वाळुतस्कारांनी घेतले दोन बळी, अकोल्याच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू.! तिघे सुखरूप
सार्वभौम (अकालेे) :-
संगमनेर शहराच्या लगत असणार्या गंगामाई घाटावर दोन विद्यार्थी पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दि. ५ जून २०२३ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यात निलेश माधव अस्वले (वय १८, रा. नवलेवाडी, ता. अकोले) व अमोल उत्तम घाणे (वय १८, रा. धुमाळवाडी, ता. अकोले) यांचा मृत्यु झाला आहे. तर त्याचे तीन मित्र वाचले आहेत. वाहत्या पाण्याचा ठाव लागला नाही त्यामुळे दोघे अचानक एका खोल खड्ड्यात गेले आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने दोघांनाही जलसमाधी झाली. मात्र, जेव्हा दोघांचे शोध सुरू होता तोवर निलेश याची आई तेथे आली होती. जेव्हा तिने आपल्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह पाहिला तेव्हा एकच टोहो फोडला. त्यामुळे, तेथे उपस्थित असणार्यांच्या अंगावर अक्षरश: काटा आला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अमोल आणि निलेश हे दोघे आज दुपारी अकोल्याहून संगमनेरला गेले होते. तेथे त्यांनी आपले कॉलेजचे काम पुर्ण केले आणि मित्रांनी मिळून प्रवरा नदीवर पोहायला जाण्याचा निर्णय घेतला. ते आपापल्या गाडीवर गंगामाई घाटावर आले आणि गर्मी थंड करण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. यावेळी त्यांना पाण्याचा फारसा ठाव लागला नाही. गंगामाई घाटावर नदीच्या कडेला पाणी कमी असून जसजसे आत जाऊ तसतसे पाणी पात्र खोल होत गेले आहे. अर्थात ही वाळु तस्कारांची पुण्याई आहे. त्यामुळे, कोठे अचानक खड्डा तर कोठे संथ भाग असे नदीपात्र झाले आहे.
दरम्यान, अंघोळ करण्यासाठी युवराज नवनाथ धुमाळ (रा. शिवाजीनगर, अकोले), ऋतुराज मच्छिंद्र थोरात (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व हर्षल युवराज भुतांबरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) हे देखील होते. मात्र, यांनी फार खोलवर जाण्याचा प्रयत्न केला नाही. यातील दोघे पाण्यात उतरलेच नाही. तर निलेश आणि अमोल यांनी वाहत्या पाण्यासोबत पुढे जाणे पसंत केले आणि एका ठिकाणी खोल गर्त्यांत ते सापडले. परिनामी दोघांना मृत्युला सामोरे जावे लागले. जेव्हा या दोघांच्या नाकातोंडात पाणी जायला सुरूवात झाली तेव्हा यांनी गटांगळ्या खाल्ल्या. वाचवा, वाचवा म्हणून आवाज देखील दिला. मात्र, ठाव न लागल्याने दोघांना पुरेसा श्वास घेता आला नाही.
आईने टाहो फोडला.!
आई वडिल आपल्या मुलांना लहानची मोठी कसे करतात हे त्यांना माहित असते. त्यामुळे, कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलावर आलेले संकट चांगले वाटत नाही. येथे मात्र खुद्द मृत्यू होता. जेव्हा निलेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला तेव्हा त्याची आई तेथे आली होती. तेव्हा आपल्या मुलाचा देह तिने पाहिला. तेव्हा तिने बाळाच्या आवाजाची एकच गर्जना दिली. तेथील झाडांवर बसलेल्या पक्षांनी देखील आकाशाकडे झोप घेत भय व्यक्त केले. त्या आईचा टाहो पाहून स्थानिकांच्या अंगावर शहारे आले होते. त्यामुळे, मुलांना एकच विनंती आहे. की, नदी, नाले, विहीर, शेततळे, पाट, कॅनॉल अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नका. कारण, आपल्यापेक्षा आपल्यावर जिवापाड प्रेम करणारे आपले आई वडिल आपली रोज घरी येण्याची वाट पाहत असतात.
पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका.!
जसा उन्हाळा सुरू झाला आहे. तेव्हपासून नदी किंवा अन्य पाण्याच्या ठिकाणी अनेकजण पोहायला जाताना दिसतात. त्यांच्या सोबत लहान मुले देखील असतात. त्यामुळे, अशा व्यक्तींनी यातून काहीतरी धडा घेतला पाहिजे. कारण, आजकाल मृत्यु इतका स्वस्त झाला आहे. की, कोणत्या क्षणाला व कोणत्या रुपात तो येईल याचा काहीच नियम नाही. त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांना पाण्यापासून सावध ठेवले पाहिजे. स्वत: देखील उष्णतेपासून वाचण्यासाठी नदी, नाले, शेततळे हा पर्याय वापरता कामा नये.