नगराध्यक्षा तथा भाजप जिल्हाध्यक्षा यांना महिला तालुकाध्यक्षांकडून धमकी व शिवीगाळ.! पतीसह तिघांवर गुन्हा दाखल.!

     

संग्रही चित्र 

सार्वभौम (अकोले) :-

       अकोले तालुक्यात मान सन्मान, वरिष्ठ-कनिष्ठ, ज्येष्ठ-एकनिष्ठ यांच्यात काही संस्काराच्या मर्यादा राहिल्या आहेत की नाही? असा प्रश्न पुढेे येऊ लागला आहे. कालपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-राष्ट्रवादी, रिपाई-भाजप अशा प्रकारचे वाद पहायला मिळत होते. आता मात्र, भाजपमधीलच अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. कारण, भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा रेष्मा अमोले गोडसे यांनी चक्क भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांना फोनहून शिवीगाळ, दमदाटी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोडसे यांनी मुक्तसुमने उधळलीच, मात्र त्यांचे पती अमोल गोडसे आणि कोंडीभाऊ गोडसे यांनी देखील शिवीगाळ दमदाटी केली. ही घटना दि. 26 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी सोनालीताई नाईकवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात कलम 500 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनालीताई नाईकवाडी ह्या अकोले शहराच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांचा स्वभाव स्पस्टोक्ती असून त्यांचे संघटन कौशल्य देखील चांगले आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात मोठे सामाजिक योगदान केले आहे. तर, गेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचे वडिल शिवीजीराजे धुमाळ यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. त्यांच्या बुलंद तोफेंच्या सलामीमुळे भाजपाला बर्‍यापैकी जागा निवडून आणता आल्या. त्यामुळे, भाजपमध्ये त्यांची मोलाची भुमिका राहिली आहे. अशात सोनालीताई या भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा असल्याने त्यांना तालुक्यात आणि जिल्ह्यात तथा भाजपच्या कार्यकारणीत मोलाचे स्थान आहे. त्यामुळे, त्यांना अशा पद्धतीने अपशब्द वापरल्याने तालुक्यात नाराजिचा सुर उमटला आहे.

आता निवडणुकींचा काळ सुरू आहे. अशात एका तालुकाध्यक्षा महिलेने जिल्हाध्यक्षा यांना शिविगाळ, दमदाटी करण्याचे धारिष्ट दाखवावे. हे भाजपच्या राजकीय व सामाजिक संस्कृतीत शोभनिय नाही. त्यामुळे, तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली म्हणून अशा पद्धतीने कृत्य करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे, आता भाजप गोडसे यांच्यावर काय कारवाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर, गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप पोलिसांकडून कोठतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे, अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. निवडणुकीचा काळ सुरू असताना असे प्रकार होत असतील आणि त्यास पोलीस ठोस भुमिका घेत नसतील तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अकोले तालुक्यात राजकीय वातावरण प्रचंड खराब झाल्याचे पहायला मिळत आहे. भलेभले ज्येष्ठ नेते संस्काराच्या भाषा करीत आहे. मात्र, भाषणांमध्ये कोण कोणाची आय-माय काढतय तर कोणी कोणावर कंबरेखालचे वार करीत आहेत. त्यामुळे, ज्यांना युवा पिढी ज्येष्ठ म्हणते ती भ्रष्ट झाल्याने त्यांच्याकडून कोणता आदर्श घ्यायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे असे अनेकांना वाटते. मात्र, जे जाणकार आहेत. ज्यांना समाज मानतो असेच लोक आरोप प्रत्यारोप करीत असून वैयक्तीक चारित्र्यहरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. गट आणि पक्ष कोणताही असो.! पण, असली उनी-धुणी थांबली पाहिजे. असे तालुक्यातील सुज्ञ व्यक्तींना वाटते आहे. केवळ सत्ता येण्यासाठी राजकारण किती निच पातळीवर चालले आहे. हे दिसू लागले आहे. मात्र, हा पुरोगामी अकोेल्याच्या संस्कृतीचा वारसा नाही. त्यामुळे हे थांबावे असे मत सुजान नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

आता, पोलीस ठाण्याकडून तरी तत्काळ कारवाईची अपेक्षा असते. मात्र, तसे होताना काही दिसत नाही. सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी 375 प्रिव्हेन्टीव्ह अ‍ॅक्शनच्या नोटीसा बजावल्या. मात्र, कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असे अनेकांकडून झाले. तरी देखील त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तालुक्यात सोशल मीडियातून अनेकांनी नको तशी भाषा वापरून वाद घातले. फेसबुकवर बनावट खाते उघडून अनेकांची बदनामी केली. भाजपचा सोशल मीडिया पाहणार्‍या अमोल येवले, संदिप शेणकर याच्यावर कारवाई करून देखील त्यांनी उपद्रवीपणा चालुच ठेवला आहे. असे असताना पोलिसांच्या कारवाईला जर कोणी कस्पट समजत असेल तर पोलिसांचा वचक आहे की नाही? असा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे, 375 प्रिव्हेन्टीव्ह अ‍ॅक्शनच्या नोटीसा बजावल्या तरी देखील यातील काही लोक कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असे कृत्य करतात. त्यांच्याकडे प्रशासन काना डोळा का करते हे न उमगणारे काडे आहे. तर, गुन्हे दाखल होऊन देखील ज्यांच्याकडून तालुक्यात राजकीय कारणांमुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल असे कृत्य होत आहे. तरी देखील त्यांचा शोध घेऊन कारवाई केली जात नाही. मग पोलीस नेमकी कसली वाट पाहत आहे? याचे देखील कोडे अनेकांना उमगले नाही. त्यामुळे, देव करो आणि तालुक्यात 2009 सारख्या दंगली किंवा 2002 सारखी गोळीबाराची परिस्थिती निर्माण होऊ नये..!!