अकार्यक्षम महिलेस मानधन न दिल्याने पंचायत समितीत घुसून अधिकाऱ्याला फिल्मी स्टाईलने मारहाण, शरद नानांसह दहा जणांवर गंभीर गुन्हा दाखल.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) : -
संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्ती (सी. आर. पी) काम करणाऱ्या महिलेला मानधन का आले नाही या शुल्लक कारणावरून पंचायत समितीच्या तालुका अभियन व्यवस्थापकाला फिल्मी स्टाईलने नऊ ते दहा जणांनी कॅबिन मध्ये घुसुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. 23 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान घडली. यात नंदलाल पोपटराव कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शरद नाना थोरात, अभिषेक थोरात, ऋषीकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवामत भोकरे (सर्व रा.संगमनेर) इतर चार ते पाच अनोळखी आशा नऊ ते दहा जणांवर शासकीय कामात अडथळ्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. खरंतर, घटना घडताच सोशल मीडियावर सर्वत्र व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर व्हिडीओवरून अनेक पडसाद उमटले. एका शासकीय कार्यलयात अधिकाऱ्याला इतके बेदम मारहाण सर्वांसमोर करत असेल तर कायद्याचा धाक संगमनेर राहिला की नाही? असे अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मारहाण करून कायदा हातात घेऊन त्यांचे मनोबल खच्चीकरण होत असल्याची टीका जाणकारांकडुन होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदलाल कोकाटे हे मूळचे पारनेर तालुक्यातील आहे. ते गेली दोन वर्षांपासून संगमनेर पंचायत समिती मध्ये तालुका अभियन व्यवस्थापक म्हणुन काम करत आहे. संगमनेर तालुक्यातील महिला बचतगटांवर नियंत्रण ठेवणे , त्यांना बँकेमार्फत कर्ज करून देणे असे काम नंदलाल कोकाटे हे पंचायत समितीतून करत आहे. तालुक्यातील शेडगाव येथील महिला बचतगटातील समुदाय संसाधन व्यक्ती (सी.आर.पी) या महिलेची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार होती. शेडगावातील या महिलेला गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली. या नोटिसाला उत्तर न दिल्याने शेडगावातील महिला सी.आर.पीचे मानधन थांबवले. त्यानंतर दि.23 मार्च 2026 रोजी 2:10 वाजण्याच्या दरम्यान पंचायत समितीत कार्यलयात शेडगाव येथील महिला सी.आर.पी त्यांचे पती व शरद नाना थोरात हे कार्यलयात आले. त्यानंतर आरोपी शरद नाना थोरात यांनी विचारणा केली की, शेडगाव येथील सी.आर. पी. महिलेला मानधन का मिळत नाही. त्यावेळी पंचायत समिती अधिकारी कोकाटे यांनी समजावून सांगितले की,शेडगाव येथील सी. आर. पी महिले विषयी तक्रार असुन त्यांची कामगिरी ही असमाधानकारक असल्याने त्यांना गटविकास अधिकारी यांनी नोटीस बजावली आहे. त्यांनी नोटीसीला कुठलेही उत्तर न दिल्याने त्यांचे मानधन रोखुन धरले आहे. असे पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने सांगताच शरद नाना यांचा पारा वर गेला. तुम्हाला नोटिसाला उत्तर देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या.
दरम्यान, शरद नाना याना पंचायत समिती अधिकारी नंदलाल कोकाटे पुन्हा समजावून सांगत असताना शरद नाना यांना राग अनावर झाला. त्यांनी चापटीने नंदलाल कोकाटे याना पंचायत समितीतच डोक्यात मारले. त्यावेळी पंचायत समितीतील अधिकारी कर्मचारी वर्गाने हे भांडणे सोडवले. त्यानंतर पंचायत समिती अधिकारी नंदलाल कोकाटे यांनी वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र, ऐकतील ते शरद नाना कसले त्यांनी 15 ते 20 मिनिटांनी आपला मुलगा, पुतणे असे नऊ ते दहाजण बोलवले त्यांनी पंचायत समितीत घुसून कोकाटे यांचे ऑफिस शोधले. त्यांना नाव विचारून पिचरच्या सिनला लाजवेल असे नऊ ते दहा जणांनी लाथाबुक्यानी ऑफिस मध्ये नंदलाल कोकाटे यांना बेदम मारहाण केली. तु शरद नानाला ओळखत नाही का? तुला काय 353 करायचा तो कर तुझ्याकडे बघून घेतो. असे म्हणुन पुन्हा लथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे भांडणे सोडवले तो पर्यंत कोकाटे याना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर नंदलाल कोकाटे यांची देखील तळपायाची आग मस्तकात गेली. ते कुठल्या दबावाला बळी न पडता त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांपुढे कथन केला. त्यावरून आरोपी शरद नाना थोरात, अभिषेक थोरात, ऋषीकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवामत भोकरे (सर्व रा.संगमनेर) इतर चार ते पाच अनोळखी आशा नऊ ते दहा जणांवर शासकीय कामात अडथळ्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
खरंतर, एकीकडे शांत, संयमी, पारदर्शी कारभार करणारे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा राज्यात कारभार कसा चालतो याचे उदाहरण दिले जाते. मात्र, दुसरीकडे त्यांचे विश्वासू असलेले शरद नाना थोरात व त्यांचे मुलं अधिकाऱ्यांना चोप देतात. काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या सदस्यांनी भर ग्रामसभेत तरुणाने प्रश्न विचारले म्हणुन कानशिलात मारली. असे प्रकार थोरात समर्थकांकडुन वाढत चालत असल्याने अर्थातच थोरात साहेबांच्या विश्वासाला हा तडा गेल्यासारखे आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील नेत्यांना टिका टिपण्णी करायला जागा भेटते. त्यामुळे, नेत्याच्या राजकारणाचे प्रतिबिंब कार्यकर्त्यांवर पडेल अशी अशा ठेवली पाहिजे असे मत जाणकार मंडळींनी व्यक्त केले आहे. तर संगमनेर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा रक्षक दल आणले. मात्र, आपलेच नातेवाईक असा कायदा हातात घेऊन बेदम मारहाण करत असेल तर हे सुरक्षा रक्षक दल नेमकी कोणासाठी स्थापन केले? यावर देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
