प्रभात दुध डेअरीच्या टॅंकरला धडकून तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी, अकोले संगमनेर रोडवरील भयानक अपघात.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 चौघे मित्र एका कार्यक्रमाहून आले असता गाडीवर गप्पा मारत चालले होते. तर, समोरुन येणारा दुधाचा टॅंकर चालविणारा देखील समोर गाव असल्याचे भान ठेऊन वाहन चालवत नव्हता. त्यामुळे, भरधाव टॅंकरला दोन दुचाक्या आदळल्या आणि डोळ्याची पाते लवते ना लवते तोच फार मोठा अनर्थ घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभार जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे (वय 21)  आणि निलेश बाळासाहेब सिनारे (वय 26, तिघेही रा. चिखली, ता. संगमनेर, जि. अ. नगर) अशी मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर यात संदीप भाऊसाहेब केरे (वय 32, रा. चिखली) हा तरुण गंभीर जखमी असे असल्याची माहिती  पोलिसांनी पहाटे ५:३० वाजता दिली.

        याबाबत सविस्तर माहिती अशी. की, शुक्रवार दि. 17 मार्च 2023 रोजी रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास प्रभात डेअरीचे दुध गोळा करुन टॅंकर हा भरधाव वेगाने संगमनेरकडे येत होता. रस्ता चांगला झाल्यामुळे पुढे गाव आहे, लहान मुले आणि बाजारहाट करण्यासाठी महिला रस्ता क्रॉस करु शकतात अशा कोणत्याही प्रकारचे भान वाहन चालकाला नव्हते. त्यामुळे तो सुसाट सुटला होता. नविन रस्ता झाल्यामुळे चिखलीत अकोल्याच्या बाजुने जे गतिरोधक होते. ते पुर्णत: मानशेष झाल्यामुळे उताराच्या दिशेने गाडी किती वेगाने असेल हे नव्याने सांगण्याची गरज नाही. दरम्यान, याच वेळी मयत झालेले तिघे तरुण आणि गंभीर असणारा एक अशी चौघे दोन गाड्यांवर गप्पा मारत चालले होेते. समोरुन आलेला टॅंक त्यांना दिसला, मात्र तोवर फार उशिर झालेला होता. त्यांनी सावध होण्याच्या आत गाडीने त्यांना धडक दिली आणि चौघे त्याच वेगाने मागे फेकले गेले. तरी देखील टॅकरचा वेग कमी नव्हता. परिनामी तिघांना आपले प्राण गमवावे लागते. तर, एकाचे दैव बलोत्तर होते. म्हणून त्यास मार लागला आणि त्याने प्रसंगावधान राखून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.

              दरम्यान, ही घटना घडली तेव्हा चिखती गावात फार गर्दी नव्हती. मात्र, काही सुजान नागरिक बसलेले होते. अपघातामुळे एकच आवाज झाला आणि अनेकांची धांदळ उडाली. काही क्षणापुर्वी निपचित असणाऱ्या रस्त्यावर चौघे तरुण स्वत:चा जीव रक्ताच्या थारोळ्यात असतानाही वाचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यातील तिघांनी फार काळ तग धरला नाही. जाग्यावरच तिघांचा मृत्यू झाला. चिखलीत ही बातमी वार्यासारखी पसरली आणि बघता बघता गाव गोळा झाले. काही व्यक्तींनी जखमी आवस्थेत असणाऱ्या संदिप कोरे यांस तत्काळ दवाखान्यात हलविले. जीवासाठी प्रयत्न तोडके नको म्हणून उर्वरित तिघांना देखील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोवर तिघांची प्राणज्योत मालवली होती. संबंधित घटना घडल्यानंतर स्थानिक व्यक्तींनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी लागलीच धाव घेऊन शक्यती मदत केली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. अपघात झालेला टॅंकर ताब्यात घेतला असून त्याच्या चालकास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे, चिखली गावासह संपुर्ण संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तर, अवघ्या २५ ते ३० वयोगटातील आपली बालके काही क्षणात देवाला प्रिय झाल्याने नातेवाईकांनी एकच टाहो फोडल्याचे पहायला मिळाले.     

ही घटना घडल्यानंतर आता तरी प्रशासनाला जाग येईल आणि ते चिखली गावात दोन्ही बाजुंनी गतिरोधक बसवतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच, अकोले ते संगमनेर हा रोड अतिशय निकृष्ठ दर्जाचा असून रस्त्याला कोणत्याही प्रकारची एकसंघता (लेवल) नाही. रस्त्यावर मोठमोठ्या खटक्या असून त्याहून अनेक गाड्या व्हायबल होत आहेत. जेथे गाव तेथे तरी गतिरोधक असणे गरजेचे होते. मात्र, त्याचा प्रशासनाला विसरच पडला आहे. त्यामुळे, अगदी तरुण मुलांची जीव गेला असून. यात केवळ दुध गाडी वाहतुक वाल्याची नव्हे. तर, ठेकेदार, पीडब्ल्युडी यांची देखील चौकशी केली पाहिजे. आरोपी वाहन चालक याच्यावर निव्वळ अपघाताचा गुन्हा दाखल न करता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी चिखलीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.