"ब्लु पँथर" हरपला; "राजा ढाले" काळाच्या पडद्याआड

राजा ढाले एक "ब्लु पँथर"

    सागर शिंदे
----------------------
          चळवळ ही शब्दात नाही तर रक्तात असावी लागते. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घेतले, त्यांनी रक्ताचे पाट वाहिले तरी चालेल पण, चळवळीचा हा रथ थांबू दिला नाही. असा त्यातलाच एक पँथर म्हणजे "राजा ढाले", ज्यांनी दलित पँथर ही संघटना एका लेखाने संपुर्ण देशात नावारुपाला आणली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत "मेला पण गहान राहिला नाही". असे हे राजबिंडे वादळ. खरतंर जो माणूस डॉ. बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आणि समाजमान्य होता, असा व्यक्ती खऱ्या अर्थाने "राजा" माणूस होतो. तर, जो उभी हयात अन्यायावर वार करत डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करणाऱ्यांवर घाव घालून साम, दाम, दंड, भेद अशा "ढालीने" आंबेडकर वादाचे रक्षण करतो, तो म्हणजे 'राजा ढाले'. हा "ब्लु पँथर" आज काळाच्या पडद्याआड झाला आहे.
          तसातर स्वातंत्र्यापुर्वीचाच काळ, १९४० साली सांगलीतून एका वाघाची पाऊले अगदी सहा वर्षाचे असतानाच मुंबईवर चालुन गेली. भारताच्या इतिहासाला लाजवेल अशा अस्प्रश्यतेची शिकार करण्यासाठी. आमच्या बाळांचे पाय पाळण्यात दिसत नाहीत. तर, ते रस्त्यावर  उतरून डरकाळी फोडताच भल्या-भल्यांच्या पायाखालची वाळू सरकवत असतात. हेच सिद्ध केेले आमच्या प्रत्येक पँथरने. त्यातलाच हा एक ढाण्यावाघ होय. शाळा  शिकत असतानाच सुंदर हस्ताक्षर, परखड मत, अन्यायावर बंड, विद्रोही कविता आणि चुटकी वाजवून जाब विचारायची ताकद त्यांच्या अंगी रुजली होती. बघता-बघता मुंबईच्या सिद्धार्थ विहारात बैठका सुरू झाल्या. चळवळ म्हणजे काय हे अभ्यासताना शरिरात रक्त हिंदोळ्या घेत होते. शब्द अबोल असेल तरी ढाले याचे शस्र म्हणजे लेखणी होती. त्यानुसार ते अन्याय आणि जातीवादावर असूड ओढत होते. १९५८ साली त्यांनी अण़्णा रणसिंगे यांच्या सहकार्याने दलित साहित्य संमेलन गाजविले. तेव्हापासून लेखणीने प्रचंड वेग घेतला. लेख, कविता, समिक्षण, विश्लेषण यातून त्यांचे नाव लेखन क्षेत्रात सन्मानाने घेऊ लागले.  त्यानंतर त्यांचा संपर्क प्रा. आर. तेंडुलकर, सी. टी खानोलकर, बी. पाध्ये, बी. नेमाडे, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले यांच्याशी झाला. दरम्यानच्या काळात अन्याय आणि प्रखर चळवळीने इतके रक्त खवळून उठले होेते की, कोठेतरी न्यायासाठी उद्रेख व्हावा आणि तुटून पडावं या पापी व्यवस्थेवर अशी धारधार चळवळ उभी राहिली होती.
             याच दरम्यान राज्यात एका गावात दलित मुलीवर अत्याचार झाला. मग काय ! सगळे "ब्लु पँथर" अन्यायावर तुटून पडले. बघता-बघता ही चळवळ इतकी प्रखर बनली की कोणाला हात लावला तर रक्ताचे पाट वाहतील इतका अंगार प्रत्येकाच्या अंगी दुथडी भरून वाहू लागला होता. याच काळात जातीयवादी लोकांनी दलितांवर बहिष्कार टाकला. तर उच्चभ्रु जातीने शब्दोच्चार केले. दलित महिलांनी वेश्या व्यवसाय केला तर बिघडलं कोठे. त्यावर ढाले यांनी भर सभेत प्रतिउत्तर दिले होते. "अशा व्यवसायाला आपल्यापासूनच सुरूवात करा" हे वाक्य एका स्रीला फेकून मारल्याने या वाक्यामुळे "आग्नित घासलेट पडल्यासारखे झाले". त्याचे पडसाद राज्यभर उमटले. ढाले यांनी या प्रकरणावर "काळा स्वातंत्रदिन" असा लेख लिहीला. यावेळी सर्व विरोधक एकवटून आले आणि त्यांना विरोध म्हणूनच जनू संघटनाला सुरूवात झाली.
 "शिका", "संघटीत व्हा", "संघर्ष करा", हे डॉ. बाबासाहेबांचे ब्रिद कोणी विसरले नव्हते. त्यामुळे संघर्ष करायचा असेल तर संघटन हवे हा एकविचार झाला. त्यावेळी अभ्यासू व्यक्तीमत्व पुढे आले. त्यानंतर अमेरिकेत कृष्णवर्णीयांची प्रेरणास्रोत असलेली "ब्लॅक पँथर" या संघटनेचा प्रभाव "दलित पँथर" पडला. १९६६ साली ह्यू.पी. न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पँथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलँड येथे केली. त्याची चर्चा सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमधे होत असे. वास्तविक अशाच प्रकारच्या संघटनेने आपले नेतृत्व करावे यासाठी सगळ्या तरुणांनी प्रयत्‍न सुरू केले. आणि आक्रमक अशी दलित पँथर २९ मे १९७२ साली उभी राहिली. त्यासाठी राजा ढाले यांचे भरीव योगदान आहे. अध्यक्ष कोणीही व्हा, पण पँथर  उभे करा, ही पहिली भूमिका ढाले यांनी घेतली होती. जर पदासाठी आणि श्रेयवादासाठी तेव्हा कोणी हपापले असते तर आज अॅड. प्रकाश आंबेडकर व लक्ष्मण माने यांच्यासारखी आवस्था झाली असती. आणि आज तरी आपण सक्षम आहोत, नाहीतर अगदी सगळ्यापासून "वंचित" राहावे लागले असते.
                 असो...! पुढे १५ ऑगस्ट १९७२ च्या एका विशेषांकात राजा ढाले यांचा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख प्रसिद्ध झाला आणि संपूर्ण राज्यात आहाकार माजला. त्यातून दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी त्यात  प्रवेश केला. खऱ्या अर्थाने विचार केला तर, ढाले यांच्या लेखाने दलितांची मस्तकं ठिकाण्यावर आली. आणि सुरू झाली दलित रणसंग्राम. पण ही चळवळ जास्तकाळ तग धरू शकली नाही. पद्मश्री नामदेव ढसाळ हे कम्युनिष्ट विचारसारणीचे होते, तर ढाले आंबेडकरवादी. ढाले यांनी बुद्ध स्विकारला, पण तो संयमासाठी नव्हे, फक्त विचारांनी. आंबेडकरवाद हा प्रखर आहे आणि तो कायम राहिला पाहिजे. त्यांना माहित होेते. गांधीगिरी स्विकारली तर न्याय मिळणे शक्य नाही. मागितले तर भिक मिळते, हक्क भांडूनच घ्यावे लागतात. यावर ते ठाम होते. ढसाळांच्या विद्रोहाला "नामा" म्हणून त्यांनी विरोध केला होता. बुद्धीझम की कम्युनिझम याने दलित पँथरमध्ये फुट पडली. अखेर ढसाळ यांनी १९७४ ला नागपुरात दलित पँथरचे अधिवेशन घेतले. त्यानंतर स्वत:चा वेगळा गट तयार केला. अवघ्या दोन वर्षातच म्हणजे १९७६ साली राजा ढाले यांच्या गटातून "भाई संगारे" व आजचे समाजकल्याण मंत्री अविनाश महातेकर" बाहेर पडले. या दोघांनाही त्यांचा पुन्हा वेगळा गट निर्माण केला आणि दलित पँथरला उतरती कळा लागली. काल एकमेकांच्या हातात हात घेऊन डरकाळी फोडणारे वाघ, सगळे विखूरले गेेले. येथील राजकीय कुत्र्यांनी चक्क सगळे पँथर चावून खाल्ले असे म्हटल्यास वावघे ठरणार नाही. अखेर व्याघ्रहीन जंगलास दि. ७ मार्च १९७७ रोजी राजा ढाले यांनी बरखास्त केले. अवघी दलित पँथर कागदवर देखील पहावयास राहिली नाही.
   पुढे ढाले यांनी नाशिकमध्ये ‘मासमुव्हमेंट' या संघटनेची स्थापना केली. त्यांच्या या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे, मनोहर अंकुश, रामदाम आठवले, दयानंद म्हस्के, ज. वि. पवार, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर अशा अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दि. २८ एप्रिल १९७७ रोजी औरंगाबाद येथे भारतीय दलित पँथरची निर्मिती केली. आणि "टायगर अभी जिंदा है" चा नारा दिला. अर्थात काळानुरूप अन्य सगळे मागे पडत गेले. राज्यातील अन्य पक्षांनी लाचार पँथरांची शिकार केली. प्रितमकुमार शेगावकर सारखे सत्तेसाठी प्रस्तापित पक्षात गेले तर कोणी चळवळीतून बाहेर पडले, भाई संगारे, वाघमारे यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले तर "विजय वाकचौरे" यांच्यासारख्यांना डोईजड होऊच दिले नाही. त्यात आठवले गटाने शेवटपर्यंत गड लावून धरला. मात्र, आजच्या लाचार परिस्थितीवर भाष्य न केलेलेच बरे.!
        त्यानंतर राजा ढाले यांनी सन १९९९ रोजी भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर उत्तर मुंबई व २००४ साली ईशान्य मुंबईतून लोकसभा लढविली. मात्र, त्यांना यश आले नाही. वयाच्या ७८ वर्षात त्यानी रक्ताचा थेंबन् थेंब चळवळीसाठी बहाल केला आहे. त्यांच्या कार्यामुळेच आज हा चळवळीचा गाडा इतपर्यंत येण्यात सिंहाचा वाटा आहे. अशा भिमयोद्ध्याने दि. १६ जुलै २०१९ रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या आठवणींवर प्रकाश टाकणारा हा लेख.
जय भिम
---------------------
   - सागर शिंदे
    (अभ्यासक)