अखेर..डॉ. किरण लहामटेंना "राष्ट्रवादीची उमेदवारी फायनल"; "दादा पिचडांवर भडकले" बैठक संपन्न

दादांनी केले तिकीट फिक्स

अकोले (प्रतिनिधी) :-
                पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला धोका दिला. त्यामुळे भाजपचे डॉ. किरण लहामटे यांनी आज दि.२९ रोजी अजित पवार यांची भेट घेतली. लहामटे यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून त्यांना राष्ट्रवादीचे तिकीट फायनल झाल्याची माहिती सुत्रानी दिली. त्यामुळे भाजपच्या दबावापोटी राष्ट्रवादीच्या विश्वासाचा  गळा घोटणाऱ्यांना आता सोडायचे नाही. हा पडता काळ खूप दिवस रहात नाही. उद्याचा दिवस आपलाच आहे. असे ठणकावून सांगत दादांनी कोणाचे नाव न घेता पिचडांवर टिका केली. इतकेच काय तर शरद पवार साहेबांनी देखील पिचडांवर टिका करत राष्ट्रवादीला स्वार्थापोटी जवळ येणाऱ्यांची गरज नाही. पक्ष कोणी एक व्यक्ती म्हणून चालत नाही. पण, प्रत्येकाला ज्याचीत्याची जागा दाखवून देऊ. असे वक्तव्य साहेबांनी केले आहे. त्यामुळे अगदी ताटात बसलेल्या पिचड साहेबांनी घास मोजून किंमत केल्यासारखे झाल्याने या बंडाचे शल्य काढण्यासाठी पवारांनी डॉ. किरण लहामटे यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. आता तो सार्थ ठरला तर ठिक नाहीतर पिचडांकडे फितूरीची जादू आहे. ती कांडी फिरली तर "ये रे माझ्या मागल्या" अशी गंमत अकोल्यात पहायला मिळाली नाही म्हणजे बरे. !

वैभव पिचड यांनी बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी  लगेच उमेदवाराच्या शोधात निघाली होती. "कोलंबसाने इतके किनारे चाचपले नसतील इतकी मानसे राष्ट्रवादीने अकोल्याच्या उमेदवारीसाठी चाचपली". कारण, दुधाने पोळल्यानंतर पवारांनी ताकही फुकून पिणे पसंत केले आहे. मात्र, अकोल्यात पक्ष आणि निष्ठा त्यांना कोठे मिळून आली नाही. जनतेसाठी आरडाओरड दाखवायची, पिचडांच्या विरोधात मोर्चे, आंदोलने काढायची आणि आतून "अर्थ"पुर्ण तडजोडी करायच्या. हेच राजकारणी "गोरख धंदे" निदर्शनास आले. सगळ्यांची चाचपणी केल्यानंतर स्वत: पवार साहेबांनी बाळासाहेब जगताप यांना डॉ. लहामटे यांच्याकडे पाठविले होते. त्यांनी रविवारी (दि.२८) अकोल्यात येऊन लहामटे यांना मुंबईचे निमंत्रण दिले. अखेर आज विरोधीपक्षनेते धनंजय मुढे, अजित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह अन्य नेेते व कार्यकत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
       

प्रत्येकाचे दिवस येतात, काळजी नसावीय

यात डॉ. लहामटे यांचे तिकीट फायनल झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे जरी अकोल्यात वैभव पिचड यांनी पक्षाला "रामराम ठोकला" तरी पिचडांच्या विरोधातील "सुप्त लाट", त्यांच्या पराभवाचे कारण ठरू शकते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, लोकसभेला किमान अकोल्याचा तरी काैल "भाऊसाहेब वाकचौरे" यांच्याकडे होता. कारण, असा एकमेव लोकप्रतिनिधी होता. की, त्यांच्या खासदारकीचा निधी जवळ-जवळ गावा-गावात पोहचला होता. परंतु त्यांना अपेक्षित मते मिळाली नाही. राजरोस खा. लोखंडेंना शिव्या घालणाऱ्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. तर, अखेरपर्यंत नगरमध्ये जगताप येतील की डॉ. विखे हे कोणी ठामपणे सांगू शकले नाही. त्यामुळे या सुप्त लाटेचा ठाव घेणे शक्य नाही. कदाचित डॉ. किरण लहामटे चांगल्या मतांनी निवडून येऊ शकतात, तर पिचडांचे निर्विवाद वर्चस्व संपुष्टात येऊ शकते. चला....घोडा आणि मैदान सोबत आहे. पवारांचे आशिर्वाद लहामटेंना कुठवर नेतात. याची उत्सुकता अकोलेकरांना आहे.
---------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १३ दिवसात ३३ बातम्यांचे १ लाख ९७ हजार वाचक पुर्ण केले आहे. हे सर्वात लोकप्रिय असल्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते. 
---धन्यवाद ---
------------------------------------

   "सार्वभाैम संपादक

       

       - सागर शिंदे