"लोकशाही" देशात ठाकरेंची "राजेशाही" चालविण्याचा प्रयत्न !!
अखंड महाराष्ट्राचा मी एकटा राजा |
कोणतीही गोष्ट असो.! तिचा अतिरेख "अवडंबर" अधिक काळ चालला की, तो "रटाळ, कंटाळवाणा, अविश्वासू" आणि महत्वाचे म्हणजे "कृत्रीम" वाटू लागतो. अगदी तसेच राज्याच्या "सत्तानाट्यात" पहायला मिळू लागले आहे. कालपर्यंत सत्ता स्थापन करण्यासाठी नटून बसलेली "महाविकास आघाडी" सात जणांमध्येच "महाराष्ट्राचा कारभार" चालविणार आहेत की काय ! असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. "मुख्यमंत्री" पदासाठी 'उताविळ' झालेल्या शिवसेनाला सत्ता मिळाली आणि मुख्यमंत्री महोदय "उद्धव ठाकरे" विसरुनच गेले की काय ! कि, "मंत्रीमंडळाचा विस्तार" देखील करायचा असतो, "खाते वाटप" देखील करायचे असतात. पण, त्यांनी जो "एकला चलो रे"..! चा नारा धरुन "लोकशाही" राज्यात "राजेशाही" करु पाहिली आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. ३४ दिवसांचे सत्तानाट्यानंतर आता १३ दिवसापासून सुरु असलेला "मंत्रीमंडळ विस्ताराचा खेळ" यामुळे राजकारणावर "अविश्वास आणि लोकशाहीला घातक असे वातावरण तयार होताना दिसत आहे. ठाकरे सरकार मंत्रीमंडळ स्थापन करण्यास असमर्थ ठरत असून ते "पाच वर्षे काय सरकार टिकविणार".! अशी वास्तव टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. तर, दुसरीकडे ज्या शरद पवारांनी इतकी "उठाठेव" करून ४८ दिवसानंतर महाराष्ट्राला प्रेरणा सोडून काहीच दिले नाही. त्यांचे शब्द म्हणजे "प्रमाण" नाही की काय ? असा देखील प्रश्न जाणकारांना पडू लागला आहे. जर हे "नारजनाट्य" असेच चालत राहिले. तर, राज्यात पुन्हा "राजकीय भुकंप" पहायला मिळेल. यात तिळमात्र शंका नाही.
"वेटींग पिरेडवर" राहणे किंवा "राजकीय अस्थिरता" काय असते. हे आत्तापर्यंत शिवसेनेने जो "ज्वलंत अनुभव" घेतला. त्याची "दाहकता" आजवर ना १९९९ ला होती ना २०१४ ला. त्यामुळे, सत्तेच्या कुलपाची चावी पवार साहेबांनी ठाकरे साहेबांच्या हाती दिल्यानंतर ते लगेच कुलूप उघडून आमदारांना आत घेतील, असे वाटले होते. पण, झाले ते वेगळेच.! आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच प्लिझ..! "दार उघड बये"..! असे म्हणण्याची वेळ आली आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी. पण, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडून राज्यात जणू छत्रपती शासन सुरु केले आहे की काय ? असा प्रश्न पडला आहे. "संवैधानिक रित्या" मुख्यमंत्री म्हणून ठाकरे साहेब सत्तारुढ झाले खरे. पण, त्यानंतर सगळ्याच शपथविधी आवश्यक आहे म्हणून औपचारिकता पुर्ण केली. आम्ही मंत्री झालो. पण, कोणत्या खात्याचा.? ते नका विचारु.! आमदार म्हणतात आमचे सरकार आहे.! तुमचा कृषीमंत्री कोण.? प्लिझ ते नका विचारु.! हे अगदी तसेच झाले की.! "मंदिर वही बनाऐंगे, लेकीन तारिख नही बतेऐंगे".! वा रे..! उद्धवा अजब तुझे सरकार.! दोन महिने होत आले. तरी २८८ आमदार सरकार स्थापन करु शकले नाही. ज्यांनी लाखो आणि कोटी खर्च केले. त्यापैकी एकही मुख्यमंत्री पदास पात्र होऊ शकला नाही. जो २८९ वा व्यक्ती झाला तो मंत्रीमंडळ विस्तार करु शकत नाही. किती दुर्दैव आहे या लोकशाहीचे.! त्यापेक्षा भाजप बरी की.! "झट मंगनी, पट ब्याह".! रात्रीतून "दादागिरी" सोबत घेऊन लोकं झोपेतून उठोस्तोवर राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही रातोरात उपलब्ध करून दिले. या उलट भर दिवसा शपथ घेऊन यांना ना उपमुख्यमंत्री निवडता आला ना एखादा मंत्री. यांच्यात हे पद द्यायचे कोणाला हाच १३ दिवसांपासून प्रश्न सुरु आहे. आता "जागरुक" ज्येष्ठ समाजसेवक हजारे साहेबांनी सरकारला धारेवर धरणे सुरु केले आहे. केवळ, ते म्हणतात मालदार खात्यांसाठी जागावाटपाचा तिढा सुटत नाही. आता त्यांच्यावर टिका होईलही तो भाग वेगळा. पण, त्याचे म्हणणे अगदी रास्त आहे.
राजे ......................जाणते |
साहेब.! मंत्रीमंडळाची काही गरज नाही.! |
आता हिवाळी आदिवेशन तेही बीन मंत्र्यांचे.! प्रश्न मांडणार कोण, उत्तर देणार कोण अनेक समस्या आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. जनता हे सर्व डोळे उघडून पाहते आहे. ही अनैसर्गिक युती झाली आहे, सत्तेसाठी व मोठ्या खात्यांसाठी ही ताणाताण सुरु आहे, जनता व शेतकरी यांना तुमची प्रचंड गरज असताना तुमचे स्वार्थी धोरण तुम्हाला येणाऱ्या काळात घातक ठरु नये. हेच महत्वाचे. बाकी, निर्ढावलेल्या सरकारकडून अपेक्षा असणारे शेतकरी आता दोन महिन्यानंतर कामाला लागला आहे. हिच आम जनतेसाठी आनंदाची बातमी आहे.
- सागर शिंदे
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १४ लाख २ हजार वाचक)