"पिचड साहेब" ठराविक तरुणांची "मक्तेदारी" 'तारक' नाही "मारक" ठरेल...






      अकोले (प्रतिनिधी) :- "राजा तशी प्रजा", अशी खूप जूनी म्हण आहे. पण राजा दयाळू आणि प्रधान मंडळ माजुरी असतील तर प्रजा राजावर कधीच समाधानी रहात नाही. तसेच काहीसे चित्र अकोले तालुक्याचे आमदार पिचड साहेब यांच्या व्यवस्थापनाबाबत पहावयास मिळत आहे. साहेब "राजा माणूस" आहेत. पण, त्यांच्याभोवती जी ठराविक "तरुणांची मक्तेदारी" सुरू आहे. त्यामुळे वैभव पिचड यांच्या प्रतिमेला गालबोट लागताना दिसत आहे. यावर योग्यवेळी अंकूश ठेवता आला तर ठिक, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या वाच्चाळ तोंडाचा खूप मोठा फटका साहेबांना सहन करावा लागणार आहे. म्हणून वय गेल्यानंतर सोय येण्यापेक्षा आमदारांना खाली पहायला लागेल असे वर्तन कार्यकर्त्यांनी टाळले तर स्वत:च्या प्रेरणास्थानावर क्रुपा होईल. असे मत राष्ट्रवादीचे जाणकार, समाजसेवक व सामान्य व्यक्तींनी व्यक्त केले आहे.
आमदार आले काय अन् गेले काय, आमचा फुल राडा !

            गेली ३५ वर्षे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अकोले तालुक्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करून ठेवला होता. अगस्ति साखर कारखाना, कांदा मार्केट, दुधसंघ, शिक्षण संस्था, ट्रस्टी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर "घड्याळ" दिमाखात उभे होते. खूप मागचा इतिहास उगळत नाही. फक्त २०१७ साली झालेल्या निवडणुकांचा विचार करू. गट आणि गणात काय चित्र बदलले.! डॉ. किरण लहामटे पिचडांच्या बालेकिल्यातून उभे राहिले. किल्ल्याला खिंडार पाडून त्यांनी पुन्हा उद्याच्या आमदारकीची मशाल पेटविली आहे. हे बळ दिले कोणी ?. जालिंदर वाकचाैरे या व्यक्तीमत्वाने अकोल्यात भाजप औषधाला नव्हते तेव्हापासून आरएसएस पद्धतीने कमळ फुलविले, बघता-बघता अशोक भांगरे, शिवाजी धुमाळ, साै सुनिता भांगरे, डॉ. किरण लहामटे, भाऊसाहेब वाकचौरे, वसंत मनकर, सिताराम भांगरे यांसारखी मोठी फळी उभी राहिली. जरी निवडणुकीच्या तोंडावर यांची दानाफान करणे तुम्हाला काही नवे नाही. पण आपल्याला किती विरोधी पक्ष तयार होतोय याचे चिंतन नक्कीच झाले पाहिजे. पुर्वी काँग्रेस, संयुक्त महाराष्ट्र समिती, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष हे प्रबळ होते. त्यांनी सत्ता भोगली. पण आता  शिवसेना हाच आपला विरोधक आहे. तर बाकीचे आपली "बी टिम". असणार आहे.
       
 अर्थात माजी मंत्री पिचड साहेबांना १९९५ वगळता मोठे मताधिक्य कधी मिळाले नाही. त्याच पावलावर पाऊल ठेऊन आपला अल्पमताचा प्रवास सुरू आहे. मात्र, एक दिवस हा प्रवास स्थिर होण्याआधी आपण जे प्यादे पोसत आहात त्यांचा फायदा करून घेणे गरजेचे वाटते. आपल्या नावाचा आधार घेऊन अकोल्यात कोणकोणते धंदे चालतात हे अकोलेकरांना माहित नाही, असे आपल्यापैकी कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. पण तुमच्या आशिर्वादाने सर्व अलबेले सुरू असेल तर तुम्हाला प्रचार देखील करायची गरज पडायला नको इतके काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. अर्थात भाजप सेनेची सत्ता आहे, तालुक्यात विकास नाही, या विरोधात तुमच्या आसपास फिरणाऱ्या तरुणांनी किती आंदोलने केली ? किती मोर्चे काढले, किती लोकांचे प्रश्न सोडविले ? किती वेळा रस्त्यावर उतरले ? किरकोळ अपवाद सोडून दाखवा तरी. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्त्यांपेक्षा एक डॉ. अजित नवलेंसारखा समर्थक तुम्हाला लाभला असता तर ७०टक्के काम तुमचे मार्गी लागले असते. अर्थात नवलेंचा फायदा आपल्यासाठी "अतुलनिय"आहे. तो विषयच वेगळा. पण, असे होताना दिसत नाही. परंतु ते रिकमटेकडे "काम सोडून तरवाड उपटण्याची" नामी संधी नेहमी शोधत असतात. साहेब काल "जिल्हा परिषदेला" जनतेने तुम्हाला नाकारले, इतकेच काय "पंचायत समितीत" तुमचा "वियज आहे कि पराजय" हे आम्ही नव्याने तरी काय सांगायचं. शहरात तरुणाई शिवसेना भाजपकडे जास्त का वळली. याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. की, तुमच्याच अवतीभोवती असणाऱ्या व्यक्ती आता कुरघोड्या करू लागले आहेत. त्यामुळे "कुपनच शेत खात असेल तर... सगळ्या पिकाची नासाडी होऊनही, किड हाती लागत नाही". असे होऊ नये म्हणून या लेखातून इतका उहापोह मांडावा लागला. कार्यकर्ते आहे म्हणून पक्ष व नेता असतो, आणि त्यावर "जय पराजय" अवलंबून असतो. या कशावरच तुमची धुरा नाही. "साहेब ही जागा राखीव नसती तरी",  तुमची बुद्धीमत्ता, जनतेने ठेवलेला विश्वास, काम, लोकांचा संपर्क आणि योग्य वेळी योग्य चालींचा खेळ. हेच तुमचे तारक माध्यम आहे. बाकी तालुक्याचे विभाजन होऊद्या ! मग कळेल तुमचा एकनिष्ठ कोण, तुमच्यातला कम्युनिष्ठ कोण आणि पक्षनिष्ठ कोण.!
आम्हीच फक्त ४ डोके, बाकी सगळे येडे भो....
        या लेखाच्या माध्यमातून कोणाची नावे टाकू वाटली नाही. कारण फक्त एकच आहे की; हा लेख फक्त नावांनीच भरवायचा नाही. साहेब तुम्ही व्यक्तीश: समाजभिमूख आणि विकासपुरुष आहात. पण, तुमच्या आवती- भोवती काट्यांचे कु़ंपन आहे. असे मत जाणकारांचे आहे. "इडा पिडा जावो", येणारी "५० वर्षे" पिचड साहेबांचे राज्य अकोले तालुका मान्य करो हीच सदिच्छा.
------------------------------
     - सागर शिंदे