पाच नंतर दुकाने बंद ठेवणार नाही.! बंद करायला आले ते ठोकले.! अकोले-संगमनेरच्या शिटलर शाही विरोधात व्यावसायिकांचे एल्गार.!

 

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सायंकाळी 5 नंतर बंद की चालु यामध्ये संगमनेरमधील नागरिक फार गोंधळले आहेत. तालुक्यात सोशल मीडियावर एक आवाहनाचे पत्र वाऱ्यासारखे फिरत आहे. या पत्रात संगमनेर तालुक्यातील जनतेस आवाहन केले आहे की, सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवावी व 5 नंतर बंद करावी. जेणेकरून नागरिकांची गर्दी होणार नाही. असे या पत्रात नमूद केले आहे. परंतु या आवाहनावर कोणाची सही नाही. त्यामुळे, हे बेवारस आणि बोगस पत्र सर्वत्र फिरत आहे की काय? असा ही प्रश्न सामान्य माणसाच्या मनात भेडसावत आहे. याच पत्राला विरोध करत छोटे व्यावसायिक, टपरीधारक व समाजसेवकांनी टिका करून व्यापारी व प्रशासनाच्या मनमानी कारभारला विरोध केला आहे.  या बंदच्या निषेधार्थ उद्या दि. 11 जून रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यलयावर आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. सायंकाळच्या दरम्यान टपरी धारक, हातगाडीवरील हातावर पोट भरणारी जनता संगमनेरात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यापारी असोशियन बरोबर बैठक घेऊन जनतेची दिशाभूल केली आहे. गडगंज पैसा कमवून बसणाऱ्या काही व्यापाऱ्यांना छोट्या व्यवसायाचे काय घेणे देणे? अशीच टिका आता जनतेतून होत आहे. खरंतर छोट्या व्यावसायिकांना ग्राहकांचा टाईम हा सायंकाळचा असल्याने या निर्णया विरोधात त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष रस्त्यावर कधी येईल हे प्रशासनाला देखील समजणार नाही. त्याचे उद्या पहिले पाऊल पडणार आहे. आज (दि.10) रोजी कोणताही लेखी आदेश न काढता संगमनेर नगरपंचायतीची भोंगा गाडी बंद-बंद म्हणून फिरत होती. ती सामाजिक कार्यकर्त्यांनी आडवून तिचा आवाज बंद केला. याबाबत मुख्याधिकारी सचिन बांगर यांना जाब विचारला असता त्यांनीही टोलवा टोलवी केली. हा मनमानी कारभार चालणार नाही असे कार्यकर्त्यांनी खडेबोल सुनावले. त्यानंतर गाडी पार्कींगमध्ये निघून गेली.

           दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी संगमनेरला धावती भेट दिली होती. मात्र, त्यांनी संगमनेरबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतले नाही.  परंतु संगमनेरचे इनसिडेंट कमांडर अमोल निकम यांनी व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंतच दुकाने उघडी राहणार असा सयुंक्तपणे निर्णय घेतला आहे. या अंशतः बंदला संगमनेरातून जोरदार विरोध होऊ लागला आहे. हा निर्णय मनमानी कारभारातून संगमनेरकरांवर लादला जात असल्याची टिका ही जनतेतुन होत आहे. मागील दोन महिन्यापासून संगमनेर लॉकडाऊन आहे. या दोनमहिन्यात सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. मात्र, बंद पडद्याआड बड्या लोकांचे सर्व अलबेले सुरु होते. यात ठराविक व्यापारी, शेतकरी, मजूर यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात जनतेने बंडपुकारला आहे. ह्या मनमानी निर्णयाविरोधात उद्या 11 वाजता तहसील कार्यलयावर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती आंदोलकांनी सार्वभौमशी बोलताना दिली.

           दरम्यान, कोविडच्या संपुर्ण काळात संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधी जनता आणि अधिकारी यांच्यात सुसंवादाचा अभाव सुरवातीपासुन दिसुन आला. त्यामुळेच जनतेला प्रशासनाचे निर्णय शेवटपर्यंत कळलेच नाही. या गोंधळामुळेच कोविडची सर्व नियमावलीचे उल्लंघन झाले, हे तालुक्यातील कोविडच्या सर्व रुग्णसंख्येवरून दिसुन येतच होते. ज्या वेळेस प्रशासनाने 7 ते 11 हा कालावधी व्यवसायीकांसाठी लागू केला होता त्यावेळेस कोविडची संख्या ही चारशे ते पाचशेच्या दरम्यान असायची, आता प्रशासन जर येवढेच धास्तावलेले आहे तर मग पहिले निर्बंध उठवलेच कशाला? याचाच अर्थ असा की तालुक्यात कोविडची रुग्ण संख्या वाढणार हे प्रशासनाला लक्षात आले असावे किंवा अजूनही काही रिपोर्ट येणे बाकी आहे का? जे प्रशासन जाणीवपूर्वक लपवून ठेवतय.! याची शंका आता संगमनेरकरांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. कारण, तब्बल महिना उलटून गेला तरी अद्यापही नागरिकांचे रिपोर्ट त्यांच्या हाती पडू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. हा सगळा प्रशासकीय कारभार कुठे तरी लपवण्याचीच वेळ आता संगमनेरच्या प्रशासनावर आल्याचे दिसते. म्हणूनच काही ठराविक व्यापाऱ्यांना हाताशी धरून अधिकारी कोविडचे नवे निर्बंध लादण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण एक मात्र नक्की.! प्रशासनाच्या या हिटलरशाही प्रवृत्तीमुळे छोटा व्यापारी हातावर पोटभरणार पथविक्रेते यांचा विचार मात्र कुठे ही होताना दिसत नाही. हे संगमनेरकरच्या मानुसकीतले दुर्दैव आहे. तसेही संगमनेरचे नागरिक देवावर हात ठेऊनच वागत आहेत. त्यांना प्रशासनाच्या चालिरिती कळून चुकल्या आहेत. कारण, ना इथे गाऱ्हाणे ऐकायला कोणी जबाबदार नेता नाही आणि सामान्य माणसाची बाजु मांडायला विरोधक दिसत नाही. कोविड काळातही ही राजकीय मिलीभगत छोट्या व्यावसायिकांच्या मुळावर उठली आहे.

          दरम्यान, संगमनेरात चारही दिशांनी दिवस रात्र वाळु चालू आहे. पण इथे 5 वाजताच दुकान बंद झाली पाहिजे असा निर्णय प्रशासन घेत आहे. येवढेच काय! संगमनेरात गोरख धंद्यांना उधाण आले आहे. लहान-लहान मुलांच्या हातात सिगारेट, गांजा आढळून येत आहे . गोमांस सरास चालू आहे. त्यामुळे,  लॉकडाऊनमध्ये येथे गोरखधंदे जोरात सुरू असताना ज्यांचे छोटे-छोटे व्यवसाय आहे त्यांच्यावरच निर्बंध लादले जात असल्याची टिका सर्वत्र होत आहे. त्यामुळे सामन्य नागरिकांचे काय? हा प्रश्न प्रशासनापुढे देखील अनुत्तरीत आहे.

 प्रशासनाने छोटे-छोटे व्यावसायिक, छोटे दुकानदार यांचा विचार करणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने ठराविक व्यापाऱ्यांना विचारात घेऊनच एकाएकी सकाळी 7 ते 5 चा तुघलकी निर्णय घेणार आहे असे समजते. याबाबत कुठला ही लेखी आदेश नसताना हे विनाकारण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. त्यावर लवकरात-लवकर फेर विचार करावा. नाहीतर प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. लेखी आदेश काढला तर त्याचे पालन होईल अन्यथा सर्व छोट्या व्यावसायिकांची दुकाने सुरुच राहतील.

             - अमोल खताळ(सामाजिक कार्यकर्ते)

 

दुकानांची वेळ ५.०० वाजेपर्यंत कमी केली की गर्दी कमी होईल, संसर्ग टाळता येईल असे वाटत नाही. पूर्ण वेळेत येणारे लोक कमी केलेल्या वेळेत येणार म्हणजे गर्दी होणारच. ज्याला काहीतरी खरेदी करायचं आहे तो बाहेर पडणारच मग कमी वेळेत खरेदी करण्यासाठी जास्त लोकं एका ठिकाणी येणार त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी वेळेचे हे नवे निर्बंध निव्वळ व्यावसायासाठी त्रासदायक ठरणार आहे. त्यापेक्षा कोरोना प्रतिबंध म्हणून विशिष्ट संख्येचे निर्बंध, मास्क इत्यादी गोष्टीबद्दल योग्य अंमलबजावणी हाच उपाय योग्य वाटतो.

               - अक्षय थोरात (सामाजिक कार्यकर्ते)


तर अकोले तालुक्यात देखील संगमनेर प्रमाणे  सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरु व रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत बंद अशा पद्धतीने बंदचे कौतूक होऊ लागले आहे. मात्र, यावर सामान्य व्यवसायिक यांनी या प्रस्तावाला अक्षरश: लात मारली आहे.  कारण, प्रत्येक मोठा व्यापार आणि व्यावसाय दिवसभर सुरळीत चालतो. इतकेच काय.! अकल्यात दारु गांजा देखील लॉकडाऊन असला काय आणि नसला काय.! तेजीत सुरु असते. त्यामुळे, मरण होते ते फक्त छोट्या व्यवसायिकांचे. आता साधं उदा. सांगायचे झाले तर, ९ नंतर किती लोक चहा पितात? व्यसनाधिन सोडता भर उन्हात चहा पिणार्यांचे प्रमाण फार कमी आहे. सायंकाळी मात्र अनेकजण चहा पितात. त्यामुळे, चहाचा टाईम होतो आणि लॉकडाऊन सुरु होते. यापलिकडे कच्ची दाबेली, पाणिपुरी, रडगा पॅटीस असे अनेक छोटे व्यावसायिक आहेत. ज्या वस्तू फक्त चौपाटी प्रमाणे फक्त सायंकाळी खाल्ल्या जातात. त्या व्यापाऱ्यांचा विचार कोण करणार? त्यांच्या पोटाचा विचार कोण करणार? त्यामुळे, हे लॉकडाऊनचे खुळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. तसेही लॉकडाऊन असताना कोणती आकडेवारी कमी झाली आहे? उलट कमी संख्या म्हणणाऱ्यांनी १ हजार टेस्ट तालुक्यात आम्ही म्हणू त्या करुन दाखवा मग कळेल किती संख्या कमी झाली आहे. त्यामुळे, जर सुरु करायचे असेल तर सर्वच सुरु करा, कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन करु नका. कोणतेही निर्बंध घालू नका. अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे.

          खरंतर लॉकडाऊन होते तरी, मोठ्या व्यावसायिकांचे बहुतांशी धंदे मागच्या दाराने सुरु होते. दारुची दुकाने हाफ शटरने सुरु होते तर अधिकाऱ्यांना देखील घरपोच सुविधा होत होत्या. या पलिकडे भर लॉकडाऊनमध्ये अकोल्यात किती हॉटेल सुरु होते? कोण-कोण त्यांच्याशी अर्थपुर्ण तडजोडी करीत होते? याची यादी आपल्यासमोर मांडली पाहिजे. मग, मोठ्या लोकांचे सर्व कारभार बंद पडद्याआड सुरु राहत असतील तर गरिबांनी तुमचे काय घोडं मारलं आहे? 


बरं, जे लोक म्हणतात ना की, लॉकडाऊन करा, ९ ते ५ करा, त्यांच्या घरची संपत्ती तपासा, त्यांनी आजवर गरिबांना किती मदत केली, कोरोनाच्या काळात त्यांचे योगदान काय? हे पाहिल्यानंतर तोंड झोडून घ्यावं वाटेल. तर, दुसरीकडे लॉकडाऊनची मागणी कोणाची? तर, नगरसेवक, सभापती, एखादा संचालक, सोशल मीडियावर ऊठसुठ येणारे तोतया समाजसेवक यांची री फार मोठ्या प्रमाणावर असते. लॉकडाऊनचे विषय छेडायचे आणि चारदोन धनदांडग्या व्यापाऱ्यांना हाताशी घरुन लॉकडाऊनवर मोहर लावायची. यांच्या बापाचे जाते काय? यांची भावनिकता मेलेली असते, घरी बक्कळ पैसा असल्याने यांना गरिबांच्या पोटाचा विचार नसतो तर, स्वत:ला मोठेपणा मिळाला ना. मग बस.! इतकेच हे ठराविक व्यापारी आर्ध्या हाळकुंडाचे पिवळे, मात्र, यात असेही काही व्यापारी आहेत की, जे स्वत:सह अन्य छोट्या दुकानदारांचा देखील विचार करतात. त्यांना सॉल्युट तर केलाच पाहिजे. आज वाईट वाटते की, आपण, शिवरायांच्या स्वराज्याला मानतो आणि राहतो, त्यांचा स्वराज्याचा वचन नामा होता, सर्वांस पोटास लावणे आहे. दुर्दैवाने त्यांचे नाव येथे राजकारण करण्यासाठीच घेतले जाते आणि आज स्वार्थी लोकांनी रयतेचा वचननामा केला आहे, लॉकडाऊनच्या काळात सर्वांना तडपून तडपून लुटणे आहे. काही झाले तरी या लॉकडाऊनच्या काळात प्राशासनाहून आणि सामाजिक बरखा पांघरलेल्या लुटारुंहन पुरते मन उठले आहे. म्हणून, लॉकडाऊन करताना छोट्या व्यावसायिकांचा विचार झाला पाहिजे. कारण, पोटाची भूक छोटी असली तरी मोठे कष्ट करुनही ती भागत नाही. हिच गरिबांची कौफियत आहे.