चालते व्हा.! भर सभेत तलाठ्याचा "पंचनामा".! संगमनेरात शेतकऱ्यांना नोटीस.! थोरातांसह संघटनाही चूप.!

चालते व्हा गावातून..!

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                      एकीकडे "अवकाळी" पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हैदोस घातला होता. तर दुसरीकडे राज्यात सत्ता स्थापनेसाठी मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. अखेर तत्व, पक्ष, विचार आणि  मैत्री या सगळ्या शब्दांना ढाब्यावर बसवून तिघांनी सत्तेची समिकरण जुळविली व राज्याला अनपेक्षित त्रिशंकू सरकार बहाल केले. याच दरम्यानच्या काळात शेतकरी अक्षरश: आश्रू ढाळत असताना शरद पवार मातीत उतरले. तोवर भाजप व शिवसेनेत घटस्पोटाचे वारे वाहत होते. तर, काँग्रेस बघ्याच्या भुमिकेत होते. पण, महाराष्ट्राची गादी मिळताच सेनेचा अतृप्त आत्मा स्थिर झाला आणि अजब सरकार स्थापन झाले. त्याच काळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी शेतकऱ्यांना जवळ करत कनवळा दाखविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा होईल असे वाटले होते. मात्र, सत्तेच्या चाव्या हाती आल्यानंतर २ लाखांची कर्जमाफी घोषित केली. पण, अवकाळी पावसाने प्रत्यक्षात खऱ्या अल्पभुधारक व कष्टकरी, शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेत की नाही.! त्यांना मदत मिळते की नाही, प्रशासन योग्य काम करते की नाही ? हे कुठल्याही लोकप्रतिनिधींना पडताळुन पहावेसे वाटले नाही. या सत्तेची लालसा असणाऱ्या सरकारची खरी पोलखोल चक्क महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तळेगाव झाली.! वा रे.! उद्धवा, अजब तुझे सरकार.! कारण, या तळेगाव गटात तालाठी महोदयांनी चक्क ८० टक्के पिकांच्या नुकसानीचे पंचानामेच केले नाहीत. मग यांना भरपाई मिळणार तरी कशी ? मग काय.! हे उघड झाल्यानंतर तळेगाव, जुनेगाव, आरामपुर, आजामपुर, हासनाबाद ही पंचकृषी गप्प राहिल तरी कशी ? त्यांची काळजी कोणाला ? कारण, ज्यांना निवडून दिलेले असते, त्यांना काही करा अथवा नका करु. पण महिन्याला कमाल २ लाखांचा पगार मिळतो. पण, खरिपाचं पिक म्हटलं तरी किमान चार पाच महिने तरी शेतकरी मर-मर मरतो. तेव्हा कोठे पाच पंन्नास हजार मिळाले तर मिळतात. नाहीतर, तो बिचारा कष्टाचा धनी.! त्यामुळे, कष्टाची किंमत बीएमडब्लु व एसीत बसून फिरणाऱ्या नेत्यांसह अधिकाऱ्यांना काय कळणार.? अर्थात हे कोण्या समाजकल्याण मंत्र्याच्या भागात झालं असतं तर त्याला फारसे महत्व नसते. पण, हे चक्क घडलय माजी कृषीमंत्री, ज्यांना शेती आवडते म्हणून त्यांनी विलासराव देशमुख यांच्याकडून कृषि खातं मागवून घेतले होते. हे घडलय चक्क त्या महसुलमंत्र्यांच्या तालुक्यात की ज्यांच्या ताब्यात प्रत्येक जिल्ह्यातील  कोतवालापासून तर कलेक्टरपर्यंत सगळे अधिकारी खिशात असतात. म्हणून तर खेद व्यक्त केला जात आहे.

हॉप्पी बिर्थडे साहेब.! 

          वास्तव पाहता गेली कित्तेक वर्षे निळवंडे आणि भोजापुरच्या नावाखाली संगमनेरच्या नेतृत्वाने तळेगाव भागात राजकारण करुन त्याला "दुष्काळी" होण्याचे भाग्य दिले आहे. निळवंड्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे  मागील वर्षी ७ फेब्रुवारीला थोरात साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या भागातच लाक्षणिक उपोषण केले होते. हॅपी बिर्थडे.... हॅप्पी बिर्थडे कधी होणार निळवंडे असे हॅश टॅग करत उपोषणकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवले होते. मात्र तरी देखील या प्रश्नावर उत्तर मिळाले नाही. अखेर, देवेंद्र फडणवीस आले आणि आवेशाच्या भरात महिनाभरात प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन देऊन गेले. पण, ते बिचारे हे विसरुन गेले. की,  एकदा येथे आलेला आजी मुख्यमंत्री तो माजी झाल्याशिवाय राहत नाही. अखेर दुर्दैवाने येथील पायंड्याचा खंड पडला नाही आणि फडणवीस राज्याचे विरोधीपक्षनेते झाले. त्यामुळे, निळवंड्याचा प्रश्न भिजत पडला. पण, निसर्गाने तळेगाव परिसरावर दया केली आणि जळत्या पिकाला नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे यावर्षीतरी तेथील शेतकऱ्यांच्या मनात आशेचे किरण दिसू लागले होते. आता शेतीतुन उत्पादन वाढणार, घरात अन्नधान्याची रिघ लागणार, वर्षे-दोन वर्षाचा प्रश्न मिटणार. असे दिवास्वप्न डोळ्यासमोर तरळत असतांनाच पिक सोंगनीला आले आणि बेभान पावसाने तोंडचा घास मोतीमोल केला. आज-उद्या म्हणता म्हणता पाऊस तेव्हाच उघडला. जेव्हा उभं पिक पाण्यात तडफत पहुडून फुगून तरंगू लागलं. ज्या शेतात बळीराजा राबला, त्यानं काळाचं पाणी झाडांना घातलं तेथे पुन्हा डोळ्यांचे अवकाळी आश्रुंनी त्या पिकांना न्हाऊ घातलं. अखेर, जाणता राजा म्हणा किंवा शेतकऱ्यांचा कैवारी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने मदतीची घोषणा केली.

ज्याचंं जळतं ना.! त्यालाच काळतं.!

          आता हे सर्व काम तातडीने होणे आवश्यक होते. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी उदार मतवादी होऊन प्रांजळपणे बळीराजाला हात देणे गरजेचे होते. पण, झाले काय ? संगमनेर सारख्या दुष्काळी म्हणजे गरज असलेल्या भागात काय झाले ? केवळ "लालायलू" करत काही ठिकाणी पंचनामे झाले. तर, काही ठिकाणी झालेच नाही. येथे महसुलला वाळुचा मलिदा हवा.! पण, शेतकऱ्यांचे हित नको. येथे महसुलला वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करून घेण्यात स्वारस्य आहे.! पण, शेतकऱ्याच्या जमिनीत उध्वस्त झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पचनामे करण्यात इंन्ट्रस नाही,  येथे महसुली चंदा गोळा करण्याची पद्धत रुढ आहे, पण, शेतकरी उन्नतीकडे कोणाचे लक्ष नाही. अर्थात तालुक्यात बहुतांशी ठिकाणी प्रामाणिक अधिकाऱ्यांनी आपली भुमिका चोख बजावली आहे. पण, काही ठिकाणी अज्ञान शेतकऱ्यांना किती मोठा तोटा सहन करावा लागला आहे. म्हणून अशा बेजबाबदार व्यक्तीच्या विरोधात तळेगावकर रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाला जाब विचारु पाहिला. मात्र, तलाठी महाशयांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून संतप्त बळीराजाने चला चालते व्हा येथून असे म्हणत शेतकऱ्याचा कोणी बाप नाही.! अन तो कोणाचा गुलाम नाही हे छाती ठोकून सांगितले. आता प्रशासनाची चुक होती, शेतकरी संतप्त होते, कारण, कष्टाला मातीमोल किंमत मिळाली होती. त्यामुळे, जमावाचे मानसशास्र लक्षात घेता या महाशयांनी शांततेची भुमिका घेणे आवश्यक होती. तर, संघटनेने संयम बाळगणे महत्वाचे होते. पण, तसे झाले नाही. तलाठ्यास अपमानस्पद वागणूक आणि उलटपक्षी शेतकऱ्यांनाच अरेरावी असे आरोप प्रत्यारोप झाले. आता यात प्रांताधिकारी महोदय व खुद्द महसुल मंत्र्यांनी तोडगा काढणे महत्वाचे होते. साहेबांच्या एका फोनमुळे सगळ्या प्रश्नावर पाणी पडले असते. पण, प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटीसा काढत चर्चेला बोलविले. या रंगविलेल्या कागदी घोड्यांमुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले आणि गाव बंद करत  तलाठ्यावर कडक कारवाई करून त्यांची बदली करण्याची मागणी केली.

तळेगाव कडकडीत बंद.!

              अखेर वादावर पुर्णत: तोडगा निघालाच नाही.  पण, दुर्दैव असे की, एकीकडे अकोले विधानसभेत दुर्लक्षित पठार भाग आणि दुसरीकडे निळवंड्याच्या पाण्यामुळे अनदेखा दुष्काळी तळेगाव भाग. यांचे प्रश्न राजकारणाच्या अजेंड्यामुळे नेहमी ऐरणीवर येत राहिले आहे. शहराचा विकास झाला. पण, वाडी वस्ती आणि ठराविक प्रदेश नेहमीच उपेक्षित राहिला. तळेगावात झेडपी काँग्रेसकडे व पंचायत समिती शिवसेनेकडे.! होणार काय ? राजकारणच ना ? पण, याच ठिकाणी आमदारकीला ४५० मताचे लिड आहे. हे साहेबांना विसरुन तरी कसे चालेल.? एक महसुलमंत्री म्हणून साहेबांनी महसुलचा पालक न होता शेतकऱ्यांचा पालक होणे गरजेचे आहे. साहेब.! तुमची ईडा पिडा टळली आणि काँग्रेसचे राज्य आले. हे केवळ संगमनेरच्या प्रत्येक हितचिंतकांमुळे.! म्हणून, उद्या तुमचा वाढदिवस आहे. मागील वर्षी तुमच्या नावे या भागात निंदात्मक आंदोलने झाली होती. पण, या वर्षी तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजुने ऊभे राहिले. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. तर, प्रत्येकजन तुम्हासाठी उदंड आयुष्य मागेल. अन्यथा.! ये रे माझ्या मागल्या. या सर्वांमध्ये एक खंत राहुन जाते. ज्यांना आजकाल शेतकऱ्यांचे कैवारी म्हणू वाटते. ते डॉ. अजित नवले, राजु शेट्टी, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह शेतकरी नेते कोठे गेले. हे समजायला तयार नाहीत. शेवगाव प्रमाणे गोळीबार होऊन शेतकरी न्यायसाठी धारातीर्थ पडल्यानंतर नेते पुढे येणार आहेत की काय ? हा देखील प्रश्न समजण्यापलिकडचा झाला आहे.!

- सुशांत पावसे

(संगमनेर प्ररतिनिधी)

=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १७ लाख ५० हजार वाचक)