"राष्ट्रवादीच्या" चिखलात फुलले "भाजपचे कमळ" अकोल्याचे "पिचड" पुन्हा ठरले विरोधकांना डोईजड


अकोले (प्रतिनिधी) :- 
                अकोले विधानसभा चांगलीच रंगात आली आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीचा चिखल तुडविणारे एकनिष्ठ पिचड साहेब आज भाजपात डेरेदाखल झाल्याचे बोलले जात आहे. यासाठी काँग्रेसचे बंडखोर नेते विखे पाटील यांनी खतपाणी घालून अकोल्यात कमळ फुलविले आहे. विशेष म्हणजे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहयोगाने हा बंडाळीचा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे उद्या अकोल्याची जागा भाजपच्या गोटात येणार यावर नकळत शिक्कामुर्तब झाले आहे. हा सर्व प्रकार अनपेक्षित असून यालाच राजकारण असे म्हणतात. त्यामुळे पक्षनिष्ठा, ईमान, शब्द असा काही प्रकार नसतो. हा नवा धडा लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांनी जनतेला दिला आहे. अर्थात हा सर्व प्रकार विखे - थोरातांच्या वादाचा एक भाग आहे. त्यामुळे विखेंच्या या खेळ्यांनी उद्या थोरात चेकमेट झाले तर तुम्हाला नवे वाटायला नको.
           

ये तो शुरुवात है  भाया..!

अकोल्याची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आ. वैभव पिचड यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असे वाटत होते. मात्र, धुरंधर म्हणा की धुर्त राजकारणी ना. विखे साहेबांनी वेगळेच फासे टाकले आणि अकोल्यातील राजकारणाचा आख्खा सारीपाठ बदलून गेला. ठाकरे साहेबांच्या भेटीनंतर अकोल्याचे "वैभव" कमळात दिसू लागले. गुप्त माहिती अशी की, अगदी कालच दादा मुंबईत होते. त्यांनी पिचड साहेबांना कानपिचक्या दिल्या आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाबाबत "टू बी आॅर नाॅट टू बी, द्याट इज द क्वशन"... "हे करावं की ते करावं असेच प्रश्न पिचड साहेबांना पडत होते", मात्र, विखे साहेबांनी सगळ्या प्रश्नावर उत्तर शोधले आणि अकोल्यातील राष्ट्रवादीचा बालेकील्ला भुईसपाट केला. आता, अकोल्यात खरी कार्यकर्त्यांची कसरत पहावयास मिळणार आहे. कालपर्यंत जे भांगरे व धुमाळ घसे फाडून पिचडांवर शब्दसंहार करीत होते. त्यांना पुन्हा मांडीला माडी लावून बळजबरीने का होईना व्यासपिठावर बसावे लागणार आहे. त्यात नवल असे की, या दोन्ही व्यक्तींना राष्ट्रवादी पक्षाशी वैर नव्हते तर व्यक्तीश: पिचडशाहीलाच त्यांचा विरोध होता. त्यामुळे भांगरे, मनकर' धुमाळ यांनी शिवसेना तर कधी भाजप जवळ केली. पण, पिचड नावाच्या सावलीने त्यांचा पिछा सोडला नाही. आता भाजपात दोन गट आहेत. त्यातील भांगरे गटाची, तोंड दाबून बुक्यांचा मार अशी गंमत होणार आहे.

ही दोस्ती तटायची नाय...

        अर्थात पिचडांचा पक्षप्रवेश हा तो त्यांच्या एकट्यापणाचा स्वार्थ नाही. तर, उद्या गायकर पाटील गट व वाकचौरे गट यांचाही विचार करावा लागणार आहे. उद्या जिल्हाबँक, झेडपीत सहभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेंवर पदाधिकारी अशा अनेक ठिकाणी ना. विखे यांचे निर्वीवाद वर्चस्व राहणार आहे. जर आजच्या राष्ट्रवादी नेत्यांचा "मिजास" कायम ठेवायचा असेल तर पिचड साहेबांना विखेशिवाय पर्याय नाही. आणि मनाजोगे हाती काही आले नाही तर बंडखोरी होते हे धुमाळांकडून हा धडा मिळाला आहे. कारण, याच नेत्यांच्या जिवावर पिचड साहेबांची धुरा अवलंबून आहे. हे देखील नाकारून चालणार नाही.
        आता "रात्र झाली कमी आणि साेंग झालेत फार". त्यामुळे पिचड साहेब या कार्यकर्त्यांना कसे सांभाळतात, आणि भांगरे व धुमाळ गट वर्सेस पिचडांचे विद्यमान समर्थक यांच्यात कसा ताळमेळ बसतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यात प्रस्तापित वाकचौरेंची इमेज भाजपात जास्त आहे. तिला धक्का लागणार आहे. त्यामुळे या चिखलात कमळ कसे फुलणार हा मोठा प्रश्न आहे.
---------------------------------
         - सागर शिंदे