भर सभेत अध्यक्ष व सेक्रेटरींचा अपमान, उपाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली, आठ दिवसात विश्वस्त मंडळ बरखास्त करा अन्यथा कॉलेजवर मंडप ठोकणार.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

                              अकोले तालुका ऐज्युकेशन सोसायटीवर ज्या नियुक्त्या झाल्या, त्यावर तालुक्यात वेगळच वादळ उठले आहे. याचा प्रक्षोभ म्हणून तालुक्यातील पुरोगामी विचारांचे नेते एकत्र आले आणि त्यांनी अगस्ति महाविद्यालयावर धडक मोर्चा काढला. पिचड साहेब समोर या चर्चेला बसा, प्रशासन मुर्दाबाद, ठेकेदार हटाव, एकजूट जिंदाबाद अशा वेगवेगळ्या घोषणांनी कॉलेज कार्यालय गजबजून गेले. यावेळी, जे नवनियुक्त अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना त्यांच्या तोंडावर जनतेेने विरोध दर्शविला तर, उपाध्यक्ष विठ्ठल चासकर यांना निवेदन देत अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची आंदोलकांना अवहेलना केली. इतकेच काय.! स्वत: चासकर यांनी देखील या नियुक्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली आणि मी स्वत: आंदोलनाला आलोय असे म्हणत या कारभारावर बोट ठेवले. त्यामुळे, काल नियुक्त्या आणि आज गटतट व मतभेद चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले. आता, येत्या आठ दिवसात जर ही कमिटी वैचारिक बैठकिला बसली नाही. तर, २८ एप्रिल रोजी कॉलेजवर तंबू ठोकून अमरण उपोषण केले जाईल असा इशारा अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला. यावेळी रिपाई राज्यसचिव विजय वाकचौरे, डॉ. अजित नवले, विनयजी सावंत, या आंदोलनाची सुरुवात करणारे सुरेश नवले, शांताराम गजे, चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, सुरेश खांडगे, स्वातीताई शेणकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

              यावेळी काही मुद्दे प्रामुख्याने पुढे आले. त्यात सुज्ञ व्यक्तींनी मत मांडले की, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, विडी कामगार जनतेने त्यांच्या श्रमाच्या पैशातून त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी उभी केलेली सार्वजनिक शिक्षणसंस्था आहे. ती कोणाची खाजगी मालमत्ता नाही. त्यामुळे, तेथे कोणाची कुटुंबशाही आणि मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही. ही संस्था प्रत्येकाच्या कष्टाची असून तिचे खजगिकरण करण्याचा डाव सुरु आहे. तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.

काही व्यक्ती म्हणाल्या की, ही शिक्षणसंस्था आहे. तिला काही भ्रष्ट लोकांनी पक्ष कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन केंद्र करुन ठेवले आहे. यांनी या संस्थेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजून या शिक्षणसंस्थेचा सध्या गैरवापर सुरु आहे. तो तातडीने थांबवला पाहिजे.

या संस्थेत नेमकी काय कारभार सुरु आहे, कोण किती पावत्या फाडतय आणि कोण भरतीसाठी किती पैसे घेतय, कोण कोणती बिले कशात लावतय आणि किती घशात घालतय हे समोर आले पाहिजे, त्याचे आॅडिट झाले पाहिजे, भावी पिढ्यांच्या हितासाठी तालुक्याच्या या सार्वजनिक  शिक्षणसंस्थेचे Academic Audit केले जाणे अत्यावश्यक आहे. 

सद्या अत्यंत मनमानी पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार सुरु आहे. हा शिक्षणसंस्थेचा गैरवापर तातडीने थांबविला पाहिजे. आता हो ला हो मिळविणारी मंडळी मंडळात घेतली आहेत. ती सर्व विश्वस्त व पदाधिकारी यांचे दहा दिवसात राजीनामे द्यावेत.

 संस्थेचे अध्यक्षपद 

संस्थेच्या अध्यक्षपदावरून जेष्ठ नेते जे. डी आंबरे पाटील यांना हटवण्यात आले आहे. जे. डी आंबरे पाटील यांच्या ऐवजी ठेकेदार असलेल्या सुनील दातीर यांना अध्यक्षपदी बसविण्यात आले आहे. सुनील दातीर व्यक्तिगत आयुष्यात आपले मित्र आहेत. मात्र असे असले तरी या निवडीमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत की, जे. डी आंबरे पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धडाडीचे निर्णय घेतले. स्वत:च्या मालमत्तेवर कर्ज काढून प्रसंगी कॉलेजच्या अनेक इमारती उभ्या केल्या. आपल्या कार्यकाळात कॉलेजचे शैक्षणिक वातावरण टिकविले. संस्थेच्या विकासात भरीव योगदान दिले. मग असे असताना त्यांना का हटविले गेले ?  स्वतंत्ररीत्या काम करणारा, प्रतिभा असणारा, होयबा नसणारा आपल्याला चालत नाही यामुळे त्यांना हटविले का ? आर्थिक अनागोंदीत ते अडसर ठरत होते म्हणून त्यांना हटविले का ? जे. डी. आंबरे पाटील यांच्या ऐवजी ठेकेदार असलेल्या दातीर यांना निवडण्यात आले आहे. दातीर ठेकेदारी व्यवसायात सक्षम असतीलही. मात्र ते शिक्षण क्षेत्रातील जाणकार, बुद्धिजीवी कार्यकर्ते असल्याचे किंवा त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे  योगदान दिल्याचे ऐकिवात नाही. मग असे असताना अकोले तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या व हजारो विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक प्रगतिशी निगडीत व भविष्याशी संबंधित असलेल्या शैक्षणीक संस्थेचे अध्यक्षपद त्यांनाच का व कशासाठी दिले गेले आहे ? दातीर यांच्या ऐवजी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात योगदान दिलेला, सामाजिक व राजकीय कार्यात सक्षम असलेला, शैक्षणिक क्षेत्रातील आवाहनांचा व आव्हांनाचा किमान जाणकार असलेला इतर कुणीच शिल्लक नव्हता  का ? असे असेल तर तालुक्यासाठी ही गंभीर बाब आहे. 

संस्था खाजगी मालमत्ता नाही..!

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी व तिची मालमत्ता कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या घामातून ही संस्था उभी राहिली आहे. विडी कामगारांनी सुपामागे, बाजारात शेतीमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांनी पाटी मागे, दुध उत्पादकांनी लिटर मागे पै-पै देऊन संस्थेला हातभार लावला आहे. व्यापारी, व्यावसायिकांनी देणग्या दिल्या आहेत. आजूबाजूच्या गावांनी विद्यार्थ्यांनी सामुदायिक श्रमदान केले आहे. विद्यार्थ्यांनी, पालकांनी नियमबाह्य देणग्या, फी, विकास निधी दिले आहेत. संस्थेच्या उभारणीत गाडून घेतलेल्या तत्कालिन जाणकार मान्यवर धुरीणांनी रक्ताचे पाणी करून संस्था उभारली आहे. तेंव्हा येथे ‘मेरी मर्जी’ मान्य करता येत नाही.

 राजकारण

कार्यकारणीवर नजर टाकल्यास काही सन्माननीय अपवाद दिसतात. मात्र बहुतांश कार्यकारिणी पिचड यांच्या भावी राजकारणाचा मार्ग सुकर करण्याच्या उद्देशाने आकाराला आलेली दिसते आहे. पुढील निवडणुका सुकर व्हाव्यात, अधिकाधिक जणांचे सहकार्य आपल्याला लाभावे, सहकार्य लाभले नाही तर, किमान विरोध मावळावा या उद्देशाने कार्यकारिणी बनविण्यात आली आहे. संस्थेत राजकारण नको म्हणत भाषण करायचे. चळवळी करणारांना तसे उपदेश द्यायचे. आपण मात्र संस्थेत, कारखान्यात, सर्वत्र १०० टक्के राजकारण करायचे...! हे यांचे वास्तव आहे. 

नोकर भरती व भ्रष्टाचार

संस्थेत नोकरीसाठी शिक्षक व कर्मचारी नेमताना त्यांच्याकडून मोठ्या रकमा घेतल्या जात असल्याची चर्चा आहे. शिक्षकांकडून ४२ लाखांपर्यंत बिन पावतीच्या रकमा घेतल्या गेल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर हे अत्यंत भयानक आहे. काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. की, पैसे देणे हीच गुणवत्ता असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या गुणवत्तेला कवडीची किंमत उरणार नाही, घेतलेल्या पैशांची पावती दिली जात नसेल तर हे पैसे कुणाच्या खिशात जातात, संस्थेच्या एका बँक खात्यात कोट्यावधी रुपयांची रक्कम पडून होती. स्वत: अध्यक्ष व संचालकांनाही ती माहित नव्हती. अचानक ही रक्कम लक्षात आली असे एका पदाधिकाऱ्याने जाहीररीत्या सांगितले होते असे बोलले जाते. हे खरे आहे का ? संस्थेची अशी हिडन अकौंटस् आहेत का ? असल्यास हे भयानक आहे, संस्थेच्या माध्यमातून जो खर्च होतो त्यातही मोठा भ्रष्टाचार होतो असेही आरोप आहेत. वरील सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे असे डॉ. अजित नवले म्हणाले.

घराणेशाही

संस्थेच्या कार्यकारिणीत पिचड कुटुंबातील दोन दोन व्यक्ती विश्वस्त म्हणून घेण्यात आल्या आहेत. अनेक जण कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत. अनेक जण तालुक्यातील विद्यमान पतसंस्था व  सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत. वर्षानुवर्ष तालुक्यातील याच  ३०-३५ व्यक्ती विविध पदे उपभोगत आहेत. काही प्रश्न यामुळे उपस्थित होतात. ते असे की, तालुक्यात आज सत्तेवर, पदांवर असलेल्या व्यक्तींनंतर तालुक्यात नंतरच्या पिढीत कुणीच कर्तुत्ववान जन्माला आलं नाही का ? नंतरची पिढी कर्तुत्वाच्या बाबतीत वांझ जन्माला आली आहे का? गोतावळ्यातील पाच पंचवीस जण म्हणजेच ‘बहुजनवाद’ आहे का असा प्रश्न नवले यांना उपस्थित केला.