"ठोकून गेला सारा गावं, अन "कागदोपत्री" विखेंचे नाव.! रामराया ! असले आरोप बरे नव्हे.!
भारतीय "संस्कृतील" फार मोठा "वारसा" लाभलेला आहे. पण, त्यात फार "कच्चे दुवे" देखील तितकेच आहेत. त्यांचाच फायदा घेत काही लोक "राजकारण" करु पाहतात. "करायचं एकाने आणि भोगायचं दुसऱ्याने" जे आपल्याला जमले नाही. की, लोटा दुसऱ्यावर.! मांडा अपयशाची "भरमसाठ" कारणे.! करुन-सवरुन आपण "नामानिराळे" कसे.! हे सिद्ध करायला या "निर्ढावलेल्या व्यवस्थेला" चांगलेच ठावूक होऊन गेेले आहे. पण, "आपल्या बुडाखाली किती अंधार आहे. तो कोणी दाखवायला तयार नाही".! हिच वस्तुस्थिती आज "विखे वर्सेस भाजप पराभूत टिम" यांच्यात पहायला मिळत आहे. अर्थात भाजपचे हे सगळे पराभूत उमेदवार, यांच्या "कर्तुत्वशुन्य" कामामुळे पडले आहेत. परंतु, पराभवाला "विखेंच्या नावाची पुरवणी" जोडली आहे. वारे "बहाद्दर".! जेव्हा विकास करायचा तेव्हा "ठेकेदार" पोसत बसले.! तालुका "कोरडा ठाक" होता तेव्हा "कोट्यावधींचे बॅनर" ठोकत बसले. आजवर जनता आंधळ्याचे रुप घेऊन सोसत होती तुम्हाला. मग, निवडणुकीत संधी आली आणि सारा गाव (मतदान) ठोकून गेला. आता पराभवाचे शल्य अपचण होईना. म्हणून विखेंच्या माथी खापर फोडू पाहत आहेत.? म्हणजे, "ठोकून गेला सारा गाव अन कागदोपत्री विखेंचे नाव"! वा रे पठ्ठे.! पण, "वास्तव" जनतेच्या समोर नक्कीच मांडले पाहिजे. म्हणून हा जय पराजयाचा अन्वयार्थ.!
देशात "लोकप्रिय व्यक्तीमत्व" असणाऱ्या "मोदींची लाट" आली आणि त्यात नको-नको ते "गबाळ" वाहुन आले. त्यानंतर देशात व राज्यातही भाजपची सत्ता आली. अर्थात कोणी कर्तुत्वाने निवडून आले. तर कोणी स्वबळावर उभारी घेतली. यात २०१४ ला नगर जिल्ह्यात पाच आमदार भाजपचे आले. त्यानंतर, या पक्षाला इतका "ग" चढला. की, यांचे पाय जमिनीला टेकेनासे झाले. हे तुम्ही मी पुन्हा येईल.! यातून अनुभविले. त्यामुळे, जनता आणि लोकप्रतिनिधी येथे डायरेक्ट "व्यस्त चलन" दिसून आले. पाच वर्षात अब्ज, कोटी आणि सगळे आकडे लाखात कानावर पडत होते. प्रत्यक्षात मात्र नवा रुपये जनतेच्या हाती पडला नाही. राम शिंदे तर पालकमंत्री आणि एकेकाळी सहा खात्याचे मंत्री होते. त्याहुन महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे होते. पण, दुर्दैव असे की, त्यांच्या मतदारसंघात बारामतीहुन पिण्याचे पाणी खुद्द रोहित पवार पुरवत होते. ज्या शिंदे साहेबांनी कुकडीच्या पाण्यासाठी आजवर संघर्ष केला. मात्र, ते मंत्री झाल्यावर कुकडी सोडा, थुकडी बाहेर पडत नव्हती. इतका भयंकर दुष्काळ कर्जत-जामखेडने मर म्हणून सोसला. बरं नाव त्यांचे राम.! पण, दुष्मण असा लाभला. "की हुँ नाही, की चू नाही".! शिंदे साहेब पालकमंत्री असताना त्यांच्यावर टिका होत असे. कि, ते निव्वळ कर्जत-जामखेडचे पालकमंत्री आहेत. पण, स्थानिक लोक प्रतिउत्तरात म्हणत असे.! ते केवळ इथले रहिवासी आहेत. त्यामुळे, चौंडी आणि अन्य विषय सोडता. त्यांनी जनतेच्या आत्मियतेला आणि मतदारसंधाच्या अस्मितेला हात घालणारा कोणताही निर्णय त्यांना घेता आला नाही. बाता मात्र कोटीत बाता असायच्या. म्हणजे "बोलायला टकराघू आणि कामाला आगलाघू" अशीच टिका वारंवार त्यांच्यावर झाली. आता, त्यांची भेट झाली कोणाशी.? तर थेट पवारांशी. त्यामुळे, विखेंचा रोल आला कोठे ? एकतर पवार कुटुंबाला पार्थच्या रुपाने पराभवाचा कलंक लागला होता. त्यात रोहित यांनी त्याच पाढ्यांची पुनरावृत्ती केली असती. तर, पवार कुटुंबाची प्रतिष्ठा लिलावात निघाली असती. त्यामुळे, तेथे साम, दाम, दंड, भेद सगळे पणाला लावून द्वंद्व सुरु होते. शिंदेंच्या संदर्भात दु:ख असे. की, पुर्वी कर्जत-जामखेड राखीव असताना तेथे शिर्डीचे विद्यमान खा. लोखंडे हे तेथे १५ वर्षे आमदार होते. त्यामुळे, खरे साटेलोटे त्यांच्यासोबत होते. लोंखंडे यांनी तेथे डॉ. सुजय विखेंनी फुल सपोर्ट करायचा आणि शिर्डीत विखे त्यांना फुल सपोर्ट करणार.! अर्थात त्यांनी शब्द पाळला आणि लोखंडे निवडून देखील आले. यात राम शिंदेंचा रोल आला कोठे ? त्यांनी डॉ. सुजय विखेंना मदत केली म्हणजे ते भाजप पक्षाचे उमेदवार होते. तर, हे जबाबदार मंत्री.! त्यामुळे, जे केले त्याला उपकार तर म्हणता येणार नाही ना ? मग त्यांच्या पराभवाला जनतेने हातात घेतले होते. तर, त्याचे खापर विखेंच्या माथी का फोडले जावे ? याचे देखील चिंतन होणे आवश्यक आहे.
बालहट्ट पुरुन उरला.! |
मी फार उदा. देत बसणार नाही.! पण, विखे म्हणून यांनी निवडणुका लढविल्या का ? बच्चु कडू सारखा व्यक्ती अपक्ष निवडून येतो. गणपतराव देशमुख यांच्यासारखे व्यक्तीमत्व उभी हयात विरोधी बाकावर बसून ११ वेळा आमदार होतात. मग हे उमेदवार विखे पाटील येतील आणि मग आमचा विजय होईल.! अशीच धारणा घेऊन बसले होते की काय.¿ हाच मोठा प्रश्न पडतो आहे. म्हणजे स्वबळाची खात्री नाही. २०१४ ला मोदी लाट आणि २०१९ ला विखे लाट आम्हाला तारुन जाईल.! या संभ्रमात या सर्वांना पराभवाला सामोरे जावे लागले. असेच म्हणावे लागेल. या सगळ्यांत जनतेला एक गोष्ट कळत नाही. की, विखे पाटील भाजपत नसताना. यांची फार हवा होती. जनाधार होता. आमदार खासदार होते. मग, महानगरपालिका निवडणुकीत तर ४० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल. असा गौगवा राज्यभर पिटला. घडले काय ? अवघ्या १४ जागा पदरात पडल्या. नशिब अपघाती राष्ट्रवादीने साथ दिली. म्हणून भाजपचा महापौर करु शकले. नाहीतर, औषधाला भाजपं उरली नसती. त्यामुळे, ही जी काही पडझड झाली. ती केवळ विखेंमुळे झाली. असे कोणाला वाटत असेल. तर, तो निव्वळ "बिनबुडाचा आरोप" ठरेल.
शेवटी त्यांनी निवडूनच आणले.! |
भाजपने बरोबर टोपी घातली .! |
काही झाले. तरी, विखेंची चौकशी करा. कारवाई करा. हा हट्ट कोणी सोडायला तयार नाही. पण, या पराभुत उमेदवारांचे दुर्दैव असे. की, आता होऊन होईन काय कारवाई होईल ? सत्ता नाही, पदे नाहीत, विजय नाही मग कारवाई काय करायची ? सत्ता असती तर ठिक होते. पण, आता उलट पडत्या काळात हातात हात देऊन भाजपलाच ताठ मानेने उभे ठेवण्याचे काम या निष्ठावंतांनी करणे आवश्यक आहे. उद्या येऊ घातलेल्या झेडपी निवडनुकीत कमळ कसे फुलेल. यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. असे झाले नाही. तर, येणाऱ्या काळात भाजप अधिक विक होत जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होत जाईल. त्यामुळे, झाले गेेेले, विसरुन जावे. पुढे पुढे चालावे. असे म्हणत हात मिळविला. तर, या पराभूत उमेदवारांचे भवितव्य आहे. अन्यथा राष्ट्रवादीच्या तालमीत नवे पैलवान धडत आहेत. ते कसे आणि कधी चितपट करतील कळणार नाही.! म्हणून सर्वांना आत्ताच शहाणपण आले तर बरं.! नाहीतर विखे पाटील पुढे जातील आणि हे हातावर हात धरुन बसून राहतील.! दरम्यान काँग्रेसचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे दोन वर्षापुर्वीच भाजपत जाणार होते. असा धक्कादायक खुलासा विखे पाटील यांनी केला आहे. तर हा आरोप खोडत थोरात यांनी दिल्या घरी सुखी रहा.! असा टोला त्यांना लगावला. त्यामुळे, शेजारधर्माचा हा कलगितुरा सुरु झाल्याचे पहायला मिळाला असून. त्या निमित्ताने या कारवाई प्रकरणाकडे दुर्लक्ष होऊन गेले. हे महत्वाचे.
- सागर शिंदे
=============
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" १२५ दिवसात २४५ लेखांचे १४ लाख ८५ हजार वाचक)