"जेटलींमुळे पिचडांचे बजेट घसरले..!" "नक्टीच्या लग्नाला १८ वे विघ्न"..!

अकोले आता नको रे बाबा !

अकोले (प्रतिनिधी) :- 
              "नक्टीच्या लग्नाला सतरा विघ्ने" ही म्हण आता बदलून "नक्टीच्या लग्नाला आठरा विघ्ने" अशीच म्हण अकोल्यात रुजू झाली आहे. कारण; समस्यांनाही अंत असतो. तो पिचड पिता - पुत्रांच्या पदरातून खाली पडायला तयार नाही. "राष्ट्रवादी" सोडून ते "भाजपात" आले खरे. पण, "सतराशे साठ" समस्या त्यांच्या प्रवेशानंतर उभ्या राहिल्या आहेत. मा.आ. "वैभव पिचड" यांच्याभोवतीची "विघ्ने" कमी होता होईना. पक्षप्रवेशाची चर्चा रंगली तेव्हा "मोठे साहेब आजारी पडले", पक्षप्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची गोपनिय भेट घेणार तोच "अजित पवार अचानक भेटले", जो पक्षप्रवेश झाला तो "निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मान्य होईना". इकडून तिकडून मान्य केला, तर "बीजेपी समर्थकांना तो रुजेना", सगळ्यांना एक करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय अकोल्यात येणार, तर तो "दौरा कोल्हापुर आपत्तीने पुढे ढकलला", त्याचे पुढील नियोजन करायचे म्हणून दि.१८ रोजी ना. विखे साहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात बैठक होणार होती तर त्यांच्या "मातोश्रींनी अखेरचा श्वास घेतला". त्यानंतर वाटले होते शनिवार दि.२४ रोजी मुख्यमंत्री अकोल्यात येण्याचे चिन्ह होते. मात्र, नियोजनाचा आभाव झाला आणि हाच दौरा रविवार दि.२५ रोजी होईल यावर "मोहर" लागली. त्या अनुषंगाने सगळ्या शहरात कमळ  फुलले. रस्त्यांच्या "दुतर्फा फ्लेक्स" लागले अकोल्यात दुसरी "दिवाळी" साजरी होत असताना अचानक दिल्लीहून मेसेज आला. "भाजपचे निष्ठावंत" तथा माजी "अर्थमंत्री अरुन जेटली" यांचे निधन झाले. आणि अकोल्यात "उमललेले कमळ" सुकून गेले. तोच भाजप कार्यालयातून मेसेज आला की मुख्यमंत्र्यांचा अकोल्यातील "महाजनादेश यात्रेचा कार्यक्रम रद्द" करण्यात आला आहे. त्यामुळे हे "आठरावे विघ्ने" पिचड साहेबांच्या नक्कीच जिव्हारी लाभले असणार यात शंका नाही. त्यामुळे आता सद्यातरी मुख्यमंत्री अकोल्यात येतील असे चित्र दिसत नाही.

फक्त रविवारचा दौरा रद्द !


         "दैव फिरले की लक फिरते" असाच काहीसा प्रकार "पिचड साहेबांच्या बाबतीत" घडला आहे. "काळजावर दगड ठेऊन" त्यांनी "हातातून घड्याळ काढले" आणि आरोपांचा चिखल तुडवित "कमळात प्रवेश" केला. त्यावेळी असे वाटले होेते. आता अकोल्यात "घड्याळाचे काटे उलट दिशेने फिरतील". मात्र, झाले भलतेच ! "कमळाच्याच पाकळ्या गळून पडू लागल्याचे" चित्र उभे राहिले.
          अकोल्यात "मुख्यमंत्री" येणार म्हणून भाजपात "दिवाळीची तयारी" सुरू होती. 'नवलेवाडी फाटा ते शेकेवाडी' दरम्यान अशा 'दोन किलोमिटर' अंतर "कमळाच्या पट्ट्याची" रस्त्यांनी "झालर:नेसली" होती. कधी नव्हे त्या "रस्त्यांच्या खड्ड्यांना थिगळे" लागली होती. रस्ते झाडण्यासाठी स्रीयांची नेमणूक केली होती, "पीडब्लुडी" रस्त्यांवर उदार झाल्याचे दिसले, रस्त्यात आलेल्या झाडांच्या भर दिवसा "कत्तली" झाल्या, एक ना दोन अशा तब्बल १० ते १५ किलोमिटर रस्त्यांच्या दुतर्फा बॅनर लागले होते. दादा, मामा, भाऊ, काका, साहेब, भैया, नगरसेवक, आघाड्या-पिछाड्या यांनी मोठमोठी "बेकायदा फ्लेक्स" उभारले होते. इतकेच काय ! बॅनरवर फोटो लावले नाही म्हणून अनेकांमध्ये "तु-तू मै- मै" झाल्याचे समोर आले. याही पलिकडे महोदयांचा फोटोला कोठे "मिशा" तर कोठे "अर्धमिशा" याहुन वादंग उठला. असे नाना प्रकार मुख्यमंत्री दौऱ्यात चर्चेचा विषय ठरले.
           
काही असो. मुख्यमंत्री "येवो ना येवो", जनतेला त्यात रस नाही. पण, "रस्त्यांचा श्वास मोकळा" झाला, खड्डे बुजले गेले, गोर गरिबांना रोजगार मिळाला, गेल्या "आठ दिवसात कोटी रुपयांची उलाढाल" अकोल्यात पहायला मिळाली. झेंडे, बॅनर व किरकोळ व्यापाऱ्यांना भाजपने "अच्छे दिन" बहाल केले. आयटीआय मैदानावरील "लाखो रुपयांचा मंडप" प्रतिक्षा करून थकून गेला. "कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न" निर्माण व्हायला नको म्हणून धुळे, जळगाव, नाशिक, नगर येथून "अतिरिक्त पोलीस बंदोबस्त" अकोल्यात येऊन पोहचला होता. इतकेच काय तर "ना. विखे समर्थकांनाच पोलीस प्रशासनाने १४९ च्या नोटीसा बजावल्या" होत्या. अशा अनेक "अनाकलनिय गोष्टी" मुख्यमंत्र्यांच्या यात्रेस अनुभवण्यास मिळाल्या. कार्यक्रमाला गर्दी झाली पाहिजे. यासाठी, कोठून किती लोक आणायचे, जेवण, पाणी, खुर्ची, स्टेज, शौचालय, वाहनतळ असे सुसूत्र नियोजन करून साहेबांनी यशस्वी सभेचे प्लॅनींग केले होते. मात्र, "जेटली यांनी पिचड साहेबांचे बजेट बिघडून टाकले". अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून येऊ लागल्या आहेत.

असे का होतय राव !!!

       यात दोन व्यक्तींच्या मनाजोगे झाले असावे. ज्या 'भांगरे' साहेबांनी "पिचडांच्या विरुद्ध बंड" पुकारले त्यांच्यासाठी ही सभा 'डोईजड' झाली असावी. "इकडे आड, तिकडे विहीर" अशा स्थितात असताना त्यांनी सभेला जायचे ठरविले होते. मात्र, "बीना मलमाची खुजली गेली" असाच त्यांच्या मनाजोगा प्रकार घडला असे जनतेला वाटते. तर दुसरीकडे डॉ. किरण लहामटे यांच्यासाठी "मनमे लड्डू फुटा" अशीच काहीशी "गुदगुदी" झाली असणार यात शंका नाही. कारण, १९९९ च्या ठाकरेंच्या सभेने किती "जनाधार" वळाला होता. हे "इतिहास" सांगतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेने जनतेतील "सुप्तलाट" निघून जाण्यात भर पडला असता. त्यामुळे लहामटेंनी सुटकेचा श्वास सोडला असावा.

देव तारी त्याला कोण मारी !!

       आता काही झाले तरी वैभव पिचड साहेबांना आपल्या "कार्यकर्त्यांचा राजमिजास" उतरावा लागणार आहे. गावोगावी "बुथनिहाय" काम करावे लागणार आहे. "लोकसभेप्रमाणे फिल्डींग ताईट" करावी लागेल. असे न होता जर "गाफील राहिले" तर त्याचे "बजेट" नक्की बसेल असे "राजकीय वर्तुळात" बोलले जात आहे.
==================
आदरणीय "अरुण जेटली" साहेबांना "सार्वभौम" कडून भावपुर्ण "श्रद्धांजली"
 =====================

         --  सागर शिंदे

=====================

              जाहिर आभार

----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ३८ दिवसात  ७५ बातम्यांच्या जोरावर  ४ लाख २५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

             


            - सागर शिंदे