संपादकीय :-
या मातृभुमिच्या मातीने अनेक "निधड्या छातीच्या" महापुरुषांना जन्म दिला. एकीकडे उपेक्षित घटकांना आरक्षण देऊन मुळ प्रवाहात आण्यासाठी शाहु महाराजांनी पद-दलीतांसाठी पहिले पाऊल टाकले. तर, एक स्री शिकली तर शंभर स्रीया उभ्या राहतील असे म्हणत अंगावर चिखल, शेणमाती घेत फुले दाम्पत्य "कर्मठ समाज" व्यवस्थेच्या "उरावर" पाय रोवून ऊभे राहिले. या सर्वांना डोळ्यासमोर ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे "संविधान" लिहीत छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील "सुखी रयत" असणारे "स्वराज्य" निर्माण करु पाहिले. पण, आज दुर्दैव असे.! की, त्यांचीच नावे घेऊन त्याच देशात राजकारण केले जाते. रयतेची दिशाभूल केली जाते, त्यांच्या पाऊलखूणा लिलावात काढल्या जात आहेत. इतकेच काय.! तर, आता पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी होऊ लागली आहे. हे किती मोठे धाडस म्हणायचे ? महाराष्ट्रात "मी" पणा बाळगला आणि देवेंद्र फडणवीस सरकार १०५ या बहुमतात असूनही सत्तेबाहेर बसले. इतकेच काय, एकला चलो रे.! चा नारा देणारी वंचित आघाडी लोकसभा आणि विधानसभा यात चारीमुंढ्या चित झाली. सांगायचे तात्पर्य एकच. की, भाजपच्या अंगी इतका "गर्व" आणि "मीपण" कोठून येतो. जनतेने दोनदा निर्विवाद हकहाती सत्ता दिली, म्हणून तर हा उन्माद नाही ना ? पण, लोकशाहीत हिटलरशाहीने कोणी राजे व शिल्पकार होऊ पाहत असेल. तर जनता काय करु शकते. हे इंदिरा गांधींनाही मतदारांनी दाखवून दिले आहे आणि भाजपला देखील. त्यामुळे, नरेंद्र मोदींना छत्रपतींच्या रुपात पाहणे किंवा दाखविणे याची फार मोठी किंमत भाजपला मोजावी लागणार आहे. आता जरी भाजपने पलटवार केला. तरी जनता इतकी दुधखुळी नाही. की, गोयलांच्या इतक्या मोठ्या चुकीला ती पाठीशी घालेल. आता फक्त विषय एकच आहे. की, भाजपने एनआरसी, सीएए वरील लक्ष हटविण्यासाठी हा डाव तर टाकला नसेल ना ? अन्यथा महाराष्ट्राच्या भावनिक अस्मितेला धक्का लावण्याची इतकी मोठी चूक ते कशी करु शकतात.? ज्याचा शेंडा आणि बुडूख असा कोणताही संदर्भ जुळूच शकत नाही. त्याची तुलना होऊच कशी शकते.!!
|
मोदी ते डॉ.आंबेडकर
|
भाजपचे जेष्ठ नेते गोयल यांनी "आज के शिवाजी-नरेंद्र मोदी" असे तुलनात्मक लिखाण केले. यापुर्वी देखील भाजपचे खा. अमर साबळे यांनी नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. अशी वल्गना केली होती. अर्थात या नेत्यांना झाले तरी काय ? हेच कळायला तयार नाही. आपण, कोणाची तुलना कोणाशी करतोय.! हे त्यांना कळायला तयार नाही. तर, यांना लेखक किंवा विचारवंत म्हणावे तरी कसे ? उगच पक्षात बढती मिळावी म्हणून काहीतरी बरळायचे आणि नकळत पक्षाचा तोटा करुन घ्यायचा. असाच काहीसा हा प्रकार घडला आहे. अर्थात यात नरेंद्र मोदींचा कोणताही दृश्य स्वरुपात हातभार नाही. त्यामुळे, त्यांना दोष देणे अयोग्य ठरेल. पण, त्यांनाही या तुलनेवर अक्षेप वाटत असेल. तर, त्यांनी या पुस्तकाचे मनुस्मृतीसारखे दहन करावे. अशीच शिवप्रेमींची इच्छा आहे. कारण, ज्या संविधानाने मोदीजींना पंतप्रधान केले. ते लिहिताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. मी संपुर्ण संविधान लिहिताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभे होते. आता या वाक्यावरुन शिवरायांची महती नव्याने सागायला नको.!
पण, तरी आठवण करुन द्यावी वाटते. की, आज भारतात एनआरसी, सीएए, ३७० कलम, तिहेरी तलाक असे कायदे करुन मोदी सरकारने जो मुस्लिम विरोधी द्वेष ओढावून घेतला आहे. तो रोष छत्रपती शिवरायांनी कधी आपल्या माथी मारुन घेतला नाही. उलट, त्यांच्या अंगक्षकापासून (सिद्दी इब्राहम) ते तोफखाना प्रमुखापर्यंत (इब्राहीम खान) अनेक विश्वासू ठिकाणी मुस्लिम सैन्य तैनात होते. आज मोदी सरकारमध्ये ३०५ खासदारांपैकी आरक्षण वगळून किती खासदार आहेत.? इतकेच काय ! राज्यांनी त्यांना सापडलेल्या कुरानाच्या प्रति त्यांनी सही सलामत वापस केल्या होत्या. दुष्मणाला तत्वाने दुष्मण म्हणण्याची वृत्ती महाराजांमध्ये होती. पण, आपले पंतप्रधान दुष्मणाच्या प्रांतात जाऊन त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतात. धर्मनिर्पेक्ष राष्ट्रापेक्षा अखंड हिंदुराष्ट्र करण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसतात. ज्या पाकिस्तान, चीन, जपान, व्हिएतनाम, अमेरीका अशा देशांमध्ये छत्रपती शिवरायांना युद्धनितीचे जनक मानतात. तेथे भाजपचे महाशय मोदींनाच प्रती छत्रपती म्हणून पुढे करु पाहतात. ज्या शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी "शेतसारा" बंद केला, कर्ज देऊन कर्ज माफही केले. त्यांची तुलना ज्या मोदी सरकारच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जन्मापासून तर मृत्यूपर्यंत हर एक गोष्टींवर लादलेला कर भरलाय, अशा व्यक्तीशी छत्रपतींची तुलना होऊच कशी शकते.?
|
सहमत.!! जा जू जी
|
आता हे मोठेपण मिरविण्याच्या नादात महाराष्ट्राने त्यावर पाणी फेरले आहे. एनआरसी व सीसीए थांबते कोठे नाहीतर पुन्हा या भावनिक अस्मितेला घेऊन जनता रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे, या पेटलेल्या जनप्रक्षोभावर पांघरुन घालताना भाजपचे प्रवक्ते संजय मयुर म्हणाले, या पुस्तकाचा आणि भाजपचा काही एक संबंध नाही. तर, गोयल म्हणतात. जर, पक्षाने मला आदेश दिला. तर, मी हे पुस्तक मागे घेऊ शकतो. यात अजून इन्ट्रेस्टेड गोष्ट म्हणजे, भाजपचे उपाध्यक्ष शाम जाजू म्हणतात, मी या पुस्तकाचे समर्थन करतो.! यात वावघे असे काही नाही. असे अनेक प्लस मायनस स्टेटमेंन्ट भाजपकडून येत आहे. त्यामुळे, दिशाहीन पतंगासारखी यांची परिस्थिती असल्याचे दिसत आहे. केवळ, मोदीजी यांच्याकडे जी निर्णयक्षमता आहे, युद्धनिती आहे, गणिमी कावा आहे, संबंध जोपासणे आणि संघटन कौशल्य, राजनिती असे काही पैलु आहेत. ते छत्रपतींच्या साम्यशी मिळते-जुळते आहे. म्हणून त्याचे विश्लेषण करुन मुखपृष्ठावर शिवराय व मोदी यांचे चित्र रेखाटले आहे. मात्र, याला उत्तर देताना विचारवंत म्हणतात. सुट, बुट, टाय अन् कोट घालून कोणी डॉ. बाबासाहेब बनत नाही. हे तर छत्रपती आहेत. आता नशिब.! कि संविधानात "आर्म अॅक्ट" नावाचा कलम आहे. नाहीतर अधुनिक भाजप नेत्यांनी स्वत:ला मावळे समजून खुलेआम हातात नंग्या तलवारी घेऊन हवे त्यांचे शिरच्छेद केले असते आणि कन्हैय्या कुमार सारखा देशद्रोहाचा खटला ठोकून प्रकरण दफन केले असते.!!
|
छ. राजे ते मावळा.!
|
खरोखर भाजपचा हा स्टंन्ट न समजणारा आहे. चारदोन निर्णय घेऊन जग जिंकल्यासारखा अविर्भाव निर्माण करणे. कितपत योग्य आहे. बरं जे निर्णय घेतले. त्या प्रत्येकाच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. जर जनविरोधी काम करायचे आहे. तर ही लोकशाही म्हणायची की हिटलरशाही.? असे प्रश्न सुज्ञ नागरिक विचारु लागले आहेत. शिवरायांशी तुलना करताना त्यांचे सैन्याचे नियोजन, जलव्यवस्थापन, शेती विषयक धोरण, जलमार्ग, बांधकाम, रयतेचे सुख, स्वराज्याची निर्मिती, जातींची सर्वसमावेशकता, प्रतिनिधित्व, सुरक्षा, न्याय व्यवस्था, स्री सन्मान, अन्य धर्मांचा आदर असे एक ना अनेक त्या काळच्या व्यवस्थापनाचे मुद्दे व आजच्या नियोजनाचे मुद्दे यात कोणतेही साम्य वाटत नाही. साधं सुरक्षा हा विषय घेतला तरी पुलवामा व उरीत कोण कोठून आले आणि ५० जवान मारुन गेले. अजून समजले नाही. येथे स्वराज्याची निर्मिती करताना प्रत्येक निर्णयावर रयत रस्त्यावर उतरत आहे. याला रयतेचे राज्य कसे म्हणता येईल ? ज्यांनी देशात बाॅम्ब हल्ले घडवून आणले, ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी अत्याचार केले, ज्यांच्या मागावर कालपर्यंत पोलीस होते. आज असेच लोक भाजपच्या सत्तेत बसले आहेत. हाच शिवरायांचा वारसा आहे का ? मग नेमके कशात या लेखकांना साम्य वाटते.! हे सुज्ञ मानसांना न कळण्यापलिकडचे आहे.
यांनी मोदीजींना चाणक्य म्हणावं यात कोणाला गैर वाटणार नाही. पण, ज्यांनी काळानुरुप पुरोगामी देशाच्या निर्मितीसाठी साम, दाम, दंड, भेद न बाळगता अहिंसा आणि सत्याचा मार्ग जोपासला. त्या कोणाचीही तुलना जनता खपवून घेणार नाही. यापुर्वी यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान व्यक्तीला १९६५ साली पाकचा नामोहरम केल्यानंतर आचार्य आत्रे यांनी "प्रति शिवराय" म्हणून संबोधले होते. पण, त्यावर प्रतिउत्तर देत चव्हाण म्हणाले होते. की, असे "युगपुरुष" पुन्हा होणे नाही. त्यांची सर माझ्या वाट्याला कधीच येऊ शकत नाही. अर्थात हे त्यांचे मोठेपण होते. अगदी तेच मोदी साहेबांनी दाखवायला हवे होते. जे झाले ते झाले. मी त्यांचा मावळा असे म्हणत प्रश्नावर पडदा पडला असता. पण, जोवर एनआरसी व सीएए लोकांच्या नजरेआड होत नाही. तोवर साहेब समोर येत नाहीत. असेच काहीतरी अनेकांना वाटते आहे.
|
मोदी ते मा. गांधी
|
इतिहास असे सांगतो. की, राजे छत्रपती असे म्हणत होते की, माझ्या स्वराज्यातील "गवताची काडी" देखील कोणाकडे गहान राहता कामा नये.! इतके प्रेम राज्यांचे स्वराज्यावर होते. पण, आज त्याच स्वराज्यावर भाजपच्या काळात सहा हजार कोटी रुपये कर्ज झाले आहे. राज्यांचा वचननामा होता. "सर्वांस पोटास लावणे आहे", पण, आज त्यात राज्यात लाखो जनतेच्या पोटाला अन्न नाही, हाताला काम नाही. मग कोठून कोठे चालली तुमची तुलना ? त्यामुळे, देशाची अस्मिता असणाऱ्या कोणत्याही मोठ्या नेत्यांवर कोणी राजकारण करु नये.! इतकेच काय.! तर, त्यांच्या प्रतिमेकडे पाहुन स्वत:ची परावर्तीत प्रतिमा त्यांच्यासारखी आहे. अशी धारणा देखील कोणी करु नये. मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो. कारण, गेली कित्तेक वर्षे आम्ही छत्रपतींच्या आणि घटनापतींच्या स्मारकचे आराखडे धुळ खात पडलेले पाहिले आहे. आता फक्त त्यांच्या ऐवजी तुमचे पुतळे पाहणे जनतेला बाकी आहे. याहीपलिकडे या पुस्तकाच्या लेखकाला पद्मश्री देऊ नये म्हणजे झालं. नाहीतर खोटा इतिहास लिहीणारे इतिहास घडवून जातात. हे देखील या मातीने पाहिले आहे. आता जनतेला काही नको आहे. त्या पुस्तकाचे मनुस्मृतीप्रमाणे दहन करा आणि विषय संपवा. बस इतकीच जनतेची मागणी असल्याचे दिसते आहे.!!!
सहकार महर्षी, स्वातंत्र्यसैनिक तथा संगमनेरचे शिल्पकार व जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या भाऊसाहेब थोरात, यांच्या जीवणावर प्रकाश टाकणारी कहाणी. त्यांचे सहकारी मित्राच्या माध्यमातून (वय वर्षे ९०) घेऊन आम्ही आपल्यासमोर सदर करत आहोत. "संगमनेरचे शिल्पकार" भाग १
- सागर शिंदे
=============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १३० दिवसात २४५ लेखांचे १५ लाख ८० हजार वाचक)