राजकीय संस्कार आणि संस्कृतीचे शांत, संयमी वादळ म्हणजे सत्यजित..!

सावभौम (संगमनेर) :- 

                सन 1983 साली संगमनेरच्या मातीत एक तरुण तडफदार नेतृत्वाने जन्म घेतला. जसे अभिमन्युने आपल्या आईच्या गर्भात अभेद्य चक्रव्युव्हचे कठीण कौशल्य अंगिकारले होते. अगदी तसेच हा बालक आपल्या मामा, आजोबांकडून पुरोगामीत्वाचे धडे घेत होता. तर वडीलांकडून सत्य व अहिंसेची शिकवण नकळत मिळत होती. त्यातुनच एक सुसंस्कृत बाळ जन्माला आले ते म्हणजे सत्यजित तांबे होय. घरातील कम्युनिष्ठ विचारसारणी आणि त्याचे कालांतराने झालेले काँग्रेसमधील रुपांतर हेच त्यांच्या आयुष्याचे अंतीम सत्य होऊन बसले. खरंतर त्यांचा कौटुंबिक वारसा पाहिला राजकारणापेक्षा समाजकारणाचा आहे. म्हणून तर गेली अनेक दशकं लोकांच्या मनावर या कुटुंबाने अधिराज्य गाजविले आहे. आई नगराध्यक्ष, पिताश्री आमदार, मामा महसुलमंत्री आणि आजोबांच्या विचारांचा वारसा. या सर्वांतून संगमनेराची जडणघडण झाल्याचे पहायला मिळते आहे. म्हणून तर नगर शहराचाच सोडा, जिल्ह्यात कोणत्या तालुक्याचा विकास नाही तितका संगमनेर तालुक्याचा आहे. हे सर्व फलित तांबे आणि थोरात कुटुंबाचे आहे. हेच निर्विवाद सत्य आहे. तर राज्यात असे तरुणांचे संघटन दिसणार नाही असे सत्यजित तांबे यांनी उभे केले आहे. म्हणून या कर्मयोगी व्यक्तीमत्वाला रोखठोक सार्वभौमचा सलाम..!

खरंतर घरात गांधी विचारधारेचे असल्याने लहानपणापासूनच सत्यजित यांना काँग्रेस विचारांचे बाळकडू मिळाले. पहिल्या पासुनच घरात सामाजिक कामाचा वसा असल्याने बालपणीच त्यांच्या अंगी नेतृत्वगुणांचे अंकूर रुजले गेले होते. वडिलांनी 1998 साली जयहिंद लोकचळवळ तालुक्यात उभी केली. या चळवळीच्या माध्यमातून लोकाभिमूख काम करण्यासाठी अनेकांना संधी मिळाली. एकीकडे सत्यजित यांचे 10 वी चे शिक्षण पूर्ण झाले आणि जयहिंद चळवळीतून पाहिलं पाऊल त्यांनी सार्वजनिक आयुष्यात टाकले. त्यानंतर हीच चळवळ त्यांच्या आयुष्याची एक अविभाज्य भाग ठरली. पुढे जात सह्याद्री ज्युनिअर कॉलेज येथे 11 वी व 12 वी चे शिक्षण घेत असताना या कालावधीत विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळण्याची आवड निर्माण झाली. 12 वी चे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर काँग्रेस विचारांची पहिली पायरी असलेली विद्यार्थी संघटना म्हणजेच एन.एस.यु.आय या विद्यार्थी संघटनेचे आकर्षण होते.त्यामुळे एन.एस.यु.आय विद्यार्थी संघटनेत सक्रीय सहभाग घेत या संघटनेत नेटाने काम सुरू केले. या कामाची दखल घेऊन एन.एस.यु.आय या संघटनेकडून त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्षपद मिळाले आणि ही जबाबदारी स्वीकारली. एकेकाळी लाल सलामांचा हा जिल्हा काँग्रेस विचारांचा झाला आणि तेच विचार आता जिल्ह्यातील कानाकोपर्‍यात तरुणांच्या माध्यमातून पोहचवायचा हाच मनाशी निश्चय बाळगून त्यांनी कामाला सुरुवात केली.एन.एस.यु.आयच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनचे प्रश्न त्यांनी सोडवले. त्यामुळे, वरिष्ठांना ही दखल घेऊन राज्यात काम करण्याची संधी दिली. सन 2000 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश एन.एस.यु.आय चे सचिव बनले आणि राज्यातील विद्यार्थ्यांनचे प्रश्न हाती घेऊन मार्गी लावु लागले. पण, तालुक्यात देखील जयहिंद लोकचळवळीचे कार्याध्यक्ष पद स्वीकारले. कामात कुठला ही कंटाळा न करता संधी मिळेल तेथे काम केले आणि संधीचे सोने ही केले. सत्यजित तांबे यांनी जयहिंद चळवळीतून 350 महिला व 60 युवा बचतगटांची स्थापना केली. काजु प्रकल्प चालु केले, सामुदायिक विवाह सोहळे घेतले. त्यामुळे जयहिंद चळवळीच्या माध्यमातून तालुक्यात युवक कार्यकर्त्यांचे संघटन केले. कार्यकर्त्यांच्या धाग्याने गुंफलेली नाती ही नेहमी सत्यजित यांच्या पाठीमागे पहाडासारखी उभी राहिली. लोकाभिमूख काम केलेल्या जयहिंद चळवळीच्या माध्यमातून तालुक्यात त्यांचे नाव प्रत्येकाच्या ओठांवरती राहिले. आता सत्यजित नावाचा निनाद संगमनेरकरांमध्ये चारही दिशांना गुंजतो आहे. याच कामाची दखल घेऊन तालुक्यातील घुलेवाडी गटामधून त्यांना 2007 साली काँग्रेसकडून झेडपीचे तिकीट मिळाले. त्यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित करत 7 हजार 500 मतांनी विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना जनतेची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. जनतेला विश्वासात घेऊन त्यांनी आपल्या गटाचा सर्वाधिक विकास केला. घंटो का काम मिंटोमेही अशी त्यांची नवी ओळख होत गेली. कुशाग्र बुद्धिमत्ता व वेगवान निर्णय क्षमता. यामुळे गटाचा विकास जलद गतीने करून घुलेवाडी गटाचा कायापालट केला.पण, याच दरम्यान विरोधकांनी त्याचे भांडवल करायचा प्रयत्न केला. त्यांचा स्वभाव चिडखोर व तापट त्यात सर्व काही नात्या गोत्यांचे राजकारण. पण, टिकेकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. आपली नाळ जनतेशी कशी जोडली जाईल व विकास कामे कशी केली जातील याकडे नेहमी त्यांनी लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे त्यांनी 2012 साली पठारभागावरील साकुर गटात उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. हा भाग विकासापासून अंशतः दुर होता. आपल्या हातून विकास कामे होतील त्यामुळे साकुर गटात उमेदवारी अर्ज भरला. परंतु, स्थानिक लोकसंख्या धनगर समाजाची अधिक असल्याने तेथे विरोधकांनकडून जातीचे भांडवल करायचा प्रयत्न झाला. राजकीय स्वार्थापोटी बहुतेकदा या कंड्या पिकवल्या. पण, त्या सर्व निष्फळ ठरल्या. तब्बल 5 हजार मतांनी विजय मिळवून विरोधकांवर त्यांनी मात दिली. साकुर गटात जिल्हा परिषद सदस्य असताना शासन आपल्यादारी हा अभिनव उपक्रम राबवला. या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या सर्वाधिक योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला.

सत्यजित नावाचं वादळ सदैव जनतेत राहिल्याने ते नाव आता थांबायचे नाव घेत नव्हते. 2014 साली विधानसभा निवडणूक लागली. या निवडणुकीत आघाडीत-बिघाडी झाल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती झाली नाही. दोन ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात सत्यजित तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि तेथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, त्यांनी यश अपयशाच्या क्षणात कुटुंबातील संस्कारांनी जमिनीवरचे पाय सुटू दिले नाहीत. संघर्षच्या परिस्थितीत धीर खचु दिला नाही. त्यामुळे, राजकारणात नेहमी चढ उतार येत असतात. मात्र, काँग्रेसच्या विचारांनी कार्यकर्त्यांशी नाळ जोडली असल्याने पुष्कळ बाके प्रसंग येऊनही कार्यकर्त्यांचे व सहकार्‍यांचे मोहोळ कधी दुरावले नाही. सत्तारूढ पक्षात असो किंवा नसो पण, काँग्रेसची विचारधारा मी कधी सोडणार नाही यावर ते ठाम होते. राजकीय पिंड काँग्रेसचा आणि तोच पुढे अविरत चालूच ठेवणार हेच तत्व त्यांनी अंगिकारले होते. 2014 मध्ये मोदी लाट आली आणि दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिली. राज्यात काँग्रेसचा हा पडतीचा काळ असला तरी यावेळी तरुणांना व नवोदीतांना उभारी भेटणार हा आत्मविश्वास नक्कीच होता. कारण, राजकीय जीवनात जनतेचा विश्वास कमावनं आणि टिकवणं ही खरी कसोटी असते. ती सत्यजित तांबे यांच्या नसानसात ठासून भरलेली होती. त्यामुळे, राज्यात काँग्रेसला युवकांचे पाठबळ मिळावे यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेऊन 2018 मध्ये काँग्रेस युवकांची धुरा सत्यजित तांबे यांच्या खांद्यावर सोपवली. सत्यजित यांनी देखील मोठे मन करून ती स्वीकारली. मंग काय.! पायाला भिंगरी लावून सत्यजित यांनी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व ठिकाणी दौरे करून नव्या रक्ताची नवी काँग्रेस उभी करण्याचा निर्धार केला. मग तेथील कार्यकर्त्यांना उभारी देऊन गाव तेथे शाखा हे अभियान राबवले. जेथे भाजप सरकारची धोरणे चुकीची वाटली, तेथे सत्यजित यांनी स्वतः पुढाकार घेऊन सरकार विरुद्ध जनजागृती केली. भाजप सरकारविरोधात युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. जसं पेरेलं तस उगेल या प्रमाणे नवरक्ताची काँगेस राज्यात उभी केली. त्याचे उत्तर आणि तांबे यांच्या धावपळीचे फलनिष्पत्ती 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आली. काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले. त्यामध्ये सिंहाचा वाटा युवकांचा ठरला. काँग्रेसला युवकांचे सरासरी मतदान मोठ्या प्रमाणात पडले आणि आज मितीला काँग्रेस राज्यात सत्तेची वाटेकरी झाली. त्यामध्ये सत्यजित तांबे यांचा देखील फार मोठा वाटा आहे. काल सत्यजित यांच पाहिलं पाऊल जयहिंद चळवळीच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात पडलं आणि आज काँग्रेसच्या विचारधारेवर ते अविरतपणे सुरू आहे. राजकीय बदल होतील, जातील मात्र, सत्यजित नावाच्या प्रवाहच डबकं कधीच झालं काही आणि होणार देखील नाही. कारण, या व्यक्तीमत्वाला थांबायचे माहित नाही तर सामाजिक प्रवाहानुसार वहायचे माहित आहे. त्यामुळे, संगमनेर एक राजकीय संस्कृती आहे आणि येथील राजकारण्यांवर वेगळे संस्कार आहे. तो नेहमी असाच वाहत राहो. हीच सदिच्छा.! त्याच संस्कृतीचा एक भाग सत्यजित तांबे हे आहेत. येणार्‍या काळात त्यांचे पाय नेहमी जमिनीवर घट्ट राहतील यात तिळमात्र शंका नाही. अतिशय शांतपणे आणि एकाग्रपणे ते कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणार्‍या या नितळ, निर्मळ व प्रांजळ व्यक्तीमत्वाला उदंड आयुष्य लाभो.!

- सुशांत पावसे  (संगमनेर)

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 450 दिवसात 730 लेखांचे 93 लाख वाचक)