...अखेर आमरधाम घोटाळा प्रकरणी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबेंसह चार नगरसेवकांना क्लिनचिट.! भाजपाचा राजकीय आटापिटा वाया गेला.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात झालेला विकास हा छान-छान वाटत असला तरी त्यापाठीमागे होत असलेले घोटाळे आता बाहेर येत आहे. संगमनेर शहरातील अमरधाम प्रकरणात सुशोभीकरण व नूतनीकरणाच्या नावाखाली कामे पुर्ण असताना तिची निविदा काढुन स्थळपाहणी अहवाल न देता. नगर अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी निविदा काढुन शासनाची फसवणुक करण्याचा घाट रचला. जेव्हा स्थानिक भाजपाने याबाबत आंदोलने केली तेव्हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामध्ये प्रशासनाकडून श्रीरामपूरचे मुख्यधिकारी गणेश शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली होती. त्यात तत्थ्य आढळल्याने चौकशीअंती पोलिसांनी राजेंद्र सुतावणे (नगर अभियंता, संगमनेर नगरपालिका), सुर्यकांत गवळी (कनिष्ठ अभियंता,संगमनेर नगरपालिका) यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणात नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचे नाव हकनाक गोवण्याचा प्रयत्न भाजपा कार्यकर्त्यांकडून वारंवार होत असल्याचे बोलले जात होते. यासाठी त्यांनी शेजारी पाजारी आसणाऱ्या काही मंत्र्यांचे उंबरे झिजवले होते. मात्र, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. तर जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडुन करण्यात आलेल्या चौकशीत नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना क्लिनचिट मिळाल्याचे समोर आले आहे. तर याच प्रकरणात तत्कालिन मुख्यधिकारी सचिन बांगर, स्थापत्य अभियंता पंकज मुंगसे, नगरसेवक किशोर पवार, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, दिलीप पुंड यांना चौकशी अंती दिलासा मिळाला आहे. कर नाही त्याला डर कशाला असे म्हणत प्रत्येक गोष्टीला तथा आरोपांना हे लोक सामोरे गेले होते. त्यानंतर आता दोन अभियंत्यांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील बहुचर्चित अमरधाम प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. भाजपाने श्वेतपत्रिका मरण पावली याची तिरडी रचत नगरपालिका आवारात अंत्यसंस्कार केले. त्याची शोकसभा घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी श्वेतपत्रिकेचा दशक्रिया विधी संगमनेर नगरपालिकेत घातला. दशक्रिया विधीला सर्व नगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना लाडू देऊन दशक्रिया विधी करण्यात आला होता. त्यानंतर 31 डिसेंबर 2021 रोजी अमरधामचे जनता पंचनामा केला. त्याचा व्हिडीओ व फोटो काढुन व्हायरल देखील केले. हे सर्व होत असताना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे भाजपचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुलें यांनी तक्रार दिली. जिल्हाधिकारी यांनी तक्रारीचे अनुषंगाने द्विसदसिय चौकशी समिती नेमली.
दरम्यान यात सहाय्यक अभियंता सौरभ पाटील (सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर) व श्रीरामपुर नगरपालिकेचे मुखधिकारी गणेश शिंदे यांनी चौकशी केली असता अमरधामचे सुशोभीकरण व नुतनीकरण कामाबाबत केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने आर्थिक गैरव्यवहार व अपहार झालेला आढळुन येत नाही. किंवा तसा प्रयत्न केल्याचे दिसुन येत नाही. टप्पा क्र.2 व 3 कामाच्या निविदा प्रक्रिया करताना बांधकाम अभियंता यांचे दुर्लक्ष झालेले दिसुन येते. असा अहवाल द्विसदसिय समितीने दिला आणि तोच पुढे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. खरंतर, संगमनेर नगरपालिका काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे, या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. भाजपने नगराध्यक्षांवर थेट आरोप केले मात्र, चौकशी अंती त्यांना क्लीनचिट मिळाली. यामुळे भाजपने केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे प्रशासनाच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात भाजपचा एक नगरसेवक आहे तो आकडा बदलतो की नाही हा येणारा काळच ठरविलं. मात्र, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचा संगमनेर नगरपालिकेवर वर्चस्व असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे
काय आहे हे सर्व प्रकरण.!
भाजपचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी शहर पोलीस ठाण्यात अमरधाम विषयी तक्रार अर्ज केला होता. त्यामध्ये डिसेंबर 2021 रोजी संगमनेर नगरपालिका यांनी दोन निविदा काढल्या होत्या. त्यात आ. बाळासाहेब थोरात यांच्या निधीतुन 24 लाख 88 हजार 442 रुपये तर नगपरिषद फंडातुन 9 लाख 16 हजार 66 रुपये शहरातील अमरधाम येथे विविध विकास कामे व शुशोभीकरण करण्याकरीता 22 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्धीद्वारे मागविल्या होत्या. दि. 7 डिसेंबर 2021 रोजी निविदा उघडण्याचे ठरविले. मात्र, दोन्हीही निविदा मधील प्रस्तावित कामे ही यापुर्वी काढलेल्या 63 लाख 19 हजार 733 या निविदाद्वारे 5 डिसेंबर 2019 रोजीच्या कार्यरंभ आदेशाने दि. 25 डिसेंबर 2020 रोजी पुर्ण झालेल्या व बिल दिलेल्या निवेदातच पुर्ण केले आहे. तसेच त्यांचेसंपूर्ण बिल देखील दिलेले आहे. या सर्व झालेल्या घोटाळ्याचे कागदपत्रे नगर परिषदेच्या ताब्यात असल्याने त्या कगदपत्राचे निरीक्षण मागवणारा अर्ज नगरपालिकेचे मुख्यधिकारी यांना श्रीराम गणपुलें यांनी दिला होता. अर्जाच्या आधारावर मिळालेल्या कागदपत्रावरून अर्जदार श्रीराम गणपुलें यांचे असे लक्षात आले की, दि. 5 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या 63 लाख 19 हजार रुपयांच्या कामाचे कार्यरंभ आदेशातील पुर्ण झालेल्या कामाची बिले सादर करताना त्यांचे फोटो देणे बंधनकारक आहे. त्याचे फोटो ठेकेदार थोरात यांनी बिलासोबत दाखल केले आहे. त्या फोटोवरून आणि अर्जदार श्रीराम गणपुलें यांनी 31 डिसेंबर 2021 च्या केलेल्या जनता पंचनाम्यावरून दि.7 डिसेंबर 2021 रोजी बोलविलेल्या 24 लाख 88 हजार व 9 लाख 16 हजार रुपये किमतीच्या निविदामध्ये प्रस्तावित केलेल्या एकंदर 12 कामा पैकी 11 कामे यापूर्वीच पुर्ण झालेली होती. त्याबाबत पूर्णत्वाचा दाखला बिलासोबत दि. 18 मार्च 2020 व दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी ठेकेदार आर. डी. थोरात यांनी फोटोसह दाखल करून त्यांना दि. 10 नोव्हेंबर 2020 व दि. 13 जुलै 2021 रोजी बिल दिलेली आहे.
दरम्यान, 24 लाख 88 हजार रुपये किमतीच्या निविदेतील कामासाठी नगरपालिकेने आ. बाळासाहेब थोरात यांचे आमदार निधीतुन निधी मागितला होता. 25 लाख रुपयांचा निधी देण्याची शिफारस आ. बाळासाहेब थोरात यांनी दि. 22 एप्रिल 2021 रोजीच्या पत्राने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या शिफारशीसह कामाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झाल्यावर दि. 10 मे 2021 रोजीचे पत्राने त्यास जिल्हा नियोजन समितीने निधी मंजुर करताना अन्य शासकीय तरतुदीमधुन सदर कामाचा निधी खर्च झालेला नाही. तर, प्रस्तावित काम यापुर्वी केलेले नाही असे हमीपत्र मागितले होते. तसे हमीपत्र दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यधिकारी यांच्या सहीने दिलेले आहे. मार्च 2020 व जुलै 2021 आधीच्या कामाचे दोन चालु बिले व अंतिम रक्कम मंजुर करते वेळी मुख्याधिकारी, शहर अभियंता, स्थापत्य अभियंता यांनी देयकावर सह्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या सोबत दाखल केलेल्या फोटोवर ही सह्या केल्या आहेत. असे असताना नवीन प्रस्ताव आमदार निधीची रक्कम मिळण्यासाठी देताना पुर्वी काम केलेली नाही व अन्य निधीचे अपुरे काम पुर्ण करण्यासाठी निधी वापरण्यास नाही असे हमीपत्र दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिले आहे. पहिली रक्कम 63 लाख 19 हजार ची निविदा रघुनाथ दत्तात्रय थोरात यांनी भरली व त्यांना कार्यरंभ आदेश दिला. कामाचे दोन्ही बिले व एक अंतिम बिल ही फोटोसह तपासणी स्थापत्य अभियंता मुंगसे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे बिले देण्यात आली आहे. दि. 6 नोव्हेंबर 2020 रोजी चे कोन्सिल सर्वसाधारण सभा ठराव 100 ने नगराध्यक्षा दुर्गा तांबे व सदस्य यांनी सुचविलेल्या कामात अमरधाम येथील विविध विकास कामे सुचविली. त्यावर नगर अभियंता, मुख्याधिकारी, लेखा परीक्षक यांची टिपणी वाचुन दाखविली. असा ठराव देखील आहे. ठरावास किशोर हिरालाल पवार हे सूचक तर विश्वास मुर्तडक हे अनुमोदक आहेत. हा विषय ठरावास पाठविण्यापुर्वी सुचविणारे सदस्य नगराध्यक्षा, स्थापत्य अभियंता मुंगसे, शहर अभियंता सुतावणे, तत्कालीन मुखधिकारी बांगर या सर्वांना सुचविलेली कामे पुर्ण करण्याची कल्पना होती. तसे सन 2018 ते 2020 मध्ये पूर्ण झालेल्या व बिल दिलेल्या कामांसोबत त्यांचे फोटो आहेत. त्याचप्रमाणे दि. 5 जुलै 2021 रोजीचे कोन्सिल ठराव नं. 54 प्रमाणे रक्कम 9 लाख 16 हजार रुपये काम करण्याचे ठराव करते वेळी नगर अभियंता यांची ठिपणी वाचुन दाखविली असुन त्यावर सुचक दिलीप सहदेव पुंड व अनुमोदक नितीन बाजीराव अभंग हे आहेत. 2018 मधील निवेदीतील कामे पूर्ण झाल्याची फोटोत या सर्वांचे फोटो आहेत काम पूर्ण असल्याचे त्यांना ज्ञात आहेत.
दरम्यान, वरील वस्तुस्थितीची माहिती असताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, स्थपत्य अभियंता पंकज मुंगसे, नगसेवक किशोर पवार, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, दिलीप पुंड यांनी संगनमताने व एक विचाराने आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने खोट्या टिपण्या वाचुन दाखवुन त्याचे आधारे फसवणुकीचे ठराव मंजुर करून घेतले. जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यलय, याना खोटी हमीपत्रे दिली व निधी मिळवला. हे सर्व कामे अपहाराच्या उद्देशाने लोकसेवक असताना व आपण करीत असलेली कृत्य बेकायदेशीर असल्याचे माहीत असताना संगमनेर नगरपरिषदेचा विश्वासघात केला असा आरोप करुन भाजपचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुलें यांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती. यावर चौकशी झाली असता. नगराध्यक्षांसह नगरसेवक यांना क्लीनचिट मिळाली आहे तर दोघेजण दोषी आढळुन आले. श्रीरामपूरचे मुखधिकारी गणेश कारभारी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र सुतावणे (नगर अभियंता, संगमनेर नगरपालिका), सुर्यकांत गवळी(कनिष्ठ अभियंता, संगमनेर नगरपालिका) यांनी स्थळपाहणी अहवाल सादर न करता त्यांनी निविदा काढुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.