निळवंड्याचा संघर्षमय जन्म.! धरणाचा फायदा कोणाला किती होणार? पाणी कुठंकुठ मुरणार.! याचा खरा शिलेदार कोण? वाचा अंतीम भाग 4

   

 - सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                           आघाडी सरकारच्या काळात निळवंड्याच्या कामाला गती प्राप्त होत होती. तर सत्ता बदल झाली की सगळा बट्ट्याबोळ होत होता. सन 2005 ते 10 च्या काळात काही कामे शिताफीने अटपली होती. तर वादग्रस्त मंजुर्‍या देखील बर्‍यापैकी मिळाल्या होत्या. अजित पवार यांनी वादात्मक निर्णर्यांवर तोडगा काढून आडलेले पाणी खाली काढून दिले होते. त्यामुळे, पाया भरुन भिंती उभी राहू लागली होती. म्हणून तर 2012 मध्ये निळवंड्याने डोके वर काढले आणि प्रथमत:च धरणात पाणी अडविण्यात आले होते. तेव्हा फार नाही मात्र, साठलेल्या पाण्यात अनेक शेतकर्‍यांच्या समाधानाचे प्रतिबिंब दिसत होते. ते निळेभोर पाणी म्हणजे सहा तालुक्यातील हजारे हेक्टर ओलीताखाली आलेली हिरविगार शेती भासत होती. हा आनंद अनेकांच्या गगणात मावेनासा झाला होता. त्यानंतर खर्‍या अर्थाने निळवंडे धरणात थेंबे-थेंबे तळे साचु लागले होते. ज्या थेंबाने येणार्‍या काळात अनेकांच्या आयुष्यात लाखो शेतकर्‍यांच्या मनात आनंदाचा समुद्र उभा राहणार होता. त्यामुळे सन 2012 ते 2015 पर्यंत काम सुरू ठेवताना आघाडी सरकारमधून ना. बाळासाहेब थोरात यांनी कोठे आपले प्रयत्न कमी पडू दिले नाही. तर माजी मंत्री मधुकर पिचड आणि शरद पवार यांनी मंत्रालयातून कोणतीही अडचण येऊ दिली नाही. वास्तवत: पवार कुटुंबाने एक पुरोगामी तालुका व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून अकोल्यावर विशेष प्रेम केले. त्यांनी संगमनेरात कधी हस्तक्षेप केला नाही. मात्र, अकोल्यात राष्ट्रवादीला पर्याय उपलब्ध होऊ दिला नाही. हे नातं राष्ट्रवादी आणि पिचड कुटुंब असे नाही तर अकोले आणि थेट बारामती (शरद पवार कुटुंब) असे ठेवले. म्हणून तर संस्थापक सदस्य पिचड साहेब भाजपात गेले तरी येथील जनतेची नाळ थेट बारामतीशी जोडून राहिली. याचे प्रमाण म्हणजे 2019 ची विधानसभा निवडणूक त्याची साक्ष देऊन जाते.

 सन 2010 ते 2014 या काळात देखील निळवंड्याचे काम सुरूच होते. कारण, या काळात आघाडी सरकार पुन्हा सत्तेत आले होते. यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे, मधुकर पिचड आणि बाळासाहेब थोरात हे दोघे सत्तात असले की पैशाला (निधी) तोटा नव्हता. मात्र, ज्याचा वशीला तोच काशीला, याचे उत्तम उदा. म्हणजे निळवंड्याचा निधी तोडका पडू लागला होता. तर पुढे 2014 च्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या होत्या. त्यावेळी अगदी निवडणूकीच्या काळातही शेवटच्या महिन्यात या पठ्ठ्यांनी 110 कोटीचा निधी मंजूर करुन घेतला. पुढे सन 2014 साली सत्ता पालटली. देशात मोदी लाट आली आणि या वादळाने भल्याभल्यांचे राजकारण कोलमडून टाकले. मात्र, संगमनेर व अकोल्याच्या बालेकिल्ल्यात हे वादळ काहीच करु शकले नाही. तरी देखील राज्यात युती सरकारने आपले पाय रोवले. आघाडीची सत्ता गेली आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर गिरीश महाजन पाटबांरे मंत्री झाले. सुदैवाने याच काळात निळवंडे धरणाला सन 2016 साली केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली. तर या पाठोपाठ म्हणजे 2017 साली युतीच्याच काळात निळवंड्याची चौथी सुप्रिमा पास झाली यात कालवे, पुल, धरण, भुसंपादन अशा अनेक गोष्ठींसाठी 24 शे कोटी रुपयांना मान्यता मिळाली. यातीला काही निधी प्रत्यक्ष मिळाला मात्र काही निधी मिळू शकला नाही. यात दरम्यान कालव्यांची काम चालढकल पद्धतीने सुरू होती. तर निधीची गरज असताना पुढे 2019 च्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. त्यावेळी माजी मंत्री विखे पाटील भाजपात दाखल झालेले होते. तेव्हा याच भाजपने अश्वासन दिले होते की, निळवंड्याचा कामासाठी साई संस्थांमार्फत 500 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. मात्र, दुर्दैव असे की 104 जागांचे दान जनतेने त्यांच्या पदरात टाकून देखक्षल त्यांनी 500 कोटी सोडाच परंतु पाच रुपयांचा रोख ठोकळा देखील निळवंड्याच्या कामी लागला नाही. 

एका विशेष बाब म्हणजे राज्याच्या तिजोरीत फारसा पैसा नव्हता. कारण, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या खोर्‍यांची कामे सुरू होती. तरी देखील निळवंड्याच्या कालव्यांची कामे सुरू राहिली होती. यावेळी डाव्या व उजव्या कालव्यांवरील अवघड व मोठा अडचणीचा साडे चार किमीचा कौठे कमळेश्वर येथील बोगदा, पिंपळगांव कोझीरा येथील बोगदा, गणेशवाडी, झोळे अशा काही बोगद्याची कामे मोठ्या विपक्ष परिस्थिती पूर्ण करण्यात आली. तर कालव्यांची कामे देखील सुरु होती. याला कोणी नव्हे तर पहिले म्हणजे आघाडी सरकार, शरद पवार, ना. बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिचड यांच्या प्रचंड धेय्यशक्तीच्या जोरावर हे धरण आणि त्यातील पाणी शेतकर्‍यांच्या पाटात खळखळून वाहणार आहे. यात तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की, या धरणावर उजवा कालवा 97 कि.मी लांबीचा असून 69 गावांची 20 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते तर डावा कालवा 85 कि.मी लांबीचा असून त्यात 113 गावांची 43 हजार 865 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. यात अकोले तालुक्यात 4 हजार 235 हेक्टर, संगमनेरात 25 हजार 428 हेक्टर, कोपरगावात 5 हजार 666 हेक्टर, राहाता तालुक्यात 17 हजार 261 हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यात 999 हेक्टर, राहूरीत 8 हजार 089 हेक्टर तर सिन्नर तालुक्यातील 2 हजार 612 हेक्टर अशा सहा तालुक्यातील 64 हजार 260 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय पाईप कालव्या अंतर्गत 2 हजार 328 हेक्टर व जलाशयावरील उपसा सिंचन योजनेतून 229 हेक्टर असे एकूण 68 हजार 878 हेक्टर तर 17 हजार2180 एकर सिंचन क्षेत्र प्रस्तावित आहे. 

दरम्यान सन 2019 च्या निवडणुकांचे वारे राज्यात वाहिले. शिवसेना भाजपला चांगल्या जागा मिळाला. मात्र, सत्तेच्या मोहापाई प्रत्येकजन वेगवेगळा गळ टाकत असताना शरद पवार आणि ना. बाळासाहेब थोरात यांनी असा आखाडा गाजविला की, राज्यात एक नव्हे तर तीन पैलवान एकाच वेळी विजयी झाले आणि एकच पहिलवान चारी मुढ्या चित झाला. नव्याने महाविकास आघाडीचे सरकार आले. ना भुतो ना भविष्यती अशी युती करुन बाळासाहेब थोरातांनी केंद्राची मनधरणी करीत राज्यात सत्ता स्थापन केली आणि महसूल मंत्रीपदावर ते विराजमान झाले. आता सत्ता हाती आली म्हणजे पैशाला (निधी) तोटा नाही. परंतु यावेळी त्यांच्या दिमतीला पिचड कुटुंब नव्हे तर डॉक्टर किरण लहामटे यांची साथ लाभली. नव्या सरकारमध्ये देणारेच थोरात साहेब असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा निळवंडे धरणाच्या फाईलवरील धुळ झटकली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यातून नाशिक येथे झालेल्या विभागीय बैठकीत या धरणाच्या कालव्यासाठी 1 हजार 100 कोटी मंजूर करुन घेतले आणि त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद करून कामांना वेग दिला आहे. आज उद्या बोलबोल करता सहा तालुक्यात हजारो शेतांमध्ये निळवंड्याचे पाणी जाऊन बळीराज्याच्या घरात धान्याच्या राशी उभ्या करतील. खरंतर अविर्भाव किंवा मोठेपण नाही, परंतु बाळासाहेब थोरात यांनी हे धरण उभे करुन संगमनेर तालुक्यातील तळेगाव आणि दुष्काळी भागात पाणी नेण्याचा जो संकल्प केला. तो आणि त्याचा पाठपुरावा खरोखर वाखान्याजोगा आहे. तेव्हा ते बोलताना म्हणतात आयुष्यातला परमोच्च आनंद तेव्हा असेल जेव्हा कालव्यांचे पाणी दुष्काळी भागात फिरेल. या वाक्याने त्यांच्या अंर्तमनाने खाल्लेल्या खस्तांचा ठाव लागतो हे मात्र नक्की.!

 भाग 4 संपन्न :

गेल्या काही दिवसांपुर्वी निळवंडे धरण भरले आणि त्यावरील रोषणाई मला भावली. त्यानंतर या धरणाचा इतिहास शोधावा वाटला. म्हणून मी निळवंड्याचा संघर्षमय जन्म. या सदराखाली रोखठोक सार्वभौम या पोर्टलवर चार भाग आपल्यापुढे सादर केले. ही माहिती घेताना मी स्वत: काही व्यक्तींना भेटून मुलाखती घेतल्या. त्याची टाचणं काढली, अन्य साहित्य वाचून काही माहिती संकलित केली. मला खात्री आहे. प्रत्येकाला न्याय देणे शक्य झाले नसले, काही वास्तव इतिहास राहून गेला असेल, तर काही ठिकाणी घटनाक्रम मागेपुढे एव्हाना विसंगती झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. जे सार्वभौमचे कायम वाचक आहे. त्यांनी फोन करुन माहिती दिली, जे नाहीत ते पडद्याआड राहिले. त्यांचेही योगदान अनमोल आहेत. हे सदर लिहीताना मला मिनानाथ पांडे, दशरथ सावंत, शिवाजी धुमाळ, अशोक भांगरे, नामदेव कहांडळ, विजय वाकचौरे याच्यासह अन्य जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. तर काहींशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र हे तीन भाग जवळजवळ ४० हजार पेक्षा जास्त लोकांनी वाचले. इतका उदंड प्रतिसाद आपल्याकडून मिळाला.  
सर्वांचे आभार.!

    - सागर शशिकांत शिंदे 

      (8888782010)