अपंग बाळ जन्माला आल्याने ११ दिवसाच्या अर्भकाचा बापाने दाबला गळा, सासुची फिर्याद जावई अटक.! संगमनेरचा आरोपी अटक..

  


सार्वभौम (संगमनेर) :- 

अपंग बाळ जन्माला आले म्हणून अवघ्या ११ दिवसांच्या लेकराचा बापानेच गळा दाबला. भविष्यात त्याला संभाळणे शक्य होणार नाही, त्याचा खर्च पेलवणार नाही. त्यामुळे, आत्ताच त्याचा बंदोबस्त केलेला बरा असे म्हणून ही हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. जेव्हा स्वत: पतीने हा प्रकार आपल्या पत्नीस सांगितला. तेव्हा तिने एकच टाहो फोडला. कसाही असला तरी तो पोटचा गोळा होता. नऊ महिने ९ दिवस त्याला पोटात वाढविले होते. त्यामुळे, त्या माऊलीला आपल्या मुलाच्या मृत्युवेदना असहाय्य झाल्या आणि तिने कठोर निर्णय घेतला. त्यानंतर सासु मंदाबाई भास्कर पवार (रा. पोखरी ता. पारनेर) यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर जावई अक्षय रामदास सुपेकर (रा. नांदुर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि.अ.नगर) यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, प्रियंका आणि अक्षय यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. अक्षय हा मुंबई बेस्टच्या कुर्ला डेपोत मॅकेनिकल असल्याने हे दाम्पत्य डोंबिवली येथे वास्तव्यस होते. यापुर्वी त्यांना एक मुलगी झाली होती. तर, आता डिलेवरीसाठी प्रियंका माहेरी आली होती. दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिला मुलगा झाला त्यामुळे त्यांच्यात प्रचंड आनंदाचे वातावरण होते. मात्र, जन्माला आलेल्या बाळाचा डावा कान हा फारच बारीक होता. परंतु तरी देखील काही हरकत नव्हती. तो दिवस आनंदात गेला आणि दुसर्‍या दिवशी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान मुलास अचानक झटका आला. तेव्हा त्याचा एक डोळा लहान झाला तर तोंड थोडे वाकडे झाले होते. त्यामुळे, आईला प्रचंड वाईट वाटत होते. 

दरम्यान, हा सर्व प्रकार प्रियंकाने आपला पती अक्षय यास फोनहून सांगितला होता. त्यामुळे, तो दि. ४ जानेवारी २०२३ रोजी थेट नगरला आला. सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान त्याने आपल्या पत्नीसह बाळाचा डिस्चार्ज करून घेतला आणि दोघे पोखरी येथे गेले. त्यानंतर अक्षयने मुलास फर्गुसन कॉलेज समोर असणार्‍या डॉ. आनंद पंडीत यांच्याकडे नेवून उपचार करुन आणले होते. तर, रात्री उशिरा अक्षय सुपेकर हा संगमनेर तालुक्यातील नांदुर खंदरमाळ येथे आला होता. तो रोज नांदुर खंदरमाळ ते पोखरी ये-जा करीत होता. मात्र, आपले बाळ अपंग झाले आहे. त्याच्या भविष्याचा विचार बापाच्या डोळ्यात खुपत होता. अपंग बाळाला संभाळायचे, त्याचे आरोग्य ते शिक्षण आणि संभाळ या सर्व गोष्टींमुळे त्याला झोप लागत नव्हती. मात्र, आता करायचे काय? म्हणून त्याने अवघ्या ११ दिवसाच्या बाळाची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पण, हे कसे करावे याचा देखील त्याने विचार केला आणि ठरल्याप्रमाणे तो आपल्या गावाहून सासरवाडीला दुचाकीहून निघाला.

दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अक्षय सासरवाडीला गेला होता. पत्नी घरकाम करीत होती. तेव्हा त्याने १२ वाजता जेवण केले आणि पत्नीकडून बाळाला घेऊन बाहेरुन फिरुन येतो असे म्हणत तो बाहेर घेऊन गेला. २० ते २५ मिनिटे झाल्यानंतर तो आला आणि बाळाला पुढे करीत म्हणाला. की, बाळ अपंग असल्याने त्याचे भविष्य खुप वाईट आहे. त्याचा संभाळ करणे भविष्यात खुप कठीण होईल त्यामुळे मी याचा गळा आवळून ठार केले आहे. आता तो आपल्यात नाही असे त्याने पत्नीला सांगितले. तेव्हा तिने एकच हांबरडा फोडला. मुलाचा श्‍वास चालु आहे का हे तपासले असता तो बंद झालेला होता. तेव्हा घरात एकच रडारड झाली. हा सर्व कल्लोळ पाहून आजुबाजुला असणारे लोक जमा झाले. त्यांनी देखील हा प्रकार ऐकला. त्यानंतर सासुबाई मंदाबाई पवार यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपला जावई अक्षय सुपेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांनी अक्षयला बेड्या ठोकल्या आहेत.

कसाही असला तरी जन्मदात्या आईला या गोष्टीचा फार मोठा सदमा बसला आहे. विशेष म्हणजे मुलाच्या बापाने हा प्रकार केल्यामुळे फार वाईट वाटले आहे. या देशात कोट्यावधी असे कुटुंब आहेत ज्यांच्या घरात अपंग मुले जन्माला आली आहेत. तर, ब्रेन स्ट्रोक, लकवा यामुळे अनेक मुले अद्याप अपंग आवस्थेत संभाळली जात आहे. त्यांनी असा विचार केला तर राजरोस हत्या झाल्या असत्या. अपंगांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांना त्यांचे हक्क नाही का? त्यामुळे, अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर ती फार दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे, अशी मानसिकता असणार्‍या व्यक्तींना तथा विचारांना पायबंद घालण्यासाठी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी समाजमाध्यमांतून होत आहे.