२८८ जागा "लढवायच्या" तयारीला लागा- ठाकरे; २८८ उमेदवारांची "यादी रेडी" आहे - महाजन, भाजपला पवारांची भिती !!

हे विश्लेषण योग्य ठरु शकते, वेट करा !!

 -- सागर शिंदे
मुंबई (प्रतिनिधी) :- 
                बकासुरासारखी भूक लागल्यासम आमदार फोडून शिवसेना भाजपने "बकाबका" खाल्ले अशी टिका थोरातांनी केली होती. पण, आता या आमदारांची भूक भागविताना महायुतीच्या "नाकीनव" येऊ लागले आहे. त्यामुळेच जागा वाटपात "ओढाताण" होताना दिसू लागली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा. २८८ ठिकाणी कोणकोणते उमेदवार निवडून येण्यास पात्र आहे. याची चाचपणी करा. असे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे महायुती तोडण्याचे संकेत म्हणायचे की; जागा वाटपात ओढाताण करुन दबाव निर्माण करायचा. हा कोणता प्रकार आहे. हे नव्याने सांगायला नको.  तर दुसरीकडे आता ठाकरे यांना प्रतिउत्तर देताना गिरीष महाजन यांनी नाशिकमध्ये २८८ उमेदवारांची यादी तयार असल्याची तंबी शिवसेनेला दिली आहे.  त्यामुळे जागावाटपाचा हा तिढा वाढत जाण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांमध्ये नौटंकीची ड्रामेबाजी सुरू झाली आहे. असे राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.

काय करावं या शिवसेनेचे !!

           अचारसंहीतेच्या  तोंडावर जागा वाटपाच्या चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. पुर्वी रडत-खडत सत्तेत सहभाग मिळावा. यासाठी आटापिटा असायचा. परंतु, आता "मंत्रीपदच" काय !! "मुख्यमंत्री" पदावर छोटे-मोठे पक्ष दावे करू लागले आहेत. याचे कारण म्हणजे ईव्हीएमचा आशिर्वाद म्हणा की प्रचंड जनाधार. त्यामुळे विरोधी पक्ष देखील सुपडासाफ झाल्याचे दिसत आहे. खरेतर मित्रपक्ष शिवसेनेला सोडून एकहाती सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मानस आहे. मात्र, दिर्घकाळाचे राजकारण करायचे असेल तर असले निर्णय धोकादायक ठरतील हे भाकीत आरएसएस ने केले होते. त्यावर विचारमंथन होऊन शिवसेनेची दादागिरी एकूण घ्यावी लागत आहे. अन्यथा आता जनतेचा कौल मिळविणे भाजपला अवघड नाही. हे प्रत्येक जाणकार व्यक्तीला वाटते आहे. पण, भविष्यकाळ विचारात घेणार नाही. तो भाजप कसला ? त्यामुळे तुझे माझे जमेना अन तुझ्यावाचून करमेना. अशी गंमत म्हणून हा राजकीय डाव बळजबरीचा रामराम करून सुरू आहे.

दोघांनी लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे

           असे बोलले जाते की, ज्यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांना शुद्धीपत्र देऊन भाजपने उमेदवाऱ्या बहाल केल्या आहेत. आता हे करण्यासाठी चंद्रकांत दादा व महाजन साहेब यांनी पुढाकार घेतला होता. पक्षप्रवेश देताना जो शब्द दिला. तो पाळण्यासाठी २८८ जागा देखील अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे, युती नाही झाली तरी चालेल. परंतु, पक्षात घेतलेल्या प्रत्येकाला संधी दिली पाहिजे. असा विनंतीवजा हट्ट या दोघा मध्यस्तींनी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
          मात्र, यांच्या हट्टापेक्षा भाजपला सद्या धुरंधर राजकारणी शरद पवार यांची भिती वाटते आहे. कारण, १९७७ दरम्यान पवारांनी काँग्रेस सोबत गद्दारी करून ४० आमदारांसह बाहेर पडले होते. तेव्हा वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता. पवारांनी जनता दलाशी युती करून "पुलोद" सरकार स्थापन केले होते. त्याचीच पुनराव्रुत्ती होऊ शकते. कारण, शिवसेना स्वबळावर लढली तर, उद्या त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी काही बळ आवश्यक वाटले तर, बिनशर्त ते पाठींबा देऊ शकतील. असा संशय नाकारता येत नाही. त्यामुळे भाजप कितीही ताकत दाखवत असले तरी ते शिवसेनेला एकटे सोडतील असे वाटत नाही. त्यामुळे धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय अशा आवस्थेत भाजप दिसत आहे. नाहीतर सत्तेत राहुन बंड पुकारणारी शिवसेना, खिशात राजिनामे घेऊन फिरणारे आमदार, सरकारच्या ताटात बसून सरकार विरोधी मोर्चे आंदोलने काढणारी शिवसेना भाजपला किती सहन होत असेल. हे नव्याने का सांगावं. भाजपच्या याच द्विधा मनस्थितीचा  फायदा घेत जागा वाढीसाठी शिवसेना भोकाडी सारखे भाजपला डिवचणार आहे. तर मुख्यमंत्री आणि जबाबदार व्यक्ती महाजन साहेबांसारख्या व्यक्तींना पुढे करून चिमटे काढणार आहे. हेच आता या दोन दिवसात पहायला मिळणार आहे.