थोरतांच्या "सुसंस्कृत" चेहऱ्याला "संस्काराने" "प्रतिउत्तर"!! "माल-पाणी" असणाऱ्या उमेदवाराच्या शोधात भाजप


संगमनेर (प्रतिनिधी) :-
               महाराष्ट्रातील बहुचर्चित संगमनेर विधानसभा हा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, सद्या "सुसंस्क्रुत व संस्कारी" व्यक्तीमत्व म्हणून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सद्या थोरातांना शह देण्यासाठी कुठला पहिलवान आखाड्यात उतरतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मात्र, "रोखठोक सार्वभौम"च्या सीसीटीव्हीत एका व्यक्तीला भाजपने "झुकते माप" दिल्याचे लक्षात आले आहे.  या महाजनादेश यात्रेच्या सभेत व्यासपीठावर इच्छुक असलेल्या व पक्षात मुलाखती दिलेल्या एकाही उमेदवारांना स्थान दिले नाही. मात्र, उद्योगपती डॉ. संजय मालपाणी व ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांच्या भोवती  कमळाचा सुगंध शिंपडल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हा प्रकार संगमनेरकरांना "पचेल न पचेल" तो भाग वेगळा. मात्र, तो विषय चर्चेचा ठरला आहे. महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर ना. विखेनी मालपाणी यांच्या नावाचा आवर्जुन उल्लेख केल्याचे पहावयास मिळाले.

खा. विखेंच्या जवळीक उमेदवार

                मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा संगमनेर मध्ये आयोजित होताच डॉ. संजय मालपाणी यांनी महत्वाची भुमिका बजावल्याचे बोलले जात आहे. आजपर्यंत राजकारणापासुन चारहात लांब राहणारे मालपाणी संगमनेरात सक्रीय होताना दिसत आहे. खा. सुजय विखे हे संगमनेर मधील जाणता राजा मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा, डॉ. संजय मालपाणी यांनी पुर्ण वेळ देऊन मंडपाची पाहणी केली व मुख्यमंत्री महोदयांच्या महाजनादेश यात्रेत संपूर्ण स्टाफचा सहभाग नोंदवत संपूर्ण वेळ दिला. हा विषय संगमनेर मध्ये वाऱ्यासारखा पसरला. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मालपाणी व संघाची जवळीकता अनेक कार्यक्रमांमधुन वारंवार दिसुन आली. त्याचाच एक भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी सरसंघचालक मोहन भागवत व युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रम संगमनेर मध्ये जाणता राजा मैदानावर आयोजित केला आहे. त्यामुळे वारंवार मालपाणी व संघ परिवाराचे संबंध जनतेपुढे दिसुन येतात. संगमनेर मधील तुल्यबळ उमेदवाराला चितपट करण्यसाठी संजय मालपाणी मैदानात उतरतील का ? हा चर्चेचा विषय ठरत आहे. "गीता परिवार" व इतर सामाजिक क्षेत्रातुन मालपाणी यांची सामान्यांपर्यंत नाळ जोडली आहे. व्यापारी वर्गाने आजपर्यंत थोरतांच्या विरुद्ध बंडाची भुमिका घेतलेली नाही. परंतु मालपाणी यांनी उमेदवारी घेतली तर व्यापारी मोठ्या संख्येने थोरतांना धक्का देण्यासाठी एकवटतील. असे बोलले जात आहे. संगमनेर मधील बाजारपेठ ही महाराष्ट्रात नामांकित आहे व व्यापारी बँका ह्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. बँकांचे क्लाइन्ट हे लघु उद्योजक बहुतांश संगमनेर मधील ग्रामीण भागातील आहे. मालपाणी यांना उमेदवारी जाहीर केली तर ही लढाई अतिशय चुरशीची ठरेल. असे व्यापारी गटाला वाटत आहे.

सभांना मालपाणी स्टाफ

             दरम्यान, अद्याप भाजपकडून तुल्यबळाची चाचपणी सुरू आहे. मालपाणी यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त अनेकांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने आपल्या "मनातील नाव" बाहेर काढले नाही. जे आजचे इच्छूक उमेदवार असतील ते बंड पुकारणार नाहीत. यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेंचे "अमिष" दाखवावे लागणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला. तरच "एकास एक उमेदवार" आणि भाजपचे पारडे जड ठरेल. असे जाणकारांना वाटते. अर्थात आज उमेदवारी बाबत शंका-कुशंका, तर्क-वितर्क  लावले जात आहेत. परंतु, आज जी नावे जनतेतून थोरातांच्या विरोधात चर्चीले जात आहे. ती बहुतांशी थोरात यांच्याशी अतर्गत संलग्न आहेत. हे जगजाहीर आहे.

मी नाय म्हणूनही कोण चर्चा करतय !!

           एकिकडे ह.भ.प इंदोरीकर यांनी निवडणुक लढविण्यास नकार दिला असला तरी. ह.भ.प आ. बाळासाहेब मुरकुटे हा नेवासा पॅटर्न संगमनेरात जोर धरु लागला आहे. तर रहाने यांची सद्या इच्छा असली तरी, मुंबईतून दादांकडून त्यांना "ग्रिन सिग्नल" मिळेनासा झाला आहे.  तर गिता परिवारातून मालपाणी म्हणतात, आपला "पिंड राजकिय" नाही. असे म्हणून हात वर करताना दिसत आहे. एकंदरीत पाहता. ना. विखे पाटील ज्याच्या "डोक्यावर हात" ठेवतील "तोच उमेदवार" राहु शकतो. असे असले तरी संगमनेरात उमेदवारीची मोठी गुंतागुंत झाल्याचे दिसत आहे.
===============

--  सुशांत पावसे

( संगमनेर प्रतिनिधी)

====================



  "सार्वभाैम संपादक"

              - सागर शिंदे 

              8888782010

               -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६० दिवसात १११ लेखांचे ६ लाख ५० वाचक)
----------------------