अकोल्यात पिचडांची "लोकसभा रंगित" तालीम झाली, आता "विधानसभेचा आखाडा"


अकोले (प्रतिनिधी) :- 
        गेल्या पंचवर्षीकला डोळ्यासमोर ठेवले तर लाट मोदींचीच होती. पण "हवा" मात्र पिचडांची टिकून राहिली. अलिप्त लढाईत भांगरे-तळपाडे यांच्यातील मत विभाजन फॅक्टर पिचडांवर गुलाल उधळून गेला. पण तसेही इतिहास पाहिला तर पिचडांनी दोघांपैकी एकाला नेहमीच फितूर करून विधानसभेचा प्रवास आजवर यशस्वी केला आहे. त्यांना विरोधकही इतके भारी लाभले आहेत की, त्या दोघांनाही आमदार होऊ वाटतं पण; तळपाडेंना वाटतं मी नाही झालो तरी चालेल पण भांगरे नको. अन भांगरेंना वाटतं मी नाही झालो तरी तळपाडे नको. याच गोष्टीचा गेली अनेक वर्षे पिचडांनी फायदा घेतला आहे. अर्थात यालाच तर राजकारण म्हणतात. ते जमलं नाही तर ते राजकीय समिकरण कसलं. आणि हे असले गणितं मांडता आले नाही तर माजी आमदार पवारांच्या मांडीला मांडी लावून शिकले तरी काय..? असाही प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे आता त्यांनी लोकसभेत यशस्वी रंगित तालीम यशस्वी केली, आता विधानसभेच्या आखाड्यात उतरायचे आहे.......
         अर्थात उद्या विधानसभा येऊ घातली आहे. प्रत्येकजण स्वबळावर लढेल अशी परिस्थिती सद्यातरी वाटत नाही. कारण, लोकसभेत "मोदींची त्सुनामी" आणि शिवसेनेची त्यांच्यासोबत असणारी "गुटरगू" ही अती प्रमाणात दिसून येत आहे. आणि अंतर्गत असणारी बरीच काही खलबते. त्याचे विश्लेषण आपण करूच. पण, सद्या मनोमिलन बिथरेल असे काही वाटत नाही. आणि फडणवीस आजकाल खूप समायोजक झाले आहेत. पुन्हा महाराष्ट्राची गादी काबीज करायची असेल तर बाणाच्या टोकावर कमळाचे प्रेम जखडून ठेवावे लागेल. यात तडजोड नाही. हे आरएसएस प्रेणीत प्रशिक्षणात शिकविले जातेच. त्यामुळे विधानसभा स्वबळावर... हे असे नारे तुरळक एकायला मिळाले तर ते अश्चर्य वाटू देऊ नका.
        वास्तव पाहता मागीलवेळी मोदी लाट होती, हे नाकारुन चालणार नाही. पण यावेळी लाट वैगरेचा तर लवलेशही नव्हता.  उलट जनता सरकार विरोधी बाेंबा ठोकत होती. पण काय अन कोणती जादुची कांडी फिरली देव जाणे अन चक्क काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष सुपडा साफ झाला. आता इव्हीएमवर शंंका घेऊनही कोणी कोणाचे काहीच वाकडे करू शकले नाही. त्यामुळे तो विषय मनात आला तरी बाजूला ठेऊ.
      पण ही मोदी लाट अकोलकरांनी भर दुष्काळात नाकारली. चक्क अकोल्यातून काँग्रेसप्रणित कांबळेंना ३१ हजारांचे लिड मिळाले. याचा सरळ-सरळ अर्थ काय होतो, हे नव्याने तरी काय सांगायचे. पण मग मला हा ही एक प्रश्न पडतो. कालपर्यंत पिचडांना पाडण्यासाठी सगळे विरोधक कमळात बसले. अर्थात त्यांनी हवा देखील केली. पण सरकार सत्तेत आलं आणि यांना जसे "मिळत" गेले तसे हे "चळत" गेले. इतके की एकमेकांचे "अर्तवस्र सोशल मीडियावर" काढू  लागले. कालपर्यंत जे जनतेला प्रलोभने देत होते. पिचडांच्या विरोधात बोलत होते. त्यांनी त्यांचीच जागा सगळ्यांना खुलेआम दाखवून दिली. त्यामुळे आता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. असे म्हटल्यास काही वावघे नाही. आणि असे नसेल तर कोठेच नाही, अगदी बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यातही नाही इतकी मते पिचडांच्या भरवशावर भाऊसाहेब कांबळे यांच्या पदरात टाकली. हा कमळाचा पराभव नाही का..? कि हे स्थानिक कार्यकर्त्यांचे अपयश म्हणायचे. नुसता मलिदा जमा करून चालत नाही. थोडेफार कामही करावे लागते याचा जनू विसरच पडला गेला.
      गेल्या निवडणुकीत वाकचौरे यांनी धुमाळांसह भांगरे यांना कमळात बसविले. सगळी ताकद पणाला लावली. पण तरी तिसरा क्रमांक पटकावला. आता भांगरेंनी शिवसेना जवळ करून पक्ष बदल करायचा विचार केला तर मोठे हसू होईल. हसू..! छे..! तो एक ट्रेडच निघाला आहे. विखेंच्या यशस्वी बंडाने ते सिद्ध झालय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुजय विखे अकोले संगमनेरचे स्टार प्रचारक असणार आहे. पण काही झाले तरी पिचडांची रंगित तालिम यशस्वी झाली आहे. येणार्या काळात त्याच नियोजनाने मैदानात उतरावे लागणार आहे. तरच यश संपादन होईल. नाहीतर ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही. हे देखील त्यांनी समजून घेतले पाहिजे. आजचे "एक्झीट पोल" पाहिले तर घाम फोडणारे आहेत. त्यामुळे पिचडांनी कोणालाही गृहीत धरू नये. अन्यथा त्यांनाही बहुतांशी गोष्टींपासून वंचित रहावे लागेल. एव्हाणा आमदारकी पासून देखील. त्यामुळे छोटे मोठे घटक येथे निर्णयक ठरणार आहे. यात शंका नाही. त्यामुळे मोदींच्या त्सुनामीत पिचडांची मोठी कसरत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. राजकीय वातावरणानुसार आपण विश्लेषण करत राहणार आहोत. उद्या त्याचे फायदे-तोटे नक्कीच जनतेसमोर येतील. यात शंका नाही. योग्य वेळी योग्य निर्णय आणि सचोटी संघटन हे महत्वाचे ठरणार आहे. असे झालेच तर अकोल्यात नारा गुंजेल, राष्ट्रवादीच पुन्हा......
--------
  - एस. एस. शिंदे