थोरातांभोवती मुख्यमंत्री, विखे व पिचडांचे "चक्रव्यूह", "पठारावर रंगणार २० गावांत "मतयुद्ध"


आता तर घरात घुसतय भाजप

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
                   ना. विखे व आ. थोरात यांच्यातील वादात नगरच्या राजकारणाने वेगळी कलाटणी घेतली आहे. आ. थोरातांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का लावण्यासाठी खालून (लोणी) विखे तर वरुन (अकोले) पिचड यांच्यामध्ये त्यांची गळचेपी होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मोहदयांना पाडण्यासाठी दोघांनी "चक्रव्यूह" आखले आहे. त्यातील एक भाग म्हणून संगमनेर "पठार" भागातील थोरात साहेबांच्या गोटाती २० गावांमध्ये अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. लवकरच पठार भागावर थोरात पुर्णत: वर्ज होऊन पिचडांचे प्राबल्य वाढले जाणार आहे. त्यामुळे नेहमी पिचडांना लिड देणारे थोरात आता पिचडांशी "मतयुद्ध" खेळणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. 

म्हटलं होतं माझा नाद करू नका

काँग्रेसमधून बंड केलेले विखे पाटील पिता- पुत्र तर राष्ट्रवादीतून बंड करणारे पिचड पिता- पुत्र यांनी मंत्री होण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांचा एकच अजेंडा असून राहुल गांधी यानी डोक्यावर घेतलेल्या बाळासाहेब थोरात यांचा मिजास जिरवायचा आहे. त्यामुळे थोरात साहेबांच्या बालेकिल्ल्यात खिंडार पडायचा चंग ना. विखे यांनी बांधला आहे. त्याचाच एक पार्ट म्हणजे सगळा देश भाजपकडे वाटचाल करीत असताना त्याची "लत" संगमनेरमध्ये देखील लागली आहे. कालच्या पिचड पुत्रांच्या भाजप प्रवेशाचे लोण संगमनेर तालुक्यापर्यंत येऊन पोहचले आहे. काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आणि काही सहकारी संस्थाचालकांनी नुकतीच वरिष्ठ भाजप पदाधिकार्यांची भेट घेतल्याची माहिती हाती आली आहे. त्यांनी प्रवेश करण्याबाबत मुंबईत चर्चा देखील केल्याचे समजते आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात आणि राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीचा विखे-पिचडांनंतर तिसरा अंक आता सुरू झाला आहे. तिसऱ्या अंकाच्या प्रवेशाची सुरूवात पिचड-पिता-पुत्रापासून झाली. आता या शेवटच्या अंकातील खरे हिरो कोण आणि व्हिलन कोण ? हे पाहण्याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे. आता राजकीय दृष्ट्या केंद्रभूत झालेल्या संगमनेर तालुक्यात राजकीय भूकंप घडविण्याचे मनसुबे भाजप नेत्यानी रचले आहेत. या सर्व घडामोडीत तालुक्यातील आणि जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना तसेच दोन्ही मंत्र्याना दूर ठेवून मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आपल्या स्वतःच्या यंत्रणेतून तालुक्यातील काही थोरात समर्थकाना आपल्या जाळ्यात ओढल्याचे सांगण्यात येते. यासाठी जुन्या काही राजकीय मैत्रीचा त्यांनी उपयोग केला आहे.
राजकीय घडामोडीची ही प्रक्रीया लोकसभा निवडणुकी पुर्वी सुरू झाली होती. पण, काहीकाळ थांबलेली राजकीय खेळी, आता वेगाने सुरू झाली आहे. त्यातच आ.थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपाने पुन्हा संगमनेरवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे नेता येत नसला तरी कार्यकर्ता फोडायचा हेच सुत्र भाजपने अवलंबविले आहे. लोकसभा निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना ज्या पध्दतीने युतीने घेरले आणि त्यांचा दारून पराभव केला. सेम तोच प्रयोग विद्यमान प्रदेशाध्यक्षांवर राबविला जात असल्याचे दिसत आहे.  त्यासाठी जूने जाणकार आरएसएस संघटक, निष्ठावान कार्यकर्ते, विश्वासू व्यक्ती यांची टिम संगमनेर तालुक्यात कार्यरत झाली असल्याचे बोलले जात आहे. ही रणनिती भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी आखली असल्याचे सांगण्यात येते. केवळ भाजप म्हणून ही रणनिती यशस्वी होण्यात असलेल्या मर्यादा मुख्यमंत्री ओळखून असल्याने थेट थोरात गटालाच खिंडार पाडून काँग्रेस अध्यक्षांनाच धक्का देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. 

"कल की दोस्ती आज बनी दुष्मणी" 

संगमनेर तालुक्यात थोरात यांचे सहकारात प्राबल्य आहे. नगरपालीका त्यांच्या ताब्यात आहे. यासाठी या संस्थामधील काही आजी-माजी संचालक, नगरसेवक यांच्याशी थेट संपर्क साधून मुख्यमंत्रांनी धक्का तंत्राची रणनिती तयार केली आहे. यासाठी आता जेष्ठ नेते मधुकर पिचड यांची मदत भाजपा घेणार आहे. कारण; थोरात यांच्या सहकारी संस्थांचा कारभार पिचड यांच्या सहकार्याने सुरू आहे. कारखाना, दूधसंघ आणि जिल्हा बँकेत थोरात-पिचड यांची भूमिका कायम एकच राहीली आहे. त्यामुळे थोरात यांचे बहुतांशी संचालक पिचड यांच्या सपर्कात आहेत. या राजकीय संबंधाचा उपयोग पिचड यांच्या माध्यमातून करून घेण्याचे भाजपाने ठरविले आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील पठार भागातील २० गावे पिचड यांच्या अकोले मतदारसंघात येतात. पठार भागातील थोरात समर्थक कार्यकर्ते संस्थाचे आजी-माजी संचालक आता भाजपच्या गळाला लागण्याची निश्चित झाले आहे.

थड सर्जिकल स्ट्राईक

 मुख्यमंत्र्यानी जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात स्वतः लक्ष घातले आहे. एवढेच नाहीतर या मतदारसंघातील हालचालीवर त्यांचे बारीक लक्ष आहे.
भाजपाची सुरू होत असलेली यात्रा नगर जिल्ह्यात येत आहे. चाणक्ष मुख्यमंत्र्यानी अकोले संगमनेर पासून जिल्ह्यातील यात्रेच्या टप्प्याला प्रारंभ करण्याचा निर्णय दूरदृष्टीतून घेतला आहे. जिल्ह्यात येण्यापर्वी अकोल्याची राजकीय शस्रक्रीया यशस्वी केली. आता संगमनेरात येण्यापुर्वी थोरात यांनाही धक्का देण्याचा भाजपाचा राजकीय डाव आहे. म्हणून थोरात समर्थक गळाला लावण्याच्या प्रक्रीयेला सुरूवात झाली असून, याचाच एक भाग म्हणून यातील काही व्यक्ती मुख्यमंत्र्याना भेटल्याची माहिती सूत्रांनी दिल आहे.
भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक हे पुर्वी संगमनेरात संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. त्यांना या तालुक्याची राजकीय सामाजिक पार्श्वभूमी चांगलीच माहीती असल्याने त्यांच्या संगमनेरातील अनुभवाचा मोठा उपयोग या राजकीय सर्जिकल स्ट्राईकसाठी होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात खूप काही बदल होणार आहेत. हेच पाहण्यासाठी जनतेत उत्सुकता राहणार आहे.
---------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १५ दिवसात ३५ बातम्यांचे १ लाख ८८ हजार वाचक पुर्ण केले आहे. हे सर्वात लोकप्रिय असल्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते. 
---धन्यवाद ---
सागर शिंदे  (संपादकीय)
------------------------

        संगमनेर प्रतिनिधी

      

           सुशांत पावसे

--------------------------