गडकरी साहेब आणि विखे पा. यांनी अकोल्याला काय दिले.! भावना उफाळुन आल्या.! हे खरं आहे की खोटं.!
सार्वभौम (अकोले) :-
शरदचंद्र पवार साहेब, अजितदादा पवार, यशवंतराव भांगरे, दादासाहेब रुपवते, मधुकर पिचड साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, बी.जे.खताळ यांसारख्या अनेक नेत्यांनी अकोले तालुक्याच्या विकासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचा जर सह्याद्रीच्या कुशीत मान सन्मान होत असेल, त्यांनी तालुक्यात येऊन हक्काने दोन शब्द उच्चारले तर त्यांच्या शब्दाला शंभर टक्के अगदी मोत्यासारखे झेलुन धरले पाहिजे. मात्र, ज्यांचे तालुक्यासाठी हितभर योगदान नाही. त्यांनी अकोल्यात यायचे आणि नको ते वक्तव्य करुन जायचे. हे न समजण्याइतकी तालुक्यातील जनता दुधखुळी नाही. अकोले तालुक्यातीला पुरोगामीत्वाची ओळख आहे. कारण, येथे भल्याभल्या नेत्यांच्या विचारांनी राज्याला दिशा देण्याचे काम दिले आहे. त्यामुळे, येथील जनतेची दिशाभूल कोणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो नक्कीच बाळबोध ठरेल. कारण, दि. १७ जून २०२२ रोजी केंद्रीय मंत्री गडकरी साहेब अकोल्यात आले आणि त्यांनी हायप्रोफाईल ज्ञानाचे डोस शेतकर्यांना पाजले. तालुक्यासाठी पाणी वळवा, तोलारखिंड फोडा, एमआयडीसी द्या, पिचड साहेबांना राज्यपाल करा ह्या मागण्यांकडे त्यांनी डोकून सुद्धा पाहिले नाही. मी जे बोलतो ते मी करतो. असे म्हणून ते अकोल्याबाबत काहीच बोलले नाही आणि माघारी परतले. ते गेले आणि लोणीचे भाग्यविधाते ना. विखे साहेब आले. आता त्यांनी निळवंडे धरणारचे भुमिपुजन केले. त्या धरणात जमिनी गेल्या, अनेकांची घरे गेली, लोक बेघर झाली. तेव्हा लोणीची चारशे एकर जमीन त्यांनी का दिली नाही? हा प्रश्न एकेकाळी स्वत: पिचड साहेब उपस्थित करीत होते. निळवंडे धरणासाठी आदरणीय पिचड साहेब आणि ना. बाळासाहेब थोरात यांच्यासह पवार कुटूंबाचे फार मोठे योगदान आहे. त्यात विखे साहेब पाणी नेतात मग योगदान काय? हे तालुक्यातील जनतेने विचारले पाहिजे. विशेष म्हणजे ज्या निळवंडे प्रकल्पग्रस्तासाठी लोणीकरांनी निवारा देणे नाकारले तेच आज त्यांना गुलाबाचा हार घालायला पुढे होते. यालाच कदाचित अच्छे दिन म्हणतात का? असा प्रश्न पुढे येतो.
गडकरी साहेबांकडून अपेक्षाभंग.!
राजकारणातील एक सच्चा आणि दिलदार माणूस म्हणजे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे पाहिले जाते. ते आदरणीय पिचड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त येणार म्हटल्यानंतर अनेकांना आशा लागली होती. की, काहीतरी मोठं गिफ्ट तालुक्याला मिळणार. म्हणून त्यांच्यासामोर कृष्णेचे पाणी वळविणे तथा जे पावसाचे पाणी पलिकडे वाहून जाते. त्यावर उपायोजना म्हणून एक ठराव ठेवला होता. तर, गेल्या कित्तेक वर्षापासून तोलार खिंडींची विषय प्रलंबित आहे. तो मार्गी लागेल असे वाटले होते. तर, एमआयडीसी किंवा अन्य दोन जिल्ह्यांना जोडणारे मार्ग तयार होतील अशी अपेक्षा होती. मात्र, झालं काय? त्यांनी स्पष्ट सांगितले. जो मै बोलता हुँ वो मै करता हुँ.! जो मै नही बोलतो, वो मै नाही करता. तेथेच विषय संपून गेला. त्यांनी एक सुद्धा शब्द दिला नाही आणि आदिवासी बांधवांना ते बोयोगॅस, सीएनजी, इथेनॉल, हायड्रोजन, बायोमेट्रीक, ग्रिन हॉलोजन, फ्लेक्स इन्जीन, इलेक्ट्रोलायझर, पाण्याच्या हायड्रोजनयुक्त गाड्या असे बरेच कायकाय सांगुन गेले. अर्थात त्यांना माहित नसेल. येथील काही आदिवासी बांधव मुलगा-मुलगी जन्माला आली की त्याचे पालन पोषण आपण करू शकत नाही म्हणून त्यांना शेळ्या मेंढ्या वळण्यासाठी अक्षरश: विकतात. त्यांना घरे सोडा पालाला दरवाजे नाही. त्यामुळे, २१ व्या शतकातील टेक्नॉलॉजी आणि जगण्यासाठीची धडपड यात फार मोठा फरक आहे. यापलिकडे त्यांनी शब्दतर दिलाच नाही. पण, आजही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. की, साहेबांच्या ताब्यात कारखाना होता. ते स्थापनेपासून चेअरमन आहेत. पण यापलिकडे मोठ्या साहेबांना चेअरमनपेक्षा कोठेतरी राज्यपाल म्हणून तरी भाजपाने सन्मान द्यावा.
विखे साहेब.!योगदान तर सांगा.
तेव्हा निवडणुक स्थगित झाली आणि कार्यक्रमावर पाणी फेरले. त्यानंतर तालुक्यातील अनेकांना माहित नसेल. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात पहिली शपथ घेतली. उपमुख्यमंत्री फडणविस साहेबांनी देखील शपथ घेतली. तेव्हा तालुक्यात फडणविस साहेबांचे बॅनर लागले. पण, विखे पाटलांचे नाही. संगमनेरात बाकी मोठ्या प्रमाणावर बॅनर झळकले. ही चर्चा कोणाच्या तोंडची नाही. तर, खुद्द लोणीत ना.विखे पाटील समर्थकांनी केली. त्यानंतर महसुलमंत्रीपद मिळाले आणि मग मात्र गावभर बॅनर लागले. हेच महसुलमंत्री यांनी आमदारकीच्यावेळी अकोल्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे, लोणी आणि अकोले यांचे नाते हे विळ्या-भोपळ्याचे होते. मात्र, दोन्ही भाजपात गेले आणि रात्रीतून जीवाचे मैतर झाले. म्हणजे पुर्वी पाणी प्रश्न असुद्या, कालव्यांचा प्रश्न असुद्या, राष्ट्रवादी-कॉंग्रेस असा वाद असुद्या यात मोठ्या साहेबांनी कधी लोणीला जुमाणू दिले नाही. मात्र, आज दुर्दैवाने लोणी भलत्याच्या तोंडला दिसत आहे.
आंधळी प्रजा अन उधळा राजा.!
खरंतर, ना. विखे साहेब यांचा सत्कार ही एक औपचारिकता होती पण प्रश्न होता कारखाना आणि चर्चा होती निळवंडे धरणाची. धरण उभारणीचा पाया हा तत्कालिन संरक्षणमंत्री शरद पवार साहेब यांच्यापासून सुरू होतो. तर, निधी उपलब्ध करुन देण्यासाठी अजित दादा पवार, मा.मंत्री मधुकर पिचड साहेब आणि आ. बाळासाहेब थोरात साहेब यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते. तर, सर्वात महत्वाचे म्हणजे शेकडो कुटूंबियांच्या हजारो एकर जमिनी निळवंडे धरणात गेल्या. त्यासाठी पिचड साहेब आणि थोरात साहेब यांनी दोन तालुक्यात आदर्श पुनर्वसन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मग या सगळ्यांमध्ये ना. महसुलमंत्री विखे साहेब होते कोठे? जेव्हा लोणी येथील चारशे एकर जमीन देण्याचे ठरले तेव्हा थेट नकार देण्यात आला. आज ती जागा कोणाची आणि तेथे काय आहे हे सर्वश्रृत आहे. या खोलात अधिक जायचे नाही. मात्र, ज्या धरणग्रस्तांना आश्रय दिला नाही तेच काही लोक मंत्र्यांच्या गळ्यात हार घालुन फोटो नाचविताना दिसले. म्हणजे आंधळी प्रजा अन उधळा राजा.!! वा रे शिंदे सरकार..! अशा प्रकारची टिका अकोल्यात होताना दिसली.
लोक नक्की जाण ठेवतील.!
काही असो.! तालुक्यासाठी ज्याचे योगदान आहे. ते प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. पिचड साहेबांनी तरुणपणी काम केले. त्याला सुद्ध स्मरले पाहिजे. पण, केंद्रातून आणि राज्यातून कोणी येऊन जर तालुक्यातील जनतेची दिशाभूल करीत असेल. तर, येथील जनता ते सहन करणार नाही. अकोले तालुक्यात प्रत्येक लढाई ही वैचारिक पातळीने झाली आहे. येथे कोणी लोकशाहीची गळा घोटत असेल, हुकूमशही नांदू पहात असेल तर हा पुरोगामी तालुका सहन करु घेणार नाही. ज्यानी अगस्ति कारखाना, निळवंडे, आढळा, पिंपळगाव खांड आणि अन्य छोटीमोठी धरणे तसेच येथील सामाजिक, शैक्षणिक संस्था उभ्या करण्याचे काम केले. त्यांना हा तालुका मुजरा करेल. मात्र, अन्य कोणाला ही जनता सपोर्ट करत नाही अन करणार नाही. कारण, शरद पवार साहेब यांच्या कुटूंबाने तालुक्यात अनेक गोष्टी उभ्या केल्या आहेत. त्याचे ऋण म्हणून लोकांनी २०१९ साली कौल दिला. उद्या कारखाना निवडणुक आहे. तो उभारणीसाठी शरद पवार यांनीच पाया उभा केला आहे. त्यास आजवर वेळोेवेळी कर्ज दिले आहे, अडचणीतून बाहेर काढला आहे. ही जाणीव मतदारांना आहे. ते योग्यतो कौल देतील असे मत राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. जनता बाहेरच्या लोकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.