जिकडे "रिपाई" तिकडे "सत्ता" हेच "इतिहास" सांगतो.! विजय वाकचौरे यांची विशेष मुलाखत..!

                 

          विजय वाकचौरे

        (रिपाई राज्यसचिव)

अकोले (प्रतिनिधी) :-
                  जर सत्ता हवी असे तर सामाजिक संघटन आणि आर्थिक पाठबळ हवे असते. त्यामुळे एका जातीने नव्हे तर बहुजन समाजाने  एकत्र येऊन स्वबळावर निवडणुका लढविल्या पाहिजे. असा अजेंडा तयार करुन २० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. मात्र, त्याला हवे तसे "सर्वव्यापी" रुप आले नाही. माझा समाज एका छताखाली आला पाहिजे. असे त्यांना मनस्वी वाटत होते. येथे एक गोष्ट प्रकर्षाने नमुद  करावीशी वाटते. की, डॉ. बाबासाहेब माझा समाज म्हणजे निव्वळ महार, मातंग, बौद्ध असे नाही. तर साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, वानी, मारवाडी, कोष्टी, मराठा असा सगळा १८ पगड जातींचा समुदाय त्यांना छताखाली आणायचा होता. म्हणून, त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून "रिपब्लिकन" पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. जेथे सगळा बहुजन वर्ग एक होऊ शकेल. तेथेच समाजाची उन्नती आहे. पण, ९ कोटी जनतेचे दुर्दैव असे की, ६ डिसेंबर १९५६ साली त्यांना काळाने घात केला. आणि बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली.
       

डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न अपुर्ण राहिले. ते पुर्ण करण्यासाठी लाखो अनुयायी एक झाले. ३ आॅक्टोबर १९५७ साली एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. याच दादासाहेब रुपवते, पी. टी. बोराळे, यशवंतराव आंबेडकर, एन. जी. पवार, दत्ता कट्टी असे लोक उपस्थित होते. या दिवशी रिपाईची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या पक्षावर नेहमी दडपशाही केली. दरम्यानच्या काळात राज्यात दलितांचे अत्याचार वाढू लागले. उच्चवर्णीयांची जातीयवादी प्रगल्भता वाढत गेली आणि त्याला शह देण्यासाठी जन्म झाला. तो दलित पँथरचा.

नामदेव ढसाळ, हरपलेला पँथर

        तो दिवस ९ जुलै १९७२ चा होता. आज जगाला हेवा वाटावा असे शेकडो पँथर जयभीमचा नारा देत पुढे आले. या अत्याचारावर वार करायला वाघाचे काळीज घेऊन उतरायचे. असा निर्धार झाला आणि त्यावेळी, नामदेव ढसाळ, राजा ढाले, अरुण कांबळे, रामदास आठवले, अविनाश महातेकर, प्रितमकमार शेगावकर, दयानंद म्हस्के, गांगाधर गाडे, भाई संगारे अशा  अनेकांनी मुठी आवळल्या. याच दिवशी अन्यायावर वार करायला हे भिमाचे अनुयायी विचारांच्या धारधार तलवारी घेऊन रस्त्यावर उतरले. साम, दाम, दंड, भेद सगळ्यांचा अवलंब करीत भीमाच्या वाघांनी जातीयवाद्यांवर दहशत निर्माण केली होती. मात्र, प्रस्तापित राजकारण्यांनी हे वाघ एका पिंजऱ्यात राहु दिले नाही. अखेर दुसऱ्या वर्षात म्हणजे १९७४ साली नामदेव ढासाळ यांनी नागपुरला एक अदिवेशन घेत संघटनेतून बाहेर पडले. त्या पाठोपाठ पँथरला उतरती कळा लागली. आणि अविनाश महातेकर, भाई संगारे बाहेर पडले. त्यांनी देखील स्वत:ची संघटना उभी केली. त्या पाठोपाठ अवघ्या दोन वर्षाच्या काळात राजा ढाले यांनी देखील दलित पँथर बरखास्त करून "मासमुव्हमेंट" नावाची संघटना काढली. पँथर बरखास्त केल्याचा राग आल्याने अरुण कांबळे, रामदास आठवलेे, दयानंद म्हस्के, जे.वी. पवार, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगावकर अशा अनेकांनी ढाले यांच्या निर्णयाचा विरोध करून २८ एप्रिल १९७७ ला नव्याने दलित पँथरची निर्मिती केली.

"रिपाईचा बॉस"

              या दरम्यान मी १९७५ साली उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेलो होतो. राहण्याची सोय होईना म्हणून सिद्धार्थ होस्टेलचा शोध लागला आणि तेथून खऱ्या अर्थाने माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवणाला सुरूवात झाली. जेथे चळवळीचा उगम होतो. तेथेच माझ्या आयुष्याचा प्रवाह जाऊन मिळाला होता. डॉ. बाबासाहेबाच्या विचारांनी प्रेरीत होऊन रामदास आठवले हे आमचे केंद्रबिंदू होते. तर चळवळीच्या परिघावर आमची भ्रमण सुरू झाले होते. आठवले साहेबांचा आमच्यावर इतका प्रभाव पडत गेला की, शिक्षणापेक्षा समाजसेवा ही प्रचंड समाधान देऊ पाहत होती. या सिद्धार्थ वस्तीग्रुहात राज्यातील प्रत्येक भागातून अनुसुचित जातीपक जमातीचे लोक एकत्र येत होते. त्यामुळे महाराष्ट्राचे नेटवर्क बांधण्यात आठवले साहेबांना फारसा वेळ लागला नाही.
               
याच काळात मराठवाड्यात नामांतरणाची चळवळ उभी राहिली होती. रस्तारोको, मोर्चे, आंदोलने, जाळपोळ अशा दंगली उसाळल्या होत्या. तेव्हा मी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. पोलीसांनी बळाचा वापर करून, अनेक कुटुंब व समाज्यावर लाठ्या-काठ्या उचलल्या होत्या. म्हणून आम्ही राज्यातून व विशेषत: मुंबईतून अन्न धान्य गोळा करुन मराठवाड्यात नेले होते. १९७७ च्या दरम्यान विद्यार्थी जागरुती परिषदेची स्थापना करण्यात आली होती. त्याचे जनरल सेक्रेटरी पद माझ्यावर सोपविण्यात आले होेते. तेव्हा भारतीय दलित पँथर चे दलित पँथरमध्ये रुपांतरण सुरू होते. त्यात मी देखील सक्रिय होतो.श्री. मेश्राम हे त्याचे अध्यक्ष होते. त्याकाळी भारतीय विद्यार्थी संसद ते दलित पँथर असे काम जोमात सुरू होते. बघता-बघता सगळ्या चळवळीतील तरुणांचे संघटन उभे राहिले. ज्याने-त्याने आपापल्या जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविण्याची भुमिका घेतली आणि मी देखील गावाकडे आलो...!!
                आज जी नगर जिल्ह्यातील दलित अत्याचाराची परिस्थिती आहे. त्यापेक्षा भयानक दाहकता त्याकाळी होती. मागासवर्गीय समाजास राजकीय पटलावर फारसे महत्व नव्हते. तरी बाळासाहेब चव्हाण, श्रावण वाघमारे, विजयकांत चाबुकस्वार या नेत्यांनी चळवळीची प्रभावी खंड लावून धरली होती. त्या काळात चव्हाण हे झेडपी सदस्य होते. मी आठवले साहेबांच्या नेत्रुत्वाखाली गाव तेथे रिपाई, अशा शाखा सुरू केल्या. राज्यात आणि केंद्रात तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत रिपाईचा सहभाग होता. त्यामुळे तोच सत्तेतील सहभाग गावातील सोसायटी पासून तर ग्रामपंचायत व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असावा. हा माझा पहिला अग्रह होता. या सत्तासहभागाची मुळे जिल्ह्यात रिपाईच्या माध्यमातून खोलवर रोवली गेली. चंद्रकांत कर्डक, श्रावण वाघमारे, दिपक गायकवाड, सुधाकर रोहम, माणिकराव यादव, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत सरोदे, रमेश शिरकांडे, आत्माराम जगताप, अनिल शेजवळ, संगिता निकाळे, सुरेंद्र थोरात, सुनिता थोरात, अजय साळवे, जेव्हीयर भिंगारदिवे, सुनिल काळे, संभाजी भिंगारदिवे, अशोकराव गायकवाड, प्रभाकर रुपवते, भाऊसाहेब पगारे, रविंद्र कांबळे, रमेश बडेकर यांच्यासह शेकडाभर लोकांनी रिपाईच्या कोठ्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांवर वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या  पदांवर प्रतिनिधीत्व केले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, ना. राधाक्रुष्ण विखे पाटील व मारुतीराव घुले यांनी चळवळीसाठी नेहमी झुकते माप दिले. आज परिस्थिती वेगळी असली तरी, एकेकाळी रिपाईचा सर्वात मोठा दबदबा येथे तयार झालेला होता. तेव्हा भलेही सत्ता स्थापन करण्यासाठी आमची पावर नसेलही. पण, सत्ता कोणी स्थापन करावी. हा सर्वेसर्वा निर्णय रिपाईचा राहिला आहे. कारण, येथील बहुजनांचे संघटन हे निर्णायक रिपाईच्या माध्यामातून पुढे येत होते. त्यामुळे ग्रुहीत धरणे सोडा. पण, रिपाईच्या हजेरीशिवाय बैठका होत नव्हत्या. हे ही तितकेच खरे आहे.
क्रमश: भाग १

 (शब्दांकन)

- सागर शिंदे 

हा लेखाबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहे. त्या विजयराव वाकचौरे साहेब यांच्याशी शेअर करा. मो. नं. ९५७९१५२८०२

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७६ दिवसात १३४ लेखांचे ७ लाख ५० हजार वाचक)