"संगमनेरचा इतिहास", "जिल्ह्याची योग्य पात्रता" थोरात साहेबांची मानसिकता.!

          
संगमनेर :- 
              इतिहासाने संगमनेरच्या मध्यवर्ती भागाच्या अस्तित्वाचे फार पुरातन पुरावे भुतकाळाच्या शिलालेखावर कोरुन ठेवले आहेत. असे म्हणतात संगमनेर सन ९४८ साली घिल्लम नावाच्या राजाने दान दिलेली भुमी आहे. तर, पुढे सन १०३५ चा संगमनेरचा ताम्रपट नगरच्या ऐतिहासिक मंडळाकडे आढळतो. याही पुढे आलो तर १४९० मध्ये संगमनेर हे सुभा (जिल्हा) म्हणून प्रचलित होते. नंतर शिवरायांच्या काळात ५६४ गावांचा एक सुभा होता. त्यात मंगळगड, जवळी, व्याघ्रगड, महिपत अशा अनेक ठिकाणी सुभे असल्याचे पुरावे आहेत. नंतर, १६३० सालात निजामाच्या पत्रात देखील संगमनेर अधोरेखीत केले आहे. इतकेच काय.! पुढे १७ व्या दशकात प्रवरेकाठी राहणारे "बुद्धीवंत" शाहणे "विठ्ठल सुंदर परशरामी" या साडेतीन शाहण्यांपैकी एक "बुद्धीचातुर्य" व्यक्तीमत्व याच संगमनेरचे होते. याच समकालिन कालखंडात संगमनेर म्हणजे "परगणा" झाल्याच्या काही नोंदी आहेत. कारण, येथे ११ सुभ्यांचे मुख्यालय म्हणून २४ लाख २५ हजार ०१९ रुपये महसुल गोळा केला जात असे. तर धांदरफळ, संगमनेर, सिन्नर यांच्यासह अन्य परिसरात १८ लाख ५५ हजार ०८० रुपये कर जमा केला जात असे. त्यामुळे बेशक हि धरती पुर्वापार मध्यवर्ती ठिकाण असल्याचे दिसून येते. इतकेच काय.! तर, १७ व्या शतकाच्या अखेरीस येथे चांगली लोकसंख्या होती. त्यामुळे, संगमनेरात फार लवकर सर्व प्रशासकीय यंत्रणा उभ्या राहिल्याचे लक्षात येते. त्यामुळे, काल शिवकाल आणि इंग्रज काळ यांनी संगमनेरला जिल्ह्याचा दर्जा देऊन महसुल गोळा करण्याचे केंद्र केले. त्यामुळे, आजही २०२० मध्ये ना. बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने येथे महसुलचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे, संगमनेर जिल्हा होण्यास कोणताही अडथळा नाही. असे जिल्हा निर्मिती हितचिंतकांना वाटते आहे.
               संगमनेरचा इतिहास अभ्यासला तर तो अगदी "सुवर्णक्षरांनी" लिहीला जावा. इतका "तेजस्वी आणि ओजस्वी" आहे. कारण, निजामाला हैद्राबादच्या गादीवर बसविणारा एक शहाणा विठ्ठल सुंदर परशरामी हे याचा संगमनेरचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे व्रत घेऊन त्याच्याच व्यासपिठावर अखेरचा श्वास घेणारे विठ्ठल उमप याच संगमनेरचे, शब्दांच्या तलवारीचा "फटका" देणारे "आनंत फंदी" याच संगमनेरचे, जॉनी वॉकर, बोऱ्हाडे, जोशी, धात्रक, मालपाणी, बंदावणे, कोकणे, युसुफ खान, राजन झांबरे, किशोर कदम असे मात्तब्बर कलाकार आणि क्रिकेटर अजिंक्य राहणे देखील याच संगमनेरचे. अगदी "सातवाहन" राजवटीपासून म्हणजे २३ शे पुर्वीचा वारसा या संगमनेर शहराला लाभला आहे. त्यामुळे, छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब, लोकमान्य टिळक, परांजपे, केशव भासले, बालगंधर्व यांच्यासह अनेकांनी संगमनेरात अतिथि म्हणून पाऊल टाकले आहे. त्यामुळे, फार मोठी एतिहासिक पार्शभुमी असलेला तालुका. जिल्हा व्हावा. यासाठी गेली २५ वर्षापासून प्रयत्न सुरु असल्याचे दिसते आहे.
              आता तांत्रिक बाबी लक्षात घेता. नगर जिल्ह्याचे विभाजन होण्यास कोणतीही अडचण नाही. फक्त तो शिर्डी, श्रीरामपूर कि संगमनेर येथे येऊन घोडे आडले आहे. परंतु, येऊन जाऊन राजकीय अजेंड्यावर घोडे पाणी पेईनासे झाले आहे. कारण, जो तो आपले राजकिय हितसंबंध जोपासू पाहत आहे. उदाहरणार्थ नगरच्या उत्तरेला शिर्डीचा खासदार आहे. त्यांनी संगमनेरला सपोर्ट करावा तर श्रीरामपूरकर नाराज होतील आणि श्रीरामपुरला सपोर्ट करावा. तर संगमनेरकर नाराज होतील. पण, हे संधीसाधू लोकप्रतिनिधी जनकल्याणाचा विचार कधी करणार नाही. की, कोणत्या प्रांताला जास्त गरज आहे. वास्तवत: अकोले तालुका दुर्गम आहे. येथील घाटघरचा व्यक्ती अ. नगरला जाण्यासाठी पहिले अकोले किंवा संगमनेरात मुक्कामी येतो. मग नगरला जाऊन प्रशासकीय काम करुन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी जातो. हे २५० ते पाऊनेतीनशे किमी. अंतर अन्य जिल्हा झाल्यानंतरही तेच राहणार आहे. त्यापेक्षा आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी संगमनेर जिल्हा योग्य आहे. हे ठणकावून सांगण्यासाठी मतमागू स्वार्थी नेते पुढे येणार नाहीत. त्यामुळेच तर, हि लढाई खुद्द अकोलेकरांनी लढणे गरजेचे असणार आहे.
               खरं पाहिले तर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी तेथे रेल्वे हा मुद्दा सोडला. तर, फारसे फुरक उत्तर नाही. कारण, अवघे ५६९.८५ क्षेत्रफळ व ५४ गावांचा तो तालुका कुख्यात गुन्हेगारीच्या आलेखात अग्रणीय असल्याचे बोलले जाते. तर, ज्याला तुम्ही जिल्ह्याचे रुप देऊ पाहतात तेथील लोकसंख्या सर्वात कमी म्हणजे २ लाख ५६ हजार ४३१ इतकी आहे. तर हिच लोकसंख्या संगमनेरची ४४ लाखांच्या पुढे आहे. तर तुलनेत क्षेत्रफळ दोनपट जास्त असून येथे गुन्हेगारीचा सीआर केवळ ५४ आहे. तुलनात्मक दृष्ट्या शिर्डी देखील साईंचे देवस्थान वगळता संगमनेरच्या निकषात कोणताही तालुका जिल्ह्यास तुल्यबळ बसत नाही. राहाता तालुक्यात २ लाख ८८ हजार लोकसंख्या असून शिर्डी धरुन ७५९.१९ इतके क्षेत्रफळ येते. जे संगमनेरच्या अर्धापट कमी आहे. कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण नाही. त्यामुळे, त्याचा जिल्हा करणे म्हणजे प्रशासनाचा "झेड" होईल. पण, तरी येवल्याचा काही फेरबदल झाला. तर मात्र चित्र वेगळे असेल. तरी राहाता आणि कोपरगाव सर्व दृष्ट्या समसमान आहे. प्रश्न उरतो राहुरीचा. अर्थात राहुरी सोडले की ४४ किमी अंतरावर नगर शहर लागते. शहराचा फेरबदल होणे अशक्य आहे. त्यामुळे, राहुरीचा उत्तर भाग संगमनेरला जोडणे योग्य ठरेल. तसेही तेथील क्षेत्रफळ शेती, धरण व विद्यापिठासाठी फार मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहे. तेथे १०३५.११ इतके क्षेत्रफळ असून ३ लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे, या तालुक्याचे मोठी तोडफोड होणे शक्य आहे. जर संगमनेरचे घारगाव व अकोले तालुक्यातील राजूर हे तालुके झाले. तर, जवळपास २० लाख ५० हजार लोकसंख्या व ६२९९.४१ क्षेत्रफळ असणारा जिल्हा म्हणून संगमनेर पुढे येण्यास काही हरकत नाही. जर, नाशिक विभागाकडून सिमारेषा पाहिल्या. तरच संगमनेर काहीसा संकुचित वाटेल. पण, अन्य सिमारेषांचा विचार करुन आदिवासी भागास जर विकास, शिक्षण व समाजाच्या मुळ प्रवाहात आणायचे असेल. तर, संगमेनर जिल्हा. हाच योग्य मार्ग आहे. असे भुप्रदेश, लोकसंख्या, सामाजिक दृष्टीकोण अंगी बाळगल्यास उत्तर मिळून येते.
          आता हे सर्व कितीही भारुड मांडले. तरी, ४५२६ क्षेत्रफळ असणारा पालघर जिल्हा होतो. नंतर ७३६.२६ क्षेत्रफळ, ९८ गावे व ३ लाख ११ हजार ७६६ लोकसंख्या असणारा लातुरमधील उदगीरचा तालुका जिल्हा होऊ लागतो. तर संगमनेर का नाही ? ही फार मोठी आत्मचिंतनाची गोष्ट आहे. थोरात साहेब म्हणतात, नगर जिल्ह्याचे तुकडे का करायचे ? त्यामुळे, त्यांच्या या गुपीत वक्तव्याने फार काही मोठा संदेश दिला आहे. मात्र, तरी त्यांची मानसिकता जोवर होत नाही. तोवर संगमनेर जिल्ह्याला मुहुर्त निघेल असे वाटत नाही. तरी संगमनेर जिल्हा सपोर्टीव्ह धोरण म्हणजे "लढे है.! तो और लढेंगे".!
टिप :- वरिल लेख मांडताना प्रशासकीय माहितीचा आधार घेतला आहे. आकडेवारी मागेपुढे असली तरी अद्यावत अकडेवारीने उलट चांगला फरक पडेल. त्यामुळे, काही गोष्टी संदिग्ध असल्या, तरी अंदाजे त्या मर्मावर बोट ठेवण्यास पुरक आहेत. लेखाबाबत कोणास काही मत नोंदवायचे असेल. तर मेल करावा.
पुढील भाग तीन क्रमश:

- सागर शिंदे

(अकोले)
=============
                 "सार्वभाैम संपादक"
                 
               सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १५० दिवसात २५० लेखांचे १६ लाख २५ हजार वाचक)