एका "संघर्षमय" चळवळीच्या "श्वासाचा" अंत; बी.जे खताळांच्या "शकतकी" आयुष्याला "पुर्णविराम"...!
बी. जे खताळ पाटील |
महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकाहून अधिक काळापासून सक्रीय असलेले खताळदादांनी सन १९४४ पासून समाजकारणात आणि १९५२ पासून निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केलेल्या दादांनी सन १९६२ ते १९८५ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडलेली आहे. याकाळातील त्यांच्या कामाचा लेखाजोखा नुसता वरवर जरी अभ्यासला तरी कुणीही चकित होऊन जाईल. खरे तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवमहाराष्ट्र घडविण्याचे काम ज्या मंडळींनी केले त्यात खताळ दादांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे सर्व करीत असताना त्यांची अभ्यासूवृत्ती, तत्वनिष्ठा, सामाजिक जाणीवा व कडक शिस्तीचा तितकाच बोलबाला होता.
२६ मार्च,१९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे दादांचा जन्म झाला. घरात वडिलोपार्जित पाटीलकी होती. काहीशा कष्टातचत्यांचे बालपण गेले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी धांदरफळ येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे संगमनेरला खासगी वर्गात व पेटिट विद्यालयात त्यांनी आपले विद्यायलीन शिक्षण पूर्ण केले. १९३८ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बडोदा येथील गायकवाड महाविद्यालयात प्रवेश घेतला. खर्या अर्थाने व्यापक समाजजीवनाची ओळख त्यांना इथेच झाली. बडोद्यात कला शाखेची पदवी घेतल्यानंतर ते पुण्याला आले आणि पुना लॉ कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात दादा आणि आमदार झालेले दत्ता देशमुख एकाच खोलीत रहायचे. त्यावेळी देशभर महात्मा गांधीनी पुकारलेल्या ‘चलेजाव’ आंदोलनाचा जोर होता. या आंदोलनात दादा देखील सहभागी झाले. ते रहात असलेल्या ताराबाई वसतिगृहात गुप्त बैठका चालायच्या. पोलिसांना ही बातमी कळली आणि पोलिसांनी त्यांच्या खोलीवर छापा घालून झडती घेतली. या झडतीनंतर दादांचे सहकारी दत्ता देशमुखांना अटक झाली. दत्तांजींच्या अटकेनंतर दादा काही काळ संगमनेरला आले. तालुक्यातील साकूर, नांदूरखंदरमाळ भागात भूमिगत राहून लोकांमध्ये गुप्तपणे ब्रिटिशांविरूध्द जनजागृतीचे अभियान राबविले.
१९४३ साली संगमनेरचे पहिले आमदार के. बी. देशमुख यांच्या कन्या प्रभावती यांच्याशी त्यांचा सत्यशोधक पध्दतीने विवाह झाला. दादांनी संगमनेरमध्ये वकिलीला सुरूवात केल्यानंतर थोडया काळातच त्यांची अतिशय हुशार वकील म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. अहमदनगर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात व थेट कर्नाटकमधील विजापूरपर्यंत त्यांचे नावलौकिक झाले. १९५२ मध्ये त्यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व सिव्हिल जज म्हणून धुळे जिल्ह्यात नियुक्ती झाली. परंतु नियुक्तीचा आदेश आला त्याच वेळी काँग्रेस पक्षाने त्यांना त्या वर्षी होणार्या असेंब्लीच्या निवडणुकीला उभे राहण्याचा आदेश दिला. पक्षाचा आदेश स्विकारून त्यांनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला व निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही. त्यांनतर १९५७ साली झालेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा पक्षातर्फे उमेदवारी देण्याचे ठरले. परंतु, त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. दादांना व्यक्तीशः मुंबईसह महाराष्ट्र व्हावा असे मनापासून वाटत होते. पण, काँग्रेस पक्षाची भूमिका त्यावेळी तशी नव्हती. त्यामुळे दादांनी उमेदवारी नाकारली. पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका घेतली.
१९५८ मध्ये संगमनेरला सहकारी तत्त्वावर साखर कारखाना काढण्याचे ठरले. कारखान्याचे चीफ प्रमोटर म्हणून त्यांनी भागभांडवल गोळा करायला सुरूवात केली. संपूर्ण तालुका सहकारी साखर कारखान्याच्या कल्पनेने भारावून गेला. दादांच्या जोडीला सर्वश्री दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात, भास्करराव दुर्वे, दत्ताजीराव मोरे, पंढरीनाथ आंबरे आणि त्या काळात सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेली इतर बरीच मंडळी होती. या सर्वांच्या साथीने अवघ्या सात दिवसात १८ लक्ष रूपयांचे भागभांडवल गोळा करण्यात आले. काही विघ्नसंतोषी मंडळी कारखाना उभारणीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी भागभांडवल म्हणून दिलेली शेअर्सची रक्कम परत मागावी यासाठी फूस लावीत होती. मात्र, दादा आणि त्यांचे सहकारी ठाम होते. अनंत अडचणींवर मात करून पुढे जवळपास दहा वर्षांनी संगमनेर सहकारी साखर कारखाना उभा राहिला.
१९६२ मध्ये पुन्हा एकदा त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. या निवडणुकीत विजय मिळाल्यावर त्यांना लगेचच राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर १९६७, १९७२ व १९८० अशा चार निवडणुकांमध्ये त्यांनी संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले. आमदार म्हणून कार्यरत असताना बहुतांशी काळ त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या खात्याचे मंत्रीपद असायचे. राज्याच्या मंत्रीमंडळातील सहकार, अन्न व नागरी पुरवठा, नियोजन, कृषी, परिवहन, महसूल, विधी व न्याय, प्रसिध्दी, माहिती, पाटबंधारे, सिंचन अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्त्वाची छाप उमटवली. विशेष म्हणजे १९६९ मध्ये केंद्र सरकारने प्रथमच नियोजन खात्याची जबाबदारी राज्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला व ‘राज्याचे पहिले नियोजन मंत्री’ म्हणून काम करण्याची संधी दादांना मिळाली. महाराष्ट्रातील अनेक धरणे व शेतकर्यांच्या, कष्टकर्यांच्या हिताच्या योजना ही त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे.
त्यांच्याच काळात कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे नांदोली, चांदोली, सातार्याचे धोम, पुण्यातील चासकमान, वर्ध्यातील अप्पर वर्धा, नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी आदी धरणांच्या उभारणीची पायाभरणी झाली व त्यांच्याच काळात यातील बहुतांशी धरणे पूर्णही झाली. खरेतर त्यावेळी कुणीच इतक्या धरणांचा विचार केलेला नव्हता. परंतु नेहमीच भविष्याचा वेध घेणारी दृष्टी वापरून काम करणार्या दादांनी त्यावेळी भविष्याची पावले अचूक ओळखली होती.
राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना दादांनी नेहमीच नियमांचे काटेकोर पालन केले. त्यांच्या या कठोर शिस्तीचा फटका अनेकांना बसला. मंत्रिमंडळात आपल्या गावातील, जिल्ह्यातील नेता असला म्हणजे आपली अनेक वैयक्तिक कामे मार्गी लागू शकतात. या समजूतीतून अनेकजण त्यांच्याकडे आपली कामे घेऊन जायचे. परंतु, दादांनी कुणाच्याही व्यक्तिगत कामासाठी शब्द टाकला नाही. ते आजही म्हणतात, मी गावाचा किंवा जिल्ह्याचा मंत्री नव्हतो, तर राज्याचा मंत्री होतो. त्यामुळे माझी जबाबदारी संपूर्ण राज्याप्रती एकसारखी होती. मी गावाच्या नजरेतून राज्याकडे बघत नव्हतो, तर राज्याच्या नजरेतून गावाकडे बघायचो. संपूर्ण राज्याला काही देताना नियमानुसार जे गावाच्या वाट्याला येईल, तेवढेच गावाला मिळाले पाहिजे. अन्यथा माझा गाव म्हणून मी गावाला एखादी गोष्ट जास्तीची दिली, याचा अर्थ मी राज्यातील कुठल्यातरी दुसर्या गावावर अन्याय करून त्यांच्या वाट्याचे माझ्या गावाला दिल्यासारखे होईल. त्यांच्या या शिस्तीच्या बडग्यामुळे अनेकदा कार्यकर्ते दुखावले जायचे. परंतु आज हेच कार्यकर्ते दादांबद्दल बोलताना त्यांच्या कर्तव्यपरायणतेचे कौतुक करतात.
१९८० ची निवडणूक जिंकल्यावर त्यांनी ‘ही आपली शेवटची निवडणूक’ असल्याची घोषणा केली व त्यानुसार १९८५ मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्विकारली. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला योगासने, विपश्यना, वाचन, चिंतन यात गुंतवून घेऊन सध्या वयाच्या १०१ वर्षापर्यंत त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले. अंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक आणि वाळ्याची शाळा अशी सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
आज शतकाचे साक्षीदार असलेले दादा आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने देशाने, राज्याने, जिल्ह्याने एक नेता गमावला. मात्र मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील खूप जवळचे प्रेरणादायी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
===============
लेखक
संतोष खेडलेकर
============
मुख्यमंत्री यांच्या भाषणाचे विश्लेषण
"रोखठोक सार्वभौम" वर. नक्की वाचा. काय हवे होते आणि काय नको. एक अभ्यासपुर्ण लेख..!!
मुख्यमंत्री यांच्या भाषणाचे विश्लेषण
"रोखठोक सार्वभौम" वर. नक्की वाचा. काय हवे होते आणि काय नको. एक अभ्यासपुर्ण लेख..!!
====================
"सार्वभाैम संपादक"
- सागर शिंदे
8888782010
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६१ दिवसात १०७ लेखांचे ६ लाख वाचक)
----------------------