संगमनेरात आता डोंगळे चोरणारी टोळी सक्रिय.! पठारावर शेतकरी हतबल! पोलिसांनी डोंगळे चोरट्यांचा बंदोबस्त करावा
सार्वभौम (घारगाव) :-
आत्तापर्यंत सोने, चांदी, पैसे, गाड्या आणि धनसंपादांची चोरी झाल्याचे आपल्याला वारंवार ऐकू आले आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतातील कांद्याचे डोंगळे चोरून नेणार्या टोळीचा उदय झाला आहे. या टोळीने आत्तापर्यंत तीन ते चार शेतकर्यांच्या शेतातून डोंगळे चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शेतकर्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात जावून लेखी तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे, हे डोंगळेचोर शोधायचे तरी कसे? असा प्रश्न पोलिसांपुढे पडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंबीखालसा परिसरातील माळदवाडी येथे महादु पांडे यांनी आपल्या उसाच्या शेतात कांद्याचे डोंगळे लावले होते. येणार्या काळात त्याचे बी तयार करुन त्यांना काद्याचे उत्पादन घ्यायचे होते. हे डोंगळे लहानचे मोठे करुन ते आज काढण्यासाठी आले होते. पण, त्या अगोदरच चोरट्यांनी डोंगळे कापून नेले. याबाबत पांडे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. हा डोंगळचोरी प्रकार येथेच थांबला नाही. तर, पोलिसांनी कोणताही दखल न घेतल्यामुळे ही टोळी अधिक सक्रीय झाली. या घटनेनंतर याच परिसरातून आणखी दोन शेतकर्यांच्या शेतातून डोंगळे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना आंबी -खालसा याठिकाणी असलेल्या गणपीरदरा परिसरातील ज्ञानेश्वर किसन कहाणे यांनीही शेतातील कांदा बियाणे तयार करण्यासाठी डोंगळे लावले होते. हे डोंगळे कापणीसाठी आले असता, त्या अगोदरच बुधवार दिनांक 15 रोजी डोंगळे गँगने संपुर्ण डोंगळे खुडून नेले. तर चैतन्ययपूर येथे देखील ढुमरे यांच्या शेतातून काल डोंगळ्यांची चोरी झाली आहे. या सर्वांचे मिळून 50 हजार रुपयांच्या दरम्यान शेतीतील मुद्देमाल चोरी गेल्याची माहिती शेतकर्यांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिस स्टेशन मध्ये या तक्रारी लेखी स्वरुपात दाखल झालेल्या आहेत. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही दखल घेतल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे पोलीस अधिक्षकांनी अधिच सांगितले आहे. कोणताही अर्ज दाखल करुन घ्यायचा नाही. मात्र, फिर्याद लक्षात घेवून थेट गुन्हा दाखल करावा. असे असताना देखील हे अर्ज पोलीस ठाण्यात धुळ खात पडण्यासाठी घेऊन ठेवले आहेत का? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांचे आदेश येण्यापुर्वीच पोलीस उपाधिक्षक रोशन पंडीत यांनी वैयक्तीत लक्ष घालणे गरजेचे आहे. कारण, आज ही टोळी वाढत गेली तर कोरानाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि चोर्यांचा उच्छाद आवरता-आवरता पोलिसांच्या नाकीनव येईल. या सर्वात शेतकरर्याचे फार मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, पोलिसांनी वेळीच या डोंगळचोरी गँगचा पर्दाफाश केला पाहिजे.सद्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यामुळे सरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊनचा फटका सर्व सामान्य शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तर याचाच फायदा चोरट्यांनी चांगलीच घेतला आहे. कुठे दारूचे दुकान फोडणे तर कुठे टपरी पेटवून देणे, कोठे नुकसान करणे तर कोठे शेतमाल चोरी करणे, अशा पद्धतीने भुरट्या चोरट्यांनी चोर्या करण्यास सुरुवात केली आहे. यात सर्वसामान्य शेतकरी सगळीकडूनच मोठ्या संकटात सापडला आहे. आणि त्यातच अशा चोरट्यांनी शेतातील कांद्याचे डोंगळे चोरण्यास सुरूवात केली असल्याने शेतकर्यांची अवस्था ‘न घर का, न घाट का’ अशी दयनीय झाल्याचे पाहवयास मिळत आहे. त्यामुळे घारगाव पोलिसांनी डोंगळे चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही शेतकर्यांनी केली आहे.