याच साहेबांनी चक्क सातेवाडीत गटात जिल्हापरिषदेचा "ठेका" घेऊन कामे पुर्णत्वास नेली आहेत. त्यामुळे, एकीकडे "पीए" आणि दुसरीकडे "ठेकेदारी".! त्यांनीच मंजुरीसाठी झटायचं आणि त्यांनीच काम पुर्णत्वासाठी प्रयत्न करायचे. किती छान दुकानदारी चालणार आहे.! कोणाची टक्केवारी कोणाला द्यायला नको आणि त्यात कोणी मध्यस्ती नको. म्हणजे "मालक ते ग्राहक" अशी भाजप सारखी भूमिका येथे पहायला मिळणार आहे. माजी आमदार यांनी जे काही दिले. ते तालुक्यातच वाटले. त्यांच्या अजुबाजूला राहुन "कुपोषित बालके गुबगुबित" झाली. पण, या साहेबांच्या आजुबाजूला जे "टक ढाळून" बसले आहेत. त्यांना हे अद्याप समजले नाही. की "गंगाधर ही शक्तीमान हैं"! ते वाट पहात बसलेत. कधी एखादे "बील मंजूर" होईल आणि आम्ही त्यावर "तुटून पडू".! पण, 'भोळसार' अकोलेकरांनो.!  तुम्ही "घड्याळात" पहात बसाल आणि शेजारचे "पंजा" मारुन निघून जातील.

साहेब..! साहेबांच्या घरी.!

           तुम्ही पीए पदाला शुल्लक व दुर्लक्षित समजून नका. आजचे दिलीपराव वळसे पाटील हे कित्तेक दिवस शरद पवार यांचे पीए होते. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे दोन पीए अभिमन्यु पवार आणि परिणय फुके हे आमदार झाले आहेत. तर, धनंजय मुंडे यांचे पीए मदन जाधव, छगन भुजबळ यांचे पीए संदिप बेडसे, गिरीष महाजन यांचे पीए रामेश्वर कदम, शिरीष चौधरी यांचे पीए संजय सावकारे यांनी आमदारकीच्या तिकीटाची मजल मारली होती. त्यामुळे, आता आदिवासी चेहरा पुढे करण्यापेक्षा हे राजकारणी कोणाचा कधी "पोपट" करतील. हे सांगता येत नाही. म्हणून तर इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचा कवर बसविण्याचे काम सुरु असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

भाजपचे विचार पटेना.! आम्ही राष्ट्रवादीच.!

           सद्या अकोल्यात "संगमनेर पॅटर्न" शिरकाव करत आहे. रस्ते, वाळू, ईमारती, घरे असे अनेक बांधकामांचे ठेके एकाच व्यक्तीला मिळत राहिल. एकच व्यक्ती "धनबलाढ्य" होत जाईल आणि बाकी "चिरीमिरी" घेऊन शांत बसतील. आत्ताच एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. की, भाजपचे काही कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. कमळाच्या हातून सत्ता गेली आणि अनेकांना भाजपचे विचार आता "कडू" वाटू लागले आहे. कमळ चिखलात गुतल्याने अनेकांनी परतीचे मार्ग स्विकारले आहेत. यात बहुतांशी लोक दोन नंबर व्यवसाय करणारे आहे. यांना पक्ष प्रिय नाही.! तर स्वत:चा "गोरख धंदा" जिवंत ठेवायचा आहे. पण, पवार कुटुंबाने व आमदार साहेबांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. की, "पडत्या काळात" ज्या कार्यकर्त्यांनी "शेण" हातात घेऊन "हेलिपॅड" सारविले, डोक्यावर पाणी वाहिले, खिशाला झळ सोसली. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तर, पक्ष, निष्ठा, कट्टर कार्यकर्ता या शब्दांवरचा विश्वास ऊडून जाईल. त्यामुळे, आजही "डॉक्टर साहेबांची क्रेझ" कायम आहे.! त्यांनी तालुक्याच्या तरुणांसाठी "मिळेल तेथे संधी" द्यावी. अशी निष्ठावंत कार्यकर्त्यांची आपेक्षा आहे. बाकी काही झाले. तरी पाच वर्षेतरी तालुक्यातील तरुण पिढी तुमच्या सोबत आहे. अशा भावना तरुणांनी व्यक्त केल्या आहेत.

टिप :- रोखठोक सार्वभौम किणताही विषय मनाने लिहीत नाही. तो राष्ट्रवादी म्हणा किंवा भाजप, शिवसेना म्हणा किंवा रिपाई. यांच्या अंतर्गत कलहातून विषय आमच्यापर्यंत यातात. आम्ही आजवर एकही पेडन्युज केली नाही. किंवा जाहिरात तसेच चाटूगिरी आणि उदोउदो करण्याचा पैसा घेतला नाही. त्यामुळे, आरोप प्रत्यारोप करताना विचारपुर्वक करावा.! शब्दांकन, माहिती संकलन व सोर्स हे आमचे राखिव अधिकार आहे. त्याबाबत कोणी विचारणा करु  नये.
          धन्यवाद..!


 - सागर शिंदे

=============

                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 125 दिवसात 225 लेखांचे 14 लाख 50 हजार वाचक)