जिल्ह्याच्या "राजकीय परिघाचे" डॉ. सुजय विखेच "केंद्रबिंदू", पवार साहेबाना तो "बालहट्ट नडला"


"नगरची जागा सोडली असती तर"...

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
        लोकसभेची निवडणुक लागण्याआधीच डॉक्टरांनी "आॅपरेशनची" तयारी सुरू केली होती. एका दक्षिण "लोकसभेचे पोष्टमार्टम" करता करता त्यांनी जिल्ह्यातील सगळेच नेते "व्हेंटीलेटरवर" टाकले. ही सगळी राजकीय मोहीम त्यांनी यशस्वी केलीच. परंतु, पिताश्रींना भाजपात नेऊन मंत्रीही केले. ही लढाई इथेच संपली नाही तर विरोधक बाळासाहेब थोरातांना घाम फोडून त्यांच्याच "नाकावर टिचून" शेजारी बसून विमानवारी केली. जिल्ह्यातील काँग्रेसलाच सुरूंग लावला नाही. तर, राष्ट्रवादीला देखील खिंडार पाडून आ. "वैभव पिचड" व आ. "संग्राम जगताप" यांच्या हाती "बंडखोरीची मशाल" दिली. त्यामुळे विखे बोले अन् जिल्हा हले अशी परिस्थिती निर्माण करूण ठेवली आहे. म्हणून चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच प्रतिपादन केले की, नगर जिल्ह्याची संपुर्ण जबाबदारी ना. विखे पाटील यांच्याकडे सोपविली आहे. एकंदरीत विचार करता डॉ. विखे यांच्या सर्जिल स्ट्राईकमुळेच नगर जिल्ह्यातील राजकारणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे स्पष्ट होते. अर्थात लोकशाहीत व्यक्तीला दिलेले हेच खरे स्वातंत्र्य आहे.
         

"नडला तो संपविला, तो मी"

नगर दक्षिणचे साटेलोटे करण्यात काँग्रेसला यश आले नाही. एव्हाना ते बाळासाहेब थोरातांनी येऊ दिले नाही. असे बोलले जाते. पण, आता एका कुरघोडीचा फटका आख्या काँग्रेसेला किती सोसावा लागत आहे. हे सगळा महाराष्ट्र पहात आहे. कदाचित डॉ. सुजयला तिकीट न मिळण्यासाठी जितका जोर काँग्रेस अर्तर्गत गटाने लावला तितकी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची मनधरणी करण्यासाठी लावला असता तर आता कपाळाला हात लावून बसायची वेळ आली नसती.
        इतके होऊनही ना. विखे यानी काँग्रस सोडली नाही. पण पुत्राच्या बालहट्टापुढे त्यांनी शरणागती पत्कारली आणि एेन लोकसभा वातावरण जोमात असताना "न्युटरल" भूमिका बजावली. अखेर भाजप एकहाती सत्ता राखण्यात यशस्वी झाली आणि मग ना. विखे यांचा नियोजित भाजप प्रवेश निश्चित झाला. या दरम्याच्या काळात अनेक मोठ्या राजकिय उलथापालथ झाल्या. पवार साहेबांनी डॉ. विखेंचा "बालहट्ट" पुरविला नाही. मात्र, त्यांना पाडण्यासाठी व जून्या इतिहासाची पुनराव्रुत्ती करण्यासाठी प्राण पणाला लावले आणि  शिवाजी कर्डीले जगताप, भानुदास कोतकर, राजळे अशा अनेक बड्या नेत्यांची कोंडी केली. पण झाले काय ? शेवटी नगर दक्षिणच्या परिवर्तनाचा महामेरुमनी अखेर तोच बालक ठरला ज्याचा हट्ट पुरविण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी अपयशी ठरली.
       

"लढाई अजून संपली नाही "

आज एकंदर विचार करता डॉ. सुजय विखे यांच्या बंडखोरीने जिल्ह्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळाली. डॉ. विखे यानी पहिली सुरूवात आपल्या घरापासून केली. पिताश्री नामदार विखे यांना भाजपात घेऊन काँग्रेसला सुरूंग लावला. त्या पाठापोठ राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी मधुकर पिचड आणि आ. वैभव पिचड यांच्या हातातील घड्याळ काढून घेत कमळात बसविले. नगर शहरावर हल्लाबोल करीत आ. संग्राम जगताप यांना बंडाची भुमिका घेण्याचे ग्रहण लावले. हा "राजकिय रणगाडा" इथेच थांबला नाही. तर, श्रीगोंद्याचे आमदार  राहुल जगताप यांच्या बंडाची ठिणगी बाहेर पडली. या सर्व फुटातुटीला डॉ. सुजय विखे यांचा निर्णय पोषक होत गेला. अद्याप विधानसभा वातावरण निर्मिती सुरू आहे. तोवर जिल्ह्यात बहुताशी राजकीय परिस्थिती बदलणार आहे. पण विखे हे जिल्ह्यातील राजकारणाच्या परिघाचे केंद्रबिंदू ठरले आहे. इतकेच काय, "आगे-आगे देखो होता है क्या" ! असे म्हणत ते महाराष्ट्र काबीज करतील अशी परिस्थिती सद्यातरी त्यांच्यासाठी पोषक आहे.

"आखरी दम तर एकनिष्ठ"


एक महत्वाची गोष्ट इतकीच की, जर शरद पवार यानी एक नगर दक्षिणची जागा लोकसभेला सोडली असती तर काँग्रेस राष्ट्रवादीची जी आत्ता परिस्थिती आहे. ती झाली नसती. पवार साहेब म्हणजे "जाणता राजा" सहा आमदारांहुन साठ आमदार करण्याची ताकद त्यांच्या बाैद्धीक शक्तीत आहे. मात्र, आज तरी त्यांची चाल फोल ठरली असून सगळा सारीपाठाचा डाव उलटला आहे. उद्या होत्याचे नव्हते झाले तर ते साहेबांमुळेच आणि नव्हत्याचे होते झाले तरी ते साहेबांमुळेच. मात्र, काही झाले तरी सद्या या राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू विखेच आहेत. हे नाकारुन चालणार नाही.
---------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १२ दिवसात २९ बातम्यांचे १ लाख ४० हजार वाचक पुर्ण केले आहे. हे सर्वात लोकप्रिय असल्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते. 
🙏🏻धन्यवाद🙏🏻
------------------------------------

   "सार्वभाैम संपादक"

         

          - सागर शिंदे