|
"गटारीत गेला माणूस" |
संगमनेर (प्रतिनिधी) :- मुंबई पाण्याखाली गेली तर स्थानिक प्रशासन म्हणून महापाैर व सरकारला जबाबदार धरले. मग संगमनेर पाण्याखाली गेले त्याला जबाबदार कोण ? अर्थातच नगरपरिषद. आज दोन दिवस झाले पावसाने दोन तासात संगमनेर व अकोलेकरांची दानाफान उडविली आहे. तर हाच पाऊस एक दिवस लगातार चालला तर संगमनेर शहरातून मानसे वाहुन जातील. अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक तासात कोट्यावधी रुपयांचे बांधलेल्या बस स्थानकाहुन नद्या वाहु लागल्या तर सामान्य प्रवाशी गटारातून वाहुन जाताना नागरिकांनी धरला. हाच संगमनेरचा विकास म्हणायचा की, आमरनाथ, युपी, एमपी किंवा हिमालयात येणारा प्रलय म्हणायचा. ? या तासभर झालेल्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन नगरपरिषदेला करता येत नाही तर हा "विकास" की "भकास" म्हणायचा ? असा सर्वसाधारण प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शुक्रवार दि.19 व 20 या दोन दिवशी नगर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला. पण स्थानिक प्रशासनाने त्याचे चांगले व्यवस्थापन केले. मात्र, संगमनेर सारख्या विकसित गणल्याजाणाऱ्या शहरात तासभराचा पाऊस नागरिकांना प्रलयासारखा असल्याचा अनुभव आला. चक्क ज्या बस स्थानकाचे राज्यात कौतुक होते, त्याच्या कडेला दुथडी भरून उघड्या गटारी वाहत होत्या. मैला, कचरा इतकेच काय तर प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मानसेही वाहुन जाण्याचा प्रयत्न झाल्याचे पहावयास मिळाले. नशिब बलोत्तर काही नागरिकांनी त्या व्यक्तीस बाहेर काढले नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. अर्थात एसी गाडीत फिरणाऱ्यांना कोणी मेलं गेलं फरक काय पडतोय, अकस्मात दाखल होऊन हे प्रस्तापित तेथे फोटोसेशन करतील. उंदराचा जीव जातो अन् मांजराचा खेळ होतो. अशीच काहीशी गंमत.
|
कोट्यावधींच्या स्टॅण्ड समोरील जीवघेणी गटार |
काल शहरातील रंगारगल्लीतून अगदी पाटासारखं पाणी वाहत होतं. त्याच्या खालीच एक शाळा आहे. छोटी-छोटी मुले त्या पाण्यातून शाळेचा प्रवास करतात. जर या ओघवत्या पाण्यात एखादे मुल वाहुन गेले तर याला जबाबदार कोण ? आजकाल महाराष्ट्रात धरणं फुटली तर त्यांचे खापर खेकडांच्या माथी मारले जाते, साधी एनसी नोंदविली जात नाही. मग अशा पाण्याखाली वाहुन जाणाऱ्या व्यक्तींच्या घटनेस दोषी कोण ? त्यामुळे स्थानिक नेते व समाजसेवकांनी एखादा अपघात घडण्यापुर्वीच यावर आवाज उठविला पाहिजे. कारण, जातो तो गरिबाचा आणि भांडवल होतं ते श्रीमंतांचे. म्हणून यावर योग्य पर्याय निघाला पाहिजे. कालच्या पावसाने चक्क नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये पाणी शिरले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गाळ्यांमध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याला जबाबदार कोण ? पाण्याचा हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. नाहीतर नागरिकांची अशीच हाल होणार असेल तर सद्या बदलाचे वारे वाहत आहे. त्याचा फायदा संगमनेरकर नक्की घेतील, यात शंका नाही.
|
"विकासपुरुष" |
काल बस स्थानकावर झालेला प्रकार सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. बस स्थानकावर जो व्यक्ती पडला त्याच्या व्यथा ऐकण्यासारख्या होत्या. कोट्यावधी रुपये खर्च करून गाळ्यांमध्ये मोठा "गाळा" झाल्याच्या चर्चा रंगल्या. प्रस्तापितांनी "कोट्यावधींचा मलिदा" जमा करून "अर्थ"पुर्ण व्यावहार केले गेले. इतकी लुटमार करूनही नागरिकांना योग्य सेवा सुविधा पुरविण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. येणाऱ्या काळात या सर्व प्रकरणावर प्रकाश पाडला जाईल. मात्र, तुर्तास संगमनेर पाण्याखाली गेले त्याचे काय ?, त्याला जबाबदार कोण ? यावर उपाय काय ? "तुपाशी" असणाऱ्यांनी जनतेला "उपाशी" ठेवले, यावर विचारमंथन काय ? अशी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. दुषित पाणी, कत्तलखाने, रक्तमिश्रीत पाणी, शहरात शासकीय रुग्णालये, उघड्या गटारी, दुकानांमध्ये घुसलेले पाणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, रस्ते, आरोग्य, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या नेहमीच ऐरणीवर राहिल्या आहेत. त्यावर उत्तर अद्याप सापडले नाही. म्हणून जनतेने जागरूक झाले पाहिजे. शहरात कोणाचीही असो पण ती "मक्तेदारी" संपली पाहिजे व सामान्य व्यक्तींनाही नेत्रुत्वाची संधी मिळाली पाहिजे. तसेच सामान्य मानसांच्या किमान मुलभूत गरजा तरी सुटल्या पाहिजे. कारण, बंगल्यात बसून रस्त्यावरचे प्रश्न लक्षात येत नाहीत व सुटतही नाही. असाच सुर जनतेतून येत आहे.
----------------------------------
सुशांत पावसे
एस. एस. शिंदे