अशोक भांगरे" यांचा ३९ वर्षात ९ वेळा "पक्षबदल" आता डॉ. लहामटेंचे काय ?

आखरी दम तक लढेंगे !!

अकोले (प्रतिनिधी) :- 
                     आज (दि.२१) अ. नगर येथे "शरद पवार" यांच्या उपस्थितीत महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी भाजपचे नेते अशोक भांगरे यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे सोशल मीडियावर भांगरे यांच्या "पक्ष बदलाच्या उड्या" हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला. कारण, सन १९८९ ते २०१९ पर्यंत त्यांनी सात वेळा पक्षबदल करुन "मधुकर  पिचड व वैभव पिचड" यांना "शह" देण्याचा वारसा कायम ठेवला आहे. एकीकडे लोक "सत्तेसाठी" इकडून तिकडे उड्या मारताना दिसतात, तर दुसरीकडे काही लोक "तिकीटासाठी" इकडून तिकडे उड्या मारताना दिसतात. यात "उमेदवाराचा खेळ होतो, आणि कार्यकर्त्यांचा जीव जातो". असेच वातावरण पहावयास मिळत आहे. त्यामुळे काल अशोक भांगरे यांचा हा "सातवा पक्षप्रवेश" झाला असून जनतादल, (अपक्ष) घड्याळ, काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजप आणि आता राष्ट्रवादी असे पक्षबदल झाले आहे. आता पिचडांचे हे "पारंपारिक कट्टर" प्रतिस्पर्धी यांनी पुढीलवेळी उरलेल्या "रिपाईकडून" उमेदवारी केली. तर, "आश्चर्य" वाटायला नको. असे जनतेकडून बोलले जात आहे. भांगरे साहेब यांच्या पक्षबदलाच्या राजकीय उड्यांचा "रोखठोक सार्वभौमने" मांडलेला स्पेशल रिपोर्ट.

बीजेपीचे दोन फोडले !!

               तो काळ १९७७ चा तो काळ होता. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये उद्योगमंत्री असताना ४० आमदार फोडून बंडखोरी केली आणि बाहेर पडून जनता जलाचे ९० आमदार घेऊन पुलोद सरकार स्थापने केले. पण, दरम्यानच्या काळात १९७९ साली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून पुलोद सरकार बरखास्त केले व  १९८० ला अशोक भांगरे यांचे पिताश्री आदरणीय यशवंत भांगरे याचा परभाव करून मधुकर पिचड आमदार झाले. त्यानंतर १९८४ साली राजाभाऊ भांगरे यांनी पिचडांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुचकामी ठरला. खऱ्या अर्थाने १९८९ साली पिचड यांचे विरोधक म्हणून  अशोक भांगरे यांचे नाव. इतिहासाच्या पानावर लिहीले गेले. तेव्हा काशिनाथ साबळे यांचे नाव चर्चेत होते. पण, गोपाळ भांगरे व यशवंत भांगरे यांच्या प्रचलित घराण्याचा अशोक भांगरे यांना वारसा होता. म्हणून कम्युनिष्ट, समाजवादी यांनी जनतादलाच्या सहकार्याने भांगरे यांच्या पाठीवर हात ठेवला. तेव्हा दशरथ सावंत, कारभारी उगले, शांताराम वाळुंज, मधुभाऊ नवले, गिरजाजी जाधव, काँग्रेसचे महाले यांनी एकत्र येऊन पिचडांचा पाडाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्या टिमला अपयश आले आणि पुन्हा पिचड साहेब निवडून आले. जर, तेव्हाच भांगरे यांनी पुरोगावी व डाव्या चळवळीशी एकनिष्ट रहायला हवे होते. पण,  १९९१ ला लोकसभा निवडणुका झाल्या आणि ९२ साली भांगरे साहेबांनी सगळ्यांचा निरोप घेत पिचड साहेबप्रणित काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे तिकीट घेत, झेडपी गाठली. हा पहिला विश्वासघात ठरल्याचे बोलले जाऊ लागले.                   

राजकारणातील वजिर

                १९९४ साली अगस्ति सहकारी  साखर कारखाना उभा राहिला या दरम्यान सिताराम पाटील गायकर, भाऊसाहेब हांडे यांचे पिचडांशी मतभेद झाले होते. पुढे विधानसभा तोंडावर येऊन ठेपल्या होत्या. त्याचाच फायदा घेत १९९५ साली मधुकर पिचड यांच्या जवळच्याच "विश्वासू" लोकांनी त्यांचा घात केला. पिचडांपासून "मराठा चेहरे" दुर लोटला गेल्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर "पराभव" चमकत होता. अशातच अशोक भांगरे यांनी "संधीचे सोने" करण्याचा डाव साधला आणि पिचडांचा साथ सोडून ते त्यांच्याच विरोधात अपक्षाच्या आखाड्यात उडी घेतली. या दरम्यानच्या काळात निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लागत होता. तेव्हा दशरथ सावंत हे मधुकर पिचड यांच्या सोबत होते. त्यांनी १९९५ च्या निवडणुकीत पहिल्यांदा पिचडांचे "सारथ्य" केले. म्हणजे "सखे सोबती, वैरी झाले. तर कट्टर वैरी सखे" झाल्याचे राजकारण अकोल्याच्या मातीने अनुभवले. सावंत, पिचड, मिनानाथ पांडे, विठ्ठलराव चासकर यांच्यासह निवडक लोक पिचडांच्या पडत्या काळात सोबत होते.
        तर सिताराम पाटील गायकर, कारभारी उगले, शांताराम वाळुंज मधुकर नवले, गिरजाजी जाधव यांच्यासह अन्य नेत्यांनी पिचडांचे नेत्रुत्व पुन्हा नाकारलेे. तेव्हा पिचडांना विरोधी पर्यायी व्यक्तीमत्व म्हणून अशोक भांगरे यांना ही नामी संधी चालुन आली होती. कारण, कधी नव्हे असे सर्व विरोधक पिचडांच्या विरोधात एकवटले होते. पिचडांवर आरोप-प्रत्यारोपाचा भडिमार झाला. तालुक्यात एकदम सुप्त वातावरण तयार झाले होते. कारण, त्यांच्या सोभवताली जी पिलावळ जमा झाली होती. त्यांच्यावर जनता प्रचंड नाराज होती. म्हणून मतदारांनी पिचडांना भरभरुन मतदान दिले. त्यामुळे तो पराभव अशोक भांगरे यांचा झालाच. मात्र, त्यांच्यासह पिचडांच्या सभोवताली चालणाऱ्या मक्तेदारीचा   देखील कुच्चामोड झाला. तेव्हा पिचड साहेब ३४ हजार मतांनी निवडून आले होते. तेव्हा खऱ्या अर्थाने "जनतेची ताकद व सुप्तलाट" या तालुक्याने अनुभवली होती.
        या निवडणुका झाल्या आणि काही काळ लोटतो तेच अशोक भांगरे पिचडांना जाऊन मिळाले. १९९७ साली ज्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. त्यात भांगरे पुन्हा पिचडांच्या आशिर्वादाने झेडपीच्या विधीमंडळात गेले. भांगरेंच्या अलटी-पलटी धोरणामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास उडत राहिला. नाहीतर खऱ्या अर्थाने ते आजही अकोल्याचे आमदार राहिले असते. असे तेव्हापासून तर आजवर जाणकार लोक हेच बोलत आहेत.
         इकतेच काय ! १९९७ नंतर दोन वर्षात  म्हणजे १९९९ साली शरद पवार यांनी "राष्ट्रवादी" पक्ष काढला आणि "मधुकर पिचड" यांनी पवारांचे "घड्याळ" हातात बांधले. त्यावेळी, अशोक भांगरे यांनी पुन्हा पिचडांची साथ सोडली आणि १९९९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश करून पंजावर निवडणूक लढविली. त्यावेळची एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. की; १९९५ ला जे पिचडांचे सोबती विरोधात गेले होते. ते पुन्हा त्यांना जाऊन मिळाले. पिचडांनी त्यांना "स्थानिक स्वराज्य संस्थांवर पदे बहाल केली". तेव्हा सगळा "फुटीर ताफा" पिचडांकडून एक असतांना देखील १९९९ च्या निवडणुकीत भांगरे यांना अवघ्या २२ शे मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर भांगरे यांनी २००४ साली "शिवसेनेत प्रवेश" केला आणि तेव्हाही पिचडांना शह दिला. पुढे २००९ मध्ये "मधुकर तळपाडे" यांनी पोलीस खात्याचा राजिनामा देत पिचडांशी दोन हात केले. त्यावेळी "अशोक भांगरे" यांनी "मनसेत" प्रवेश केला आणि अकोल्यात तिरंगी लढत झाली. पुढे २०१४ साली "शिवसेना भाजप" युती झाली नाही. त्यामुळे शिवसेनेकडून मधुकर तळपाडे यानी उमेदवारी केली तर "अशोक भांगरे" यांनी "भाजपात प्रवेश" करून पुन्हा तिरंगी सामना उभा केला. हे सर्व वातावरण पिचड घराण्याला "पोषक" ठरत गेले आणि ते निवडून येत राहिले.
           आता पिचड-पिता पुत्रांनी अशोक भागरे, सुनिता भांगरे व किरण लहामटे यांची गोची करून टाकली. राष्ट्रवादीला रामराम ठोकत खुद्द भाजपत प्रवेश केला. त्यामुळे सगळ्यांना "पळता भुई थोडी झाली" आणि "कोणता मी, झेंड घेऊ हाती". असा संभ्रम निर्माण झाला. पिचडांचे पारंपारिक विरोधक अशोक भांगरे यांनी भाजपचे तिकीट मिळण्यासाठी अगदी मुख्यमत्री अकोल्यात येईपर्यंत अतोनात प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. एक "प्यादे" म्हणून त्यांनी मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश हा खेळ खेळला. मात्र, त्याचाही पारसा फरक पडला नाही. अखेर आत्ता त्यांनी स्वत: पुन्हा एक इतिहास रचत भाजपमधून पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.  त्यामुळे पुत्र, पत्नी किंवा स्वत: भांगरे हे तिघांपैकी एकाला उमेदवारीचा हट्ट धरत आहे. असे बोलले जात आहे.

हात जोडतो, आता धोका नको !!

           आता एक गोष्ट अनाकलनिय ठरणार आहे. की, ज्या डॉ. किरण लहामटे यांनी पिचडांचा भाजपत प्रवेश होताच मैदानात उडी घेतली. अगदी पुणे, मुंबई, नाशिक, पठार भाग आणि मोठ्या गावांत जावून जंग जंग पछाडले. त्यांची हवा झाली आहे. "अब की बार, डॉक्टर आमदर" असे नारे सोशल मीडियावर फिरत आहेत. जनतेच्या तोंडून त्यांचे नाव चर्चेत आहे. अशात त्यांचा पत्ता कट झाला. तर लोकांचा घड्याळावर देखील विश्वास राहिल की नाही. हे सांगणे कठीण ठरणार आहे. मात्र, अद्याप राष्ट्रवादीकडून उमेदवारी फायनल झालेली नाही. त्यामुळे अकोल्याची निवडणुक रंगतदार होऊ लागली आहे. मात्र, ज्या भांगरे कुटुंबाने पिचडांना पारंपारिक शह दिला. ते डॉ. लहामटे यांना तिकीट दिले. तर, गप्प बसतील का ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर भांगरे घरात तिकीट गेले. तर, डॉ. शांत बसतील का ? हे प्रश्न अनुत्तरीत असतांना अद्याप युतीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे मधुकर तळपाडे, दराडे ताई, मारुती मेंगाळ, सतिश भांगरे यांचीही नावे पुढे येणार आहेत. हे देखील विसरुन चालणार नाही. त्यामुळे काही तास फक्त वेट & वॉच....!

 "अशोक भांगरे" यांचा
 "पक्षबदल प्रवास"...!
🚩 १९८९-जनतादल, (चिन्ह चक्र)
🏁 १९९२- काँग्रेस (सदस्या झेडपी)
🏴 १९९५ अपक्ष (चिन्ह घड्याळ)
🏳 १९९७ काँग्रेस (झेडपी)
🚩१९९९ काँग्रेस (चिन्ह, पंजा)
🏴 २००४ शिवसेना (धनुष्यबाण)
🏁 २००९ मनसे (रेल्वे इंजिन)
🚩 २०१४ भाजप (चिन्ह, कमळ)
🏴 २०१९ राष्ट्रवादी (चिन्ह, घड्याळ)

    --  सागर शिंदे

 ===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६८ दिवसात ११९ लेखांचे ६ लाख ३५ हजार वाचक)