"अस्मितेचे उन्मादी" राजकारण, अन "ईडीचा" भोकाडी" विकास वेटिंगवर....!!
धन्य या देशात आम्ही जन्मलो !! |
अकोले (प्रतिनिधी) :-
भारताच्या "लोकशाहीने" प्रत्येकाला "सार्वभौम स्वातंत्र" दिले आहे. मात्र, या लोकशाहीच्या "शिलेदारांना" सत्तेच्या लालसेने "रक्षक" बनविले आहे की "भक्षक" हेच काळायला तयार नाही. डॉ. बाबासाहेबांना जे "विकासकेंद्रीत" राजकारण हवे होते. ते कागदावर "गुण्या गोविंदाने" नांदत आहे. तर, वास्तवात जे प्रश्न सुटायला हवे होते. ते अधीकच "गुंतत" चालल्याचे आपल्याला दिसते आहे. आता "विकास" हा एक राजकारणाचा अविभाज्य भाग आहे. तर त्याला "आश्वासन" नावाचे जालिम "शस्र" संधीसाधुंनी पुढे काढले आहे. तर याला "अस्मिता व भावनिकतेची जोड" देऊ केली आहे. त्यामुळे देशप्रेम, जात, धर्म, परंपरा, गोहत्या, मंदीर, मस्जिद, भाषा, प्रांत, इतकेच काय तर जे देशाचे शिल्पकार ठरले. त्या "महापुरुषांच्या" नावे "अस्मितेचे राजकारण" होऊ लागले आहे. तर दुसरीकडे कोपर्डी, राम मंदीर, चैत्यभूमी, घराणेशाही, शेतकरी प्रश्न, आत्महत्या, महागाई अशा अनेक बाबींहुन "राजकारण गढूळ" होऊ लागले आहे. मात्र, दुर्दैव असे की, देशात रोजगार, शेतमाल, रस्ते, आरोग्य, शिक्षण, प्रकल्प, महागाई, कर्जमाफी, पर्यटन, उद्याेग, गरिबी या आणि अशा हजारो "विकासवादी" प्रश्नांवर कोणी "हल" काढायला तयार नाहीत. म्हणून तर गेली ७० वर्षे आपण, भुगोलाच्या पुस्तकात "भारत हा विकसनशिल देश आहे". (प्रगतीच्या मार्गावर), असा शब्द बदलून "विकसित देश" (पुर्णत: प्रगत) लिहीण्याचा "बहुमान" मिळवू शकलो नाही. हे ही तितकेच खरे आहे. असे अभ्यासकांना वाटते. आज जर देशाच्या राजकिय "घडामोडींचा आढावा" घेतला. तर, आपल्याला यापेक्षा वेगळे काही दिसणार नाही.
ज्यांना आपण "राष्ट्रपिता" म्हणतो. त्यांचा "वध" ज्याने केला. तो, नाथुराम गोडसे याला "आरएसएसने" डोक्यावर उचलून घेतले. का ! तर त्यांना "अखंड भारत" पहायचा होता. देशाची "फाळणी" नको होती. अखेर भाजपने आज हा मुद्दा पुढे घेत "राष्ट्रीय अस्मितेवर" नेऊन ठेवला. अखेर एका "साहित्य संम्मेलनात" गदारोळ झाला. "विकासकेंद्रीत" प्रश्न कटलेल्या पतंगासारखे वाऱ्यावर तरंगत राहिले.देशाचे सोडा, ज्या छत्रपती शिवरायांना "जाणता राजा" म्हणतात, ज्यांनी "रयतेचे राज्य" उभे केले. तीच रयत त्यांच्याच विरोधात "अस्मितेच्या नावाखाली" बंड पुकारुन उभी ठाकली. पुण्यातील "लाल महालात" माता "जिजाऊ" व "शिवबा राजे: यांच्या समवेत "दादोजी कोंडदेव" नको म्हणून उभा महाराष्ट्र पेटला. याला भाजप, मनसे व शिवसेनेने विरोध केला. तर सत्ताधारी "काँग्रेस-राष्ट्रवादीने" ठराव सहमत केला. ज्या शिवरायांनी "महाराष्ट्राची अस्मिता" उभी केली. त्याच महाराजांच्या "अस्मितेवर" या राजकारण्यांनी "नांगर" फिरविताना आपण पाहिले आहे. इतकी निच पातळीची "लोकशाही रक्षक" व्यवस्था झाल्याचे बोलले जात आहे.
याचा परिणाम असा झाला की, "देशभक्ती" बाजुला राहिली आणि "दंडेलशाही"च्या बळावर "देशद्रोहाची उत्पत्ती" झाली. त्यामुळे "लोकशाही आणि आंबेडकरवाद" सांगणारा कन्हैया कुमार "देशद्रोहाच्या खटल्यात अटक" होऊन आत गेला. तर "देशद्रोह व बॉम्बस्पोट प्रकरणात अटक" असलेली प्रज्ञासिंह ठाकूर बाहेर आली. याच वेळी "संविधान" माननाला कुमार "भरगच्च मतांनी पडला" तर, याच ठाकूर प्रशासनावर "अक्षेप" घेऊनही "प्रचंड मतांनी" निवडून संसदेत आल्या. हेच तर "द्योतक" आहे. "अस्मितेच्या" राजकारणाचे. ज्याला "दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न" पडतो. तो ऐनवेळी "लोकशाहीला" मानत नाही. तर, त्याच्याभोवती जे काही जात, धर्म, देश, पक्ष, भावना यांचे वातावरण तयार केलेले असते. ते त्याच्यासाठी "सर्वोच्च" असतात. हीच "फसवी अस्मिता" या "स्वार्थी राजकारण्यांनी" देशात पेरून ठेवली आहे. त्याचीच "बीजे" आता वर "डोकावू" लागली आहेत. असे बोलले जात आहे.
हे राजकारणी "हल्लेखोर" इथेच थांबले नाही. तर, सत्तेसाठी यांनी "जाती-धर्माच्या" अस्मितेचा वापर केला. कधी "हिदु-मुस्लिम" तर कधी "दलित-सवर्ण" कधी "ओबीसी-मराठा" तर कधी "दलित-ब्राम्हण". याही पलिकडे जाऊन "गोहत्येच्या" नावाखाली कित्तेक "निरापराध" व्यक्तीचे बळी घेतले. तर कधी लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि भगव्या रंगांखाली दंगली उसाळून आणल्या. याचेच "भांडवल" करून निवडणुकींचे "बुथ काबूत" करून घेतले गेले.एकीकडे पश्चिम बंगालमध्ये "भाषेहुन वाद" झाला. तर, पोलीस बळाचा वापर करून तो शमविण्यात आला. तर दुसरीकडे महाराष्ट्रात "मनसे" नावाचे "वादळ" आले आणि त्यांनी "मराठी" भाषेची "अस्मिता" जागी केली. हे प्रेम इतकं "उतू" गेलं की, अक्षरश: "परप्रांतीय" दिसेल तेथे आणि एव्हाणा "घरात घुसून" हाणामाऱ्या केल्या. त्याच "उन्मादाने" त्यांनी तरुणांच्या मनावर "अधिराज्य" गाजलिले आणि त्या बळावर त्यांनी "नाशिक महानगरपालिचेची" सत्ता मिळविली. तर, काही "आमदार" निवडून आणले. यात "शिवसेनाही" कोठे कमी दिसली नाही. एकेकाळी "गुजराती व्यापाऱ्यांच्या" विरोधातील शिवसेना अचानक "दक्षिणात्यांच्या" विरोधात गेली. तर "विद्यापीठ नामांतरणाच्या" वेळी "दलितांच्या विरोधी" असणारी शिवसेना आज "युतीत" असून मुस्लिमांच्या विरोधी गेली. त्यामुळे "सत्तेसाठी फ्लेग्झीबल" वागून केवळ एखादा "अस्मितेचा" विषय घेऊन राजकारण करणे. हाच "इतिहास आपल्यासमोर उभा आहे.
असे म्हटले जाते की, "भाजप" हा पक्ष निव्वळ "अस्मितेचे" राजकारण करतो आहे. "राज ठाकरे" म्हणतात की, निवडणुका तोंडावर आल्या. की, देशात काहीतरी "युद्ध सद्रुश्य" परिस्थिती निर्माण केली जाते. सगळ्या सव्वाशे करोड लोकांचे लक्ष त्याकडे खेचून घेतले जाते. आणि सरकार विरोधात तयार झालेले वातावरण. पुन्हा विस्कळीत करून नागरिकांमधील "देशाभिमान" जागा केला जातो. याचे उदाहरण म्हणजे. लोकसभेपुर्वी "बालाकोट व पुलवामा" असे हल्ले झाले. पाकमध्ये घुसून "सर्जिकल स्ट्राईक" केले. भारताचा "वैमानिक अभिनंदनला" पाकमधून "सुखरूप" आणले. यामुळे "मोदींच्या प्रती" लोकांच्या मनात "आत्मियतेची भावना" निर्माण झाली. मोदी है तो मुन्कीन है !! असे नारे गुंजू लागले. चक्क भाजपने "पुलवामा" हल्ल्याचे "भांडवल" करून "मते" मागितली आणि भरगोस मतांनी निवडूनही आले. असे आरोप झाले.
त्यापुढे "विधानसभा" लागल्या आणि "जम्मू-कश्मिरचे" ३७० व ३५ (अ) कलम रद्द केेले गेले. मोदी व शहांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. जम्मु-कश्मिरची जनता खऱ्या अर्थाने "पारतंत्र्यात" गेली. असे बोलले जात आहे. कारण, अजूनही तेथे माध्यमांना बंदी आहे. काही लोक नजरकैदेत आहेत. अर्थात सामान्य मानसांना हा निर्णय पटला आहे. त्यामुळे "राष्ट्रीय अस्मिता" समोर आणत पुन्हा मतदार "मोदीमय" करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र, मोदींनी देऊ केलेला २ कोटी तरुणांचा रोजगार, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, कर्जमाफी, महागाई, महिला अत्याचार, काळा पैसा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकरी आत्महत्या, रस्ते, आरोग्य, शिक्षण यशा मुद्द्यांवर चुकून देखील कोणी बोलायचे नाही. अशी "व्युव्हरचना" भाजपने आखल्याचे बोलले जाता. ही "उन्मादाची उसळी" देशाच्या हितासाठी "तारक" नाही. तर "मारक" ठरेल. असे अभ्याकांना वाटते.
आता सहानुभूती आहे हं !! |
आता राष्ट्रीय अस्मिता, विकास, अश्वासने व भावनिक राजकारण, या पलिकडे "नवा ट्रेड" महाराष्ट्रात रुजू झाला आहे. तो म्हणजे "इडी चा भोकाडी" त्यामुळे अनेकांना "मनस्तापाने" ताप चढू लागला आहे. भले-भले निष्ठावंत "फुटीर" झाले असून त्या "माकडीनीच्या" गोष्टीप्रमाणे "नका-तोंडात पाणी जायला लागले की, डोक्यावरच्या बाळाला ती पायाखाली घेते". तसेच काहीसे राज्यात दिसत आहे. "इडीचा धुर" नाका-तोंडात जाऊ लागल्याने अनेकांनी "गुरुलाच" पायाखाली घेऊन स्वत:चा बचाव करू पाहिला आहे. आणि याच "महाभारतातून" पुन्हा नव्या "अस्मितेचा" जन्म झाला. तो म्हणजे "भावनिक अस्मिता" होय. तसेही स्व. गोपिनाथ मुढे साहेब गेल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींना भावनिक अस्मितेपोटी राजकारणातून मोठा राजाश्रय मिळाला. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना "शिखर बँक" घोटाळे प्रकरणी आरोप होतो काय ! आणि अजित पवार आमदारकीचा राजिनामा देतात काय !! ते "नॉटरिचेबल" होतात काय !! आणि पत्रकार परिषद घेऊन ते रडतात का !! यातून आता राष्ट्रवादीला सहानुभूतीची लाट मिळणारच. मात्र, या देशाने केव्हर अस्मितेचे राजकारण भोगायचे ? कधीतरी-तरी कोणी "विकासावादी राजकारण" करणारं पुढे येणार आहे का ? की हा देश "जगबुडी" होऊपर्यंत "विकसनशिलच" (प्रगतीच्या मार्गावर..) राहणार आहे. देव जाणे !!!!!
-- सागर शिंदे
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७१ दिवसात १२९ लेखांचे ७ लाख १० वाचक)