"तत्वाधिष्टीत" राजकारणाच्या "विजयासाठी" निवडणुकीत "निर्णायक हस्तक्षेप" करणार - डॉ. अजित नवले
अकोले (प्रतिनिधी) :-
स्वार्थी सत्ता लालसेपोटी क्षणार्धात स्व पक्षाला व तत्वांना तिलांजली देणाऱ्या प्रवृत्ती समाजाच्या शाश्वत व दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत मारक असतात. अकोल्यात आज सुरू असलेली तमाम पक्षांतरे संधीसाधू तर आहेच शिवाय राजकारणातील तत्वनिष्ठता आणि पावित्र्यही समूळ नष्ट करणारी आहेत. चळवळींचा प्रदीर्घ व समृद्ध वारसा लाभलेल्या अकोले तालुक्यासाठी हा कालखंड अत्यंत जिकिरीचा आहे. अशा परिस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केवळ बघ्याची भूमिका घेऊन शांत बसू शकत नाही. तमाम संधीसाधू प्रवृत्तीचा नाश करून राजकारणाची पुन्हा शुद्धता करण्यासाठी पक्ष आपल्या संपूर्ण ताकतीने या निवडणुकीत हस्तक्षेप करेल असे प्रतिपादन डॉ. अजित नवले यांनी माकपच्या जिल्ह्या मेळाव्यात केले. अकोले येथील पक्ष कार्यालयात तालुक्यातील व जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरविण्यासाठी माकपच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पिचड पिता पुत्रांनी भीती आणि लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील सर्वच प्रमुख नेतेही पिचड यांच्या सोबत भाजपत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसची तालुक्यातील संघटना यामुळे अत्यंत कमजोर झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधक म्हणून आता गावोगाव संघटना असलेला माकप हा एकच पक्ष तालुक्यात उरला आहे. माकपच्या वतीने एकनाथ मेंगळ, नामदेव भांगरे व तुळशीराम कातोरे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. डाव्या पक्षांच्या जागा वाटपासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर राज्यस्तरावर चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेले पक्षांतर पाहता या वाटाघाटीतही माकप या जागेसाठी स्वाभाविक दावेदार असणार आहे.
पक्षाच्या वतीने यापूर्वी तुळशीराम कातोरे व नामदेव भांगरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवून दखलपात्र लढत दिलेली आहे. एकनाथ मेंगाळ यांनी डी. वाय. एफ. आय. युवक संघटनेच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने मेहनत घेऊन आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये मजबूत संघटन उभे केले आहे. पक्षाच्या अनेक जनसंघटनांचे जाळे संपूर्ण मतदारसंघात कार्यरत आहे. निवडणुकीत या ताकतीचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. अशी माहिती डॉ.अजित नवले यांनी दिली. तर यादवराव नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड, साहेबराव घोडे, सुरेश भोर, बाळासाहेब वाळुंज, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे यांची प्रेसनोटमध्ये नावे आहेत.====================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शिंदे
8888782010
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५४ दिवसात ९९ लेखांचे ५ लाख ३६ हजार वाचक)
----------------------