त्यांच्यामुळे मला खाली बघावं लागतं.! नाव न घेता पवारांची पिचडांवर टिका.! कारखाना ताब्यात घ्या- मी सोबत आहे.

सार्वभौम (शेंडी) :- 

                  गेली 40 वर्षे अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना देखील विकास झाला नाही, मधुकर पिचड यांनी असे केले, तसे केले, हे केले ते केले अशी वारंवार टिका केली जाते. आता मी त्यांना मंत्री केलं, विरोधी पक्षाचा नेता केलं, सत्ता दिली, काही नसताना प्रदेशाध्यक्ष केले. जे मागितले ते दिले. या सगळ्या गोष्ठी कोणी दिल्या? तर मी. तरी तालुक्याबाबतचे प्रश्न कायम राहिले. ही माझी चुक असली तरी त्यांना मी संधी दिली, त्यांनी काहीच केले नाही. असे वारंवार बोलुन मला खाली बघावं लागतं.! अशा प्रकारची खंत व्यक्त करीत मधुकर पिचड यांचे नाव न घेता शरदचंद्रजी पवार साहेब यांनी टिका केली. तर आता झारीतील शुक्राचार्य तुम्ही बाहेर काढा असे म्हणत पिचडांवर त्यानी शब्दसंहार केला. माजी आ. यशवंतराव भांगरे यांच्या पुर्णकृती पुतळ्याचे अनावरण करताना ते अकोले तालुक्यातील शेंडी बोलत होते. यावेळी त्यांनी अकोले तालुक्यातील अनेक मुद्यांना हात घातला.

ते पुढे म्हणाले की, यशवंराव भांगरे हे राज्याच्या राजकारणात सन 1962 मध्ये गेले होते. तर त्यांच्या नंतर मी 1967 साली राजकारणात आलो. म्हणजे त्यांच्याकडे आम्ही एक सिनिअर म्हणून पहात होतो. मात्र, त्यांच्यानंतर आम्ही एकत्र काम केले. खरंतर अकोले तालुक्यात आजवर जे-जे काही विकासाची मोठी कामे झाली आहेत. त्याचा पाया रोवण्याचे काम भांगरे यांनी केले आहे. त्यात साखर कारखाना, दुधसंघ, महाविद्यालय अशा काही गोष्टी सांगता येतील. खरंतर भांगरे यांना राजकीय कौटुंबिक वारसा आहे. कारण, 1952 साली येथे गोपाळराव भांगरे यांनी आमदारकी आली होती. त्यानंतर त्यांना यश आले नाही. खरंतर नगर जिल्हा पुर्वी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. तेव्हा 1957 ची निवडणुक झाली तेव्हा 1952 ला जे काही काँग्रेस आले होते. ते 57 साली फक्त बाळासाहेब भारदे वगळता काँग्रेसचे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे, हा जिल्हा एका वेगळ्या विचार सारणीचा आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करीत हा जिल्हा पुन्हा वेगळ्या दिशेने गेला. तेव्हा, यशवंतराव भांगरे यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले. त्यानंतर खर्‍या अर्थाने कारखानदारी झाली, धरणे झाली, पाण्याचे प्रश्न झाले. खरंतर हा जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. मात्र, सर्वात जास्त धरणांचा लाभ या जिल्ह्याला असेल. कारण, या तालुक्यातील लोक राजकारणासाठी इतके जागरुक असायचे, की कोपरगावला जर लग्नाला गेलो तर लग्नात लोक भाषणे करायचे. ते कशावर? प्रवरेचे पाणी कोणत्या तालुक्याला किती? तेव्हा लग्न कोणाचे आणि मांडताय काय तुम्ही.! तेव्हा ते म्हणायचे, पाणी महत्वाचे आहे. या जिल्ह्यात पाण्याबाबत प्रचंड जागरुकता होती. डॉ. किरण लहामटे व अशोकराव भांगरे असोत याच्यासह सर्वांनी एकजुटीची भूमिका कालच्या निवडणुकीत घेतली. तेव्हा येथे परिवर्तन झाले. हे काम जनतेने केले आहेे. माझी विनंती आहे. हा समंजसपण कायमचा टिकला पाहिजे. यावेळी पवार साहेब म्हणाले की, अशोकराव तुम्ही गेल्या निवडणुकीत मोलाची कामगिरी केली. त्याची प्रचिती मला स्वत:ला आहे. ते जे काही यश आहे. त्याची पताका आपल्याला कायम टिकवायची आहे.

साहेब म्हणाले, मध्यंतरी महाराष्ट्रात अनेक आमच्या मंडळींच्या अंगात आले. म्हणजे अंगात आलेली आमची मंडळी चमत्कारीक वागायला लागली. तेव्हा मला काही लोक म्हणाचे. आता कसं व्हायचं? तेव्हा मी म्हणत होतो. काही काळजी करु नका. मला आठवतय. 1980 साली निवडणुक झाली आणि माझ्या बरोबर काम करणारे 56 आमदार निवडूक आले. त्यावेळी की काही कामानिमित्त इंग्लंडला गेलो होतो. त्यानंतर आठ दिवसांनी मी पुन्हा आलो असता मला कळले की, तुमचे 56 आमदार आले त्यातील 50 गेले. म्हणचे 56 चा मी विरोधीपक्षनेता होता. तर मी 6 आमदारांचा मी नेता झालो. तेव्हातर विरोधीपक्षपद देखील माझे गेले होते. सगळे म्हटले आता कसे व्हायचे? म्हटलं तुम्ही काही काळजी करु नका. 10 पाच वर्षे कष्ट केले. मात्र, त्यानंतर जे काही 50 सोडून गेले. त्यातील 48 जणांचा पराभव झाला. त्यामुळे, सामान्य लोकांना हे नको असते. म्हणून, लोकप्रतिनिधींनी जनतेला जे काही शब्द दिले, ते पाळले पाहिजे अशी अपेक्षा असते. हीच भुमिका घेत तुम्ही जनतेने अकोले तालुक्यात परिवर्तन केले म्हणून तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो. खरंतर मी अकोले विधानसभा निवडणुकीसाठी एक सभा घेतली होती. तेव्हाच माझ्या ध्यानात आले होते की, तुम्हा सगळ्यांच्या मनात काहीतरी पक्क दिसतय आणि ते पक्कं तुम्ही मतदानातून दाखवुन दिले.

आता पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. रस्त्याच्या व अन्य विकासाच्या कामासाठी मुंबईला या. तेव्हा, पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे. तुम्ही दिलेला शब्द हा माझ्यासमोर दिला आहे. त्यामुळे, माझ्या समोर दिलेला शब्द हा वचनासारखा आहे. तो पाळला पाहिजे त्यासाठी जे काही करायचे आहे ते करा. दोन्ही रस्ते करायचेच आहे. ग्रामविकास मंत्र्यांना स्थानिक रस्ते करण्याचा पुर्णत: अधिकार असतो. अकोले तालुक्यासारख्या दुर्लक्षित भागाकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्री किंवा अन्य खात्याच्या मंत्र्यासोबत चर्चा करुन ते प्रश्न मार्गी लावू. खरंतर मला सर्वात जास्त आवडणारा भाग आहे. यावर पवार साहेबांनी एक आठवण सांगितली की, मी लोणी येथे इयत्ता नववीत शिक्षण घेत होतो. तेव्हा मी भंडारदर्‍याला सायकलवर आलो होतो. तेव्हापासून माझ्या डोक्यात हा सर्व परिसर माझ्या डोक्यात बसलेला आहे. त्यामुळे, यासाठी काहीतरी केले पाहिजे. हा तालुका पर्यटन होण्यासाठी प्रयत्न केला आणि सुविधा दिल्या तर याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र, सुविधा देताना ज्या भागात सुविधा देत आहोत. तेथे स्थानिक नागरिकांवर अन्याय होता कामा नये.

पवार साहेब म्हणाले की, येथील कारखाना कसा चाललाय मला माहित नाही. मात्र, काही काळापुर्वी आमित भांगरे यांना सांगितले की, तुम्ही कारखाना सुरू करायला मदत केली तेव्हा 35 कोटीत तो उभा केला. आता त्याच्या डोक्यावर 300 कोटीचे कर्ज आहे. ही चांगली गोष्ट आहे असे म्हणत त्यांनी प्रस्तापितांची खिल्ली उडविली. मात्र, तालुक्यातील शेवटच्या घटकाचे जे योगदान आहे. त्यात यशवंतराव भांगरे हे देखील एक घटक आहे. त्यामुळे, तालुक्याच्या विकासाला हातभार लावण्यात जे-जे काही पाहिजे. त्याला आमची साथ राहिल असा शब्द देतो. असे म्हणून त्यांनी कारखाना ताब्यात घेण्याचे संकेत दिले आहे.

महत्वाचे 

एक आनंदाची बातमी अशी की, आज दै. रोखठोक सर्वाभौमने मा. आ. यशवंतराव भांगरे यांच्यावर एक विशेष अंक काढला होता. तेव्हा, खुद्द शरद पवार साहेबांनी तो अगदी बारकाईने वाचून त्याची प्रत्येक पाने चाळली. अर्थातच सार्वभौमची क्वालीटी हीच त्याची ओळख आहे. त्यामुळे, साहेबांनी तो हातात घेणे आणि बराच काळ वाचन करणे हे आम्हासाठी प्रचंड आनंद देणारी गोष्ट आहे. जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा एका कार्यकर्त्याकडे अंक मागवून पवार साहेबांनी तो हेलिकॉप्टरमध्ये नेला. त्यामुळे, लिखाणाला एक नवी स्पुर्ती मिळाली आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी देखील सार्वभौमची सर्व पाने हताळून दिर्घकाळ वाचन करीत भाषण देखील त्यातील मुद्द्यावर केले. हे आम्हासाठी प्रचंड प्रेरणादायी आहे.