"वेदांत अजूनही जीवंत आहे, मेलय ते फक्त प्रशासन"


अकोले (प्रतिनिधी) :- "वेदांत देशमुख" म्हणजे 'कधी न संपणाऱ्या वेदनेचा अंत' होय. माणसाचे अस्तित्व संपल्यानंतर आत्मा त्रुप्त असेल तरच तो देवाच्या हवाली होतो. मात्र, वेदातला चार वर्षे उलटूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्याचा आत्मा अजूनही हत्यारांकडे उघड्या डोळ्यांनी पहात आहे. तर न्यायासाठी माता-पित्याला साद घालत आहे. तो जिवंत आहे, मात्र निर्ढावलेले प्रशासन मेले की काय ? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. जर या तपीसाची पुढील सुत्रे सीबीआयकडे दिली नाही तर उंचखडकचे ग्रामस्त १५ आॅगस्ट २०१९ रोजी गावातच अमरण उपोषणास बसणार आहे. त्यामुळे वेदांतच्या आठवणी पुन्हा जाग्या होणार असून झोपलेल्या प्रशासनाला जागे करणार आहे.

        नरेंद्र दाभोळकर, पानसेर, कुलबुर्गी, गाैरी लंकेश, जवखेडे, कोपर्डी, खर्डा, शिना बोरा, खाैरलांजी, अरुषी, अशोक लांडे असे कित्तेक प्रकरणे आहेत जी महाराष्ट्र पोलीसांनी पाच दहा वर्षांनी तपास लावून पिडितांना न्याय मिळवून दिला आहे. मग वेदांत प्रकरण त्यापैकी एक का होऊ शकत नाही ? की असेच खून दडपण्याची थेरी पोलीस प्रशासन अवलंबवित राहणार आहे?. गेल्या काही वर्षापुर्वी विरगाव येथे दरोडा पडला होता. बनावट आरोपी उभे करून निव्वळ दोषारोपपत्राची कागदे रंगविली गेली. अखेर झाले काय ? सर्वजण निर्दोष सुटली. या प्रकरणात वेगळे आहे तरी काय. दिड हजर पानांचे दोषारोपपत्र, त्यात एक महत्वाचा पुरावा वगळता दुसरे काहीच नाही. निव्वळ परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधार घेऊन वास्तवाला भर्कटून कागदी गठ्ठ्यांना पिना मारण्यात आल्या आहे. एक आरोपी अटक केला, त्यात कोणतीही कबुली नाही, प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही, सबळ असे कोणाचे जबाब नाही, कोठेही काॅल डिटेल्स जुळत नाहीत. जबाब मात्र सगळ्या गावाचे घेऊन विचारमंथन झाले. पण सुगावा कसला लागला नाही. सगळ्या गावची लोकसंख्या हजार, त्यात जाणकार सातशे डोकी. पहिल्यांदा झालेला तपास हा अक्षरश: प्रेमीयुगलासारख्या गप्पा मारतात अगदी तसाच झाला. पण कोणाला पाच बोटं मारुन सत्य बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न झाला नाही. तपास अपयशी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यावर सद्या भाष्य करणे योग्य नाही. पण, वेदांतला न्याय देण्यासाठी ठराविकच डोके पुढे सरसावली होती. बाकी अन्य संशयीत पोलिसांच्या फक्त नजरकैदेत होते. आणि ती तशीच दुर्लक्षीत झाली. ती केवळ तपासातील हस्तक्षेपामुळे. वास्तव पाहता हा तपास वेळीच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग होणे आवश्यक होते. मात्र, काही नाते जपत असताना त्याकडे अनावधानाने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पोलीस आणि गावकरी यांच्यात जे भितीचे वातावरण होते ते अगदी शुन्य झाले. याचा परिणाम असा झाला की, जो कोणी आरोपी आहे तो, गावातल्याच मानसांमध्ये पुर्णपणे निर्ढावून गेला. हीच मोठी चूक आरोपींपर्यंत पोहचू शकली नाही. कारण, जो खरोखर हरवला आहे तो सापडू शकतो. मात्र, जो आपल्यातच दडून बसला आहेे, तो कधीच सापडू शकत नाही. हीच गोष्ट वेदांत प्रकरणात प्रकर्षाने पहावयास मिळाली. याहुन स्पष्टच सांगायचे झाले तर घटनेतील आरोपी गावातून खूप दूर नसावा हा देखील एकंदरीत अंदाज नाकारता येत नाही.
           
विशेष बाब म्हणजे पोलीस प्रशासनाला वेदांतच्या म्रुत्युचे कारण देखील शोधता आले नाही. "नरबळी" म्हणून वेदांतचा पहिला बळी जर कोणी दिला असेल तर ते पोलीस प्रशासनाने. नरबळी व खून  कायद्यान्वे गुन्हे दाखल झाले. परंतु ना खून सिद्ध झाला ना नरबळी. हा केवळ चालढकल करणारा तपास आहे. असेही मत जाणकारांनी व पोलीस प्रशासनातल्या व्यक्तींनी केले होते. खरेतर नरबळी हा प्रकार करताना जे काही साहित्य लागते, वेळ, आणि लक्षणे दिसतात, त्यापैकी वेळ वगळता कोणतेही साम्य वा सबळ पुरावा नाही. हत्या केली खरी परंतु त्याला नैतिक अनैतिक असे कोणकोणते अंग आहे, हे तपासताना पोलिसांनी तपास सोडून गावातील अन्य उचापतींवर इंट्रेस व्यक्त केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने तपासाची दिशा बदलली.
        याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यापासून तर सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्यापर्यंतचा प्रवास अगदी निराशाजनक आहे. पोलीस निरीक्षक प्रविणकुमार लोखंडे व सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी समाधानकारक तपास केला असे म्हणावे लागेल. याचे कारण म्हणजे "चव जाऊन चोथा उरला" अशी गत तपासाची होती. अशात या दोन अधिकाऱ्यांनी सरकार ग्राह्य धरतील अशा दोन गोष्टी दोषारोपपत्रात जमा केल्या. त्यानंतर नार्कोटेस्टवर प्रकरण येऊन थांबले. त्यानंतर तपास हा कायम तपासावर असल्याचे सांगण्यात आले. ते आजवर....           
चार वर्षानंतर वेदांतला न्याय देण्यासाठी गावकरी पुन्हा एकवटले आहे. याचे कारण म्हणजे वेदांतच्या हत्येचे मुळ कारण समोर येऊ शकले नाही. तर्क वितर्कावर अजूनही गावातील पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. गावाने हुशार, शांत, संयमी, नितळ आणि निर्मळ स्वभावाचा एक वेदांत गमविला आहे. आता दुसरा कोणी वेदात गमवायचा नाही. म्हणून गाव एकमुखाने १५ आॅगस्ट रोजी चव्हाट्यावर उतरणार आहे. पाहु प्रशासन यावर काय भूमिका घेेते. कोणाच्या मध्यस्तीने यावर पुन्हा पडदा पडतो हे पाहण्यास महाराष्ट्र उत्सुक आहे.

वेदांत मारेकऱ्याचा शोध का लागला नाही ? याला जबाबदार कोण ? संशयीत घटनाक्रम कसा आहे ? कशी दिशा मिळेल तपासाला? 
---------------------------
वाचा क्रमश: भाग २
एस. एस. शिंदे