"संगमनेरात" कोट्यावधींची "जमीन तस्करी", पुढारी व महसुलने सरकारला लावल्या "शेंड्या".! "गुन्हा नोंदवा" - अमोल खताळ"

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                    गुंजाळवाडी येथील सरकारी फॉरेस्ट जमीन वाटपाने १९६८ साली टी. के कांबळे यांना देण्यात आली होती. त्यानंतर, २०१९ पर्यंत ७/१२ उताऱ्यावर कांबळे यांचे नाव होते. सदर जमीन ही वर्ग -2 ची असून शहराच्या लगत असल्यामुळे या जमिनीला करोडो रुपयांचा बाजारभाव आहे. याचा फायदा घेत  महसूलमधील कागदपत्रात असणाऱ्या काही त्रुटीचा गैरफायदा घेत एका तोतया राजकीय पदाधिकाऱ्याने तलाठी, मंडल अधिकारी, लिपिक, तहसिलदार यांच्या संगनमताने जमीन तस्करी केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या दलालांनी मुक्ताबाई या तोतया महिलेस कांबळे यांचे बनावट वारस दाखवून तब्बल ५० वर्षांनी जमिनीवर दावा केल्याचे भासविले आहे. इतकेच काय ! या जमीन तस्कर पुढाऱ्याने मुक्ताबाईला संगमनेर तहसिलदार यांचेकडे महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार, उताऱ्यावरील नावात बदल करण्यासाठी अर्ज देऊन नाव दुरुस्त करण्याचा पराक्रम केला. दुर्दैव इतके की, कोणतीही शाहनिशा न करता प्रशासन उदार झाले व  उताऱ्यावरील नाव दुरुस्त देखील करून दिले. यात, विशेष म्हणजे ज्या मुक्ताबाईने प्रशासनाला शेंडी लावून कांबळे हे माझे वडील आहेत. असा अर्ज व प्रतिज्ञापत्र करून दिले. त्यामध्ये माझे वडील यांना फॉरेस्ट खात्याकडून जमीन बक्षीस मिळाली तसेच ते स्वातंत्र्यसैनिक असून नजरचुकीने त्यांचे नाव टि के कांबळे असे झाले असा अर्ज दिला.

"अनमोल" .....तक्रार.!!

          यदाकदाचित काही वेळेपुरते टी. बी कांबळे असे नाव गृहीत धरले तरी त्यांनी सहा. जिल्हाधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांच्यासमोर २६ नोव्हेंबर १९७१ रोजी दिलेल्या जबाबात मी हिंदू-कोष्टी जातीचा असून विणकाम करत आहे. तसेच मी एकटाच असून मला कोणीही वारस नाही असा लेखी जबाब दिलेला आहे. मुक्ताबाई यांचा शालेय दाखला मिळविला असता त्यामध्ये त्या हिंदू-साळी जातीच्या आहे असे दिसते. हिंदू कोष्टी व हिंदू साळी या दोन वेगवेगळ्या जाती असताना या कडे महसुल अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंधासाठी दुर्लक्ष केलेलं सिद्ध होते. १९६८ पासून ७/१२ उतारा असलेल्या कांबळे यांची जात हिंदू-कोष्टी आहे. तसेच मुक्ताबाई अर्जात म्हणतात माझे वडील स्वातंत्र्यसैनिक आहेत परंतु तहसिल कार्यालय संगमनेर यांनी दिलेल्या संगमनेर येथील स्वातंत्र्यसैनिक यादी मध्ये कांबळे या आडनावाचे कोणीही स्वातंत्र्यसैनिक नाही. फॉरेस्ट वाटप होताना ही जमीन १९६८ साली टी. के कांबळे यांना मिळाली होती, याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी दि. ९ नोव्हेंबर १९७१ रोजी नोटीस पाठून २६ नोव्हेंबर १९७१ पर्यंत जमीन वाटप संदर्भात उपस्थित राहणेबाबत कळविले होते. त्याप्रसंगी त्यांचा जबाब तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी, संगमनेर यांनी घेतला असता १९७१ साली कांबळे यांची नावानिशी सही आहे. त्या जबाबामध्ये त्यांनी मी ६० वर्षाचा असून मला वाटप झालेली जमीन ही मोघम मिळालेली असून, मी जमीन पाहिलेली आहे, जमीन ताबा नाही, मी एकटाच आहे, मी कोष्टी जातीचा आहे असा जबाब दिलेला आहे.

होय.!आम्ही पुढारी लुटारुच.!

         तरी देखील महसूल व राजकीय पदाधिकारी यांच्या "अर्थ"पुर्ण तडजोडीमुळे करोडो रुपयाची सरकारी जमीन बळकाविण्याचा प्रयत्न राजकीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तहसील कार्यालयात याप्रकरणी वारंवार फाईलची मागणी केली असता ती उपलब्ध होत नव्हती. कधी निवडणुकीचे कारण तर कधी तलाठी, कधी मंडलअधिकारी तर कधी लिपीक यांच्याकडे फाईल आहे असून सांगून टाळाटाळ केली जात होती. परंतु, माहिती अधिकारात या प्रकरणाची कागदपत्रे मागितली असता हा सर्व "धक्कादायक" प्रकार समोर आला आहे. यामध्ये मा.तहसिलदार निकम साहेब यांनी नाव दुरुस्ती आदेश काढताना शासकीय प्रतिलिपीचा वापर न करता राजकीय पदाधिकारी यांनी स्वत: बनवून दिलेल्या आदेशावर कुठलीही शहानिशा न करता "अर्थ"पुर्ण तडजोडीसाठी सही केली. तसेच, आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केला आहे.

येथे नजरचुकीने बनावट कामे देखील करुन मिळतील !!


    ज्या आदेशामध्ये शब्दरचना व्यवस्थित नाही अश्या साध्या कागदावर बनविलेल्या आदेशावर सही करण्याची तहसिलदार यांनी एवढी घाई का केली ? कामगार तलाठी तोरणे यांचा २६ जून २०१९ रोजीचा तहसिलदार यांना दिलेला अहवाल बघितला असता ते २६ नोव्हेंबर १९७१ नुसार टी. के कांबळे आणि टी. बी. कांबळे हे एकच आहे असे म्हणतात हे काही काळ ग्राह्य धरले तरी त्यामधील इतर महत्वाच्या मुद्द्याकडे तलाठी तोरणे यांनी दुर्लक्ष का केले.? फक्त एका प्रतिज्ञा पत्रावर कोणीही कोणाचे वारस होऊ शकतात का.? कोष्टी व साळी या विभिन्न जाती असताना वारस एक कसा होऊ शकतो.? असे अनेक प्रश्न खताळ यांनी उपस्थित केले आहेत.

..त्या सहा जणांना बेड्या ठोका.!

          तर, वरील प्रकरणी तलाठी तोरणे, मंडल अधिकारी दातखिळे, लिपिक वाघ, तहसिलदार निकम साहेब यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर करून लाखो रुपये घेऊन भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर निलंबन करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई न झाल्यास वेळप्रसंगी कोर्टात जाऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करेल असे खताळ यांनी म्हटले आहे.

- सागर शिंदे
- सुशांत पावसे

=============

                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                  -------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १०० दिवसात २०७ लेखांचे १२ लाख ९५ हजार वाचक)