हरिश्‍चंद्र यांच्या नगरीतील सच्चा माणूस खोटा निघाला.! आ. लहामटे पुन्हा अजित पवारांच्या गटात का गेले!

  

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

      अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे प्रथमत: अजित पवार यांच्या गोटात जाऊन दाखल झाले. त्यानंतर पुन्हा शरद पवार यांच्या विषयी प्रचंड सहानुभूती दाखवत म्हणाले की मी त्यातला नाहीच..!! अन पुन्हा शरद पवारांना दैवत म्हणत परतीचा प्रवास केला. जनतेने त्यांच्या निर्णयाचा स्वागत केले आणि त्यांची जंगी सत्कार ठेवण्याची तयारी करतच होते. त्यापुर्वीच अकोले तालुक्याची जनता झोपेत असताना लहामटे दादांच्या बंगल्यावर शपथपत्र घेऊन गेले. अर्थात ही वेळ त्यांच्यावर का आली? मी एक वचनी एक पत्नी प्रभुरामचंद्र यांचा भक्त आणि राजा हरिश्‍चंद्र यांच्या नगरीतील सच्चा माणूस आहे. मग, रात्रीतून बारामतीची निष्ठा जाळण्याचे धाडस आणि सत्यवान राजाचा भक्त बंडखोर झाला कसा? असे कोणत्या खोक्यांवर ते फिदा झाले? कोणत्या लाल दिव्याला ते भाळले? जनतेला विचारुन सांगतो असे म्हणणार्‍या आमदारांना जनतेने शरद पवार यांचा कौल दिला होता. मग अचानक जनता गेली खड्ड्यात असा निर्णय त्यांनी का घेतला? असे अनेक प्रश्‍न आता मतदार आमदार लहामटे यांना विचारत आहे. मात्र, त्याचे उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे विकास कामांसाठी गेलो या असल्या फालतु कारणांपलिकडे कोणतेही कारण सापडत नाही.

डॉ. किरण लहामटे यांनी पहिल्यांदा अजित पवार यांची भेट घेतली तेव्हा संख्याबळ कागदावर सही केली होती. त्यामुळे आता अजित पवार यांना दोन तृतीअंश आमदार करुन राष्ट्रवादीचा गट स्थापन करण्यासाठी ३६ आमदार आवश्यक असणार आहे. तर, जो संख्याबळाचा कागद राजभवनात दाखल केले त्यावर उपस्थित आमदारांच्या सह्या आवश्यक असणार आहे. तुम्हाला आठवत असेल शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला तेव्हा तीन नंबरला एका आमदाराची सही होती. तो कसाबसा गुजरातहून महाराष्ट्रात आला होता. मात्र, त्याची सही असल्याने शिंदे गटाची कोंडी झाली होती. अखेर नंतरच्या काळात हाच बहाद्दर पुन्हा शिंदे गटात सामिल झाला. अगदी तेच नाट्य डॉ. किरण लहामटे यांच्याबाबत घडलेले असावे. इकडे आड आणि तिकडे विहीर त्यामुळे, त्यांनी निष्ठा फिष्टा बाजुला ठेवून विकासाच्या नावाखाली दादा गट जॉईन केला आहे. या दरम्यान काही अर्थपुर्ण तडजोडी झाल्या नसतील असे म्हणणे फार म्हणजे फारच धाडसाचे ठरेल. 

सच्चा माणूस खोटा निघाला.!

गेली साडेतीन वर्षे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी खरोखर चांगले काम केले आहे. मी राजा हरिश्‍चंद्र यांच्या नगरीतील सच्चा माणूस आहे हेे वाक्य त्यांच्या तोंडून हजारो वेळा ऐकायला मिळाले आहे. मात्र, हरिश्‍चंद्राच्या नगरीतील सच्चा माणूस हा खोटा निघाला आहे. जनता जनार्दन आहे मग जनतेने जो कौल दिला तो यांनी मान्य का केला नाही? शरद पवार माझे दैवत आहे मी त्यांच्या सोबत आहे असे सांगून देखील दैवताच्या पाठीत खंजिर का फुपसला? गेली चार वर्षे एमआयडीसी, उपजिल्हारुग्णालय, रंधा येथील काचेचा पुल, घटनदेवी, तोलार खिंड हे प्रश्‍न मार्गी लागले नाही. मग आता वर्षभरात काय होणार आहे? झाले तरी मंजुर्‍यांचे नाटक केले जाईल आणि सरकार कोसळेल तथा निवडणुका लागतील. मी पवार साहेबांशी निष्ठावंतर आहे असे छाती ठोकून सांगणार्‍या राजा हरिश्‍चंद्राच्या नगरीतील सच्चा माणसापुढे जनतेने अनेक प्रश्‍न ठेवले आहेत. मात्र, याचे उत्तर कोणाकडे नसून हा माणूस सच्चा नव्हे खोटा असेल्याची टिका लहामटे यांच्यावर होऊ लागली आहे.    

तेव्हाच गेले असते तर...!!

खरंतर जेव्हा पहिल्या दिवशी अजित पवार यांनी शपथ घेतली तेव्हा डॉ. लहामटे हे पहिल्या रांगेत आणि पहिल्याच खर्चीवर बसलेले होते. त्या दिवशी सगळ्यांनी मनाशी ठरवून घेतले. की, डॉक्टर दादांसोबत गेले. मात्र, त्यांनी तेथून आल्यानंतर भलतेच कुभांड रचले. मी सही केली पण मला त्या कागदाबाबत काही माहित नव्हते. अर्थात ते एक डॉक्टर असून त्यांच्या तोंडून असले भाष्य शोभत नाही. म्हणजे त्यांनी इंजक्शन दिले, मात्र ते कशाचे होते हे त्यांना माहित नाही. असेच म्हणावे लागेल. अशाने पेशन्ट मरतील की जगतील? असे पेशन्ट मरो जगो पण आमदारांना मात्र त्याचे प्रयश्‍चित्त भोगावे लागेल. आता यात सर्वात महत्वाचे म्हणजे. जेव्हा पहिल्यांदा ते दादांसोबत गेले होते. तेव्हाच गेले असते तर कोणाला फारसे काही वाटले नसते. मात्र, नंतर त्यांनी जी काही नौटंकी केली आणि जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, त्यांनी जनतेच्या नावाखाली एकतर स्वत:ची किम्मत वाढवून घेतली आणि जनतेच्या भावनांशी गद्दारी केली. त्यांच्या असल्या वागण्यामुळे जनता त्यांच्यावर आता तरी विश्‍वास ठेवणार नाही अशी भुमिका अनेकांनी सार्वभौमकडे मांडली आहे.

काय ती लव्हाळी, काय ते डोंगर काय ते खोके.!

जेव्हा डॉ. किरण लहामटे यांच्या मागावर बाळासाहेब जगताप आणि अजित पवार यांचे काही कार्यकर्ते होते. तेव्हा डॉक्टरांनी थेट त्यांचे दुर्गम भाग असणारे गाव लव्हाळी गाठली असे बोलले जाते. तेव्हा त्यांचा मोबाईल हा नॉट रिचेबल लागत होता. लहामटे हे अजित पवार यांच्या गोटात जाऊन मिळाले असे बोलले गेले. मात्र, अचानक ते कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांना सांगितले. की, मी माझ्या गावी लव्हाळीला आई वडिलांना भेटण्यासाठी गेलो होतो. मी शरद पवार साहेब सोडून कोठेही जाणार नाही. त्यानंतर दोन दिवस झाले आणि रोखठोक सार्वभौमला पहिली बातमी आली. की, डॉ. लहामटे हे दादांच्या गटात सामिल झाले. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी पोष्ट केली. की, काय ती लव्हाळी, काय ते डोंगर, काय ते खोके..समदं कसं ओके मध्ये झालं.! या टिकेमुळे ज्याचा मोबाईल नॉट रिचेबल होतो आणि नंतर तो दुसर्‍या गटात जाऊन मिळतो तेव्हा खोके घेऊन ओके कार्यक्रम होतो. अशी टिका आमदारांवर झाल्याचे पहायला मिळाले.

क्रमश: भाग-३