अकोले (प्रतिनिधी) :-
मधुकर पिचड यांनी भाजपत प्रवेश केला आणि सगळी चित्रच बदलून गेली. राष्ट्रवादीचे कट्टर समर्थकांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटले आणि विरोधक म्हणून डॉ. किरण लहामटे यांना आखाड्यात लोटले. आता "झेडपीची" निवडणूक आणि "विधानसभेची" निवडणूक या "अनुभवात" कोठे ताळमेळ बसणार !! त्यामुळे लहामटे यांची मोठी "त्री-धा, तिरपिट" होताना दिसत आहे. "आर्थिक" गरिबीपासून तर प्रचार यंत्रणेपर्यंत त्यांच्या समस्या चव्हाट्यावर येऊ लागल्या आहेत. "बुथ यंत्रणेपासून तर "नाराजांचे सुथ" जुळविण्यापर्यंत कोणतेच नियोजन दिसून येत नाही. एक गोष्ट जनतेला प्रकर्षाने वाटू लागली आहे. की राष्ट्रवादीला साथ द्यायची आहे. मात्र, हा उमेदवार गावा-गावापर्यंत पोहचायला तयार नाही. अर्थात लोकांना कोण किरण लहामटे हे माहित नाही. मात्र, वैभव पिचड पाडायचेच आहे. यावर जनता ठाम आहे. असे असले तरी काहीशी सुप्तलाट आणि उघड-उघड होणारा होणारा प्रस्तापितांना विरोध ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. तरी देखील डॉ. लहामटे सगळ्या यंत्रणेत कमी पडत असल्याचे दिसते आहे. जर या ठिकाणी अशोक भांगरे असते. तर, अशा लाटेत त्यांनी राज्यात एक नंबरचे लिड घेतले असते. असे बोलले जात आहे. मात्र, ही संधी त्यांच्या नशिबी नसली. तरी, विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांनी अजून प्रभावी भुमिका घेण्याची गरज जाणकारांना वाटते आहे.
|
आता तुमच्याच हाती..!!
|
अशोक भांगरे यांनी आजवर पिचड घराण्याचा विरोध जिवंत ठेवला आहे. त्यानी मोठ्या मनाने लहामटे यांना सपोर्ट करून स्वत:वर लगलेल्या आरोपांचे फलन केले आहे. मात्र, ते ज्या पद्धतीने बुथ नियोजन, प्रचार यंत्रणा, गाड्या, कार्यकर्ते, सामाजिक सलोखा, नाराजांची मनधरणी, खर्चाचे नियोजन, सभांचा आराखडा, प्रवासाची रचना, गावोगावचे कट्टर समर्थक, परवानग्यांचे नियोजन करत होते. ती यंत्रणा कोठेच दिसायला तयार नाही. मग, डॉक्टरांकडून त्यांची मनधरणी किंवा सन्मान कमी होतोय की काय ? असा प्रश्न समोर येऊ लागला आहे. वास्तव पाहता. जोवर अशोक भांगरे यांच्यातील दानशुर कार्यसम्राट कर्ण जागा होत नाही. तोवर लहामटे यांच्या कुरुक्षेत्राला युद्धभुमीचे स्वरुप येत नाही. हे देखील तितकेच खरे आहे. कारण, नुकतेच जनतेच्या मनातील "राजा" होऊन चालत नाही. तर, निर्मळ भावनेने रणमैदानी लढणारे कर्ण देखील सोबत असल्याशिवाय युद्ध जिंकता येत नाही. हे इतिहास सांगून गेला आहे. त्यामुळे जोवर भांगरेंच्या सक्रिय राजकारणाला अधिक गती मिळत नाही. तोवर डॉक्टरांचे पिचड आॅपरेशन सक्सेस होऊ शकत नाही. यावर राजकीय विश्लेषक ठाम आहेत.
|
उग आव आणला, मी असतो तर..!
|
डॉ. लहामटे यांनी नेहमी एकला चलो रे..! चा नारा दिला आहे. सुरूवातीपासून ते एकटे फिरत राहिले. इथले सीपीआय, सीपीएम, रिपाई त्यांच्या निरोपाची वाट पाहत होते. मात्र, मी म्हणजे सर्व काही. अशीच पाऊले पडल्याने लोक नाराज होेते. हे खुद्द काॅम्रेड शांताराम वाळुंज यांनी बोलून दाखविले आहे. तर सतीश भांगरे यांनी पिचडांच्या विरोधात सर्वात पहिली भूमिका घेतली. तन-मन-धनाने ते लहामटे यांना समर्पित व्हायला तयार होते. मात्र, लहामटे यांनी भांगरे यांना साधा फोन देखील केला नाही. त्यांना सोबत घेऊन बळ देण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर त्यांच्या एकला चलो रे च्या भुमिकेला नाराज होऊन भांगरे पुण्याला निघून गेले. अशी चर्चा सुरू आहे. जर, सतिश भांगरे यांना तिकीट मिळाले असते. तर, त्यांच्याकडे सर्व यंत्रणा रेडी होती. ती जैसे थी लहामटे यांना वापरता आली असती. मात्र, ते म्हणाले माझी मुंबईहुन येणारी यंत्रणा ताईट आहे. पण, वास्तवात अजूनही चार-दोन भोंग्यांच्या गाड्या वगळता. त्यांचा प्रचार फक्त जनतेतून होताना दिसू लागला आहे. लहामटे यांनी मधुकर तळपाडे यांना विनंती करून साद घातली असती. तर, ते देखील सोबत आले असते, या पलिकडे रिपाईतून फुटलेले शांताराम संगारे हे देखील त्यांच्या विजयासाठी पुरक ठरले असते. मात्र, असा मनधरणीपणा डॉक्टरांना करता आला नाही. असे जाणकारांना वाटते आहे. एकीकडे पिचडांची बुथ बांधणी अगदी पुर्ण झाली आहे. याद्या, नियुक्ती आणि चक्क राष्ट्रवादीच्या गोटीत घुसून आपले कार्यकर्ते बुथवर दिसतील असे नियोजन झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. यात, लहामटे कोठेच दिसायला तयार नाहीत. त्यांनी पहिल्यापासूनच माकडांच्या हाती कोलीतं दिल्याने नियोजन जळून खाक व्हायला लागले होते. मात्र, बारामतीहुन निरोप आला आणि १० जणांचे नियोजन मंडळ तयार करुन त्यांच्याकडे सुत्रे सोपविण्यात आली आहेत. इतकेच काय !! जे सोशल मीडियावर लहामटे, लहामटे बोंबलतात. ते रस्त्यावर उतरायला तयार नाहीत. त्यामुळे, थेट बारामतीहुन अकोल्यात प्रचार पथके दाखल करावी लागली आहे.
|
मला हेच पाहिजे आहे..!!
|
आज जनतेने लहामटेंना राजा बनविले आहे. मात्र, पावनखिंड लढविणारे "बाजीप्रभू" घडविण्यात ते कमी पडत आहे. यात शंका नाही. पिचडांची प्रचार यंत्रणा पाहता, मधुकर पिचड एका दिशेला तर वैभव पिचड दुसऱ्या दिशेला. असे प्रचारमय वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी ठरताना दिसत आहे. मात्र, इकडे सगळे लांडीमागे पुंडी असे म्हणतात. तसेच काहीसे दिसत आहे. जाणकार मंडळींनी जबाबदाऱ्या घेऊन तालुका पिंजून काढणे अपेक्षीत आहेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. खरे पाहता राष्ट्रवादीकडे अद्याप कोणताही अजेंडा नाही. आहे तो फक्त पिचड विरोधक आयडेन्टीटी. त्यामुळे, लहामटे निवडून आले तरी, येरे माझ्या मागल्या, असेच झाले नाही म्हणजे बरे. कारण, नियोजन नाही तेथे यश नाही. हे देखील हवेत असणाऱ्यांनी विसरु नये. असा आवाज जनतेतून येऊ लागला आहे.
|
गुंतागुंतीचे व्यक्तीमत्व
|
गेल्या काही दिवसांपुर्वी डॉ. लहामटे यांनी डॉ. अजित नवले यांची मनधरणी केली. मात्र, मारुती मेंगाळ आणि नवले यांचे मुंगसा-सापासारखे वैर तालुक्याला सर्वश्रृत आहे. "गुरूची विद्या, गुरूवर गुरगुरली" अशी टिका मेंगाळ यांच्यावर झाली. मात्र, तरी मेंगाळ यांनी डॉ. लहामटे यांना साथ दिली. त्यामुळे डॉक्टर व तुळशीराम कातोरे यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. तसेच मदन पथवे हे राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक असल्याचे बोलले जात होते. मात्र, पदाच्या प्रतिष्ठेपोटी त्यांनी निष्ठेवर पाणी फेरल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे मेंगाळ यांच्यामुळे अनेकांची नाराजी वाढली असून त्यांची मनधरणी करण्याकडे राष्ट्रवादीने काना डोळा केल्याचे दिसते आहे.
एकंदरीत विचार करता. जनतेने निवडणुक हाती घेतली आहे. यात शंकाच नाही. मात्र, "पैसा फेको तमाशा देखो" ही म्हण जर तुम्ही एकली नसेल. तर, येणाऱ्या काळात ती अनुभविण्यास मिळेल. जिल्हा परिषद आणि विधानसभा यांची कधीही तुलना होऊ शकत नाही. तो मेळ लहामटे जर घालु पहात असतील. तर, त्यांचा पराजय नक्की आहे. आणि असे झाले तर, वैभव पिचड पुन्हा ४० वर्षे पराभूत होऊच शकत नाही. हे जाणकार शंभर रुपयांच्या स्टँम्पवर लेखी द्यायला तयार आहेत. त्यामुळे जर, आज लहामटे कमी पडले किंवा "अर्थ"पुर्ण बाबीत हात आखडता घेतला. तर, पुढे कितीही मोठे विरोधक येऊ घातले तरी असे वातावरण तयार होऊ शकत नाही. हे सगळ्या विरोधकांनी लक्षात ठेवावे. असे जाणकारांचे मत आहे.
|
...तर हे भावी आमदार
|
त्यामुळे अशोक भांगरे यांना कधी कर्णाची तर कधी श्रीकृष्णाची भुमिका बजवावी लागणार आहे. साम, दाम, दंड, भेद ही भुमिका घेऊन अर्जुनाच्या पाठीशी ऊभे राहने आवश्यक आहे. असे झाले तर, उद्या लहामटे आमदार होतील तर पुढे भांगरे घराण्याचे नाव अमित भांगरे यांच्या रुपाने पुन्हा विधीमंडळात जाऊ शकेल. अन्यथा एकदा जर कमळ फुलले तर ४० वर्षे काय केले ? हेच वाक्य पुढील पिढी ८० वर्षे काय केलं ? हे प्रश्न म्हातारपणात कानावर पडले. तर आश्चर्य वाटू देऊ नका.
-- सागर शिंदे
बातमीच्या शेवटी "टोटल व्हिवर्स लाल पट्टीत दिसतात" जी आकडेवारी आहे ती तुमच्या समोर आहे. पोर्टल बिकाऊ, लाचार व कोणाचे दास नाही.
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७६ दिवसात १५६ लेखांचे ८ लाख ५२ हजार वाचक)