भंडारदरा ते वल्डकप; इंग्रज की जय हो !


       काल न्युझीलंड आणि इंग्लंड यांच्यात विश्वकपचा अंतीम सामना झाला. भारताचा संघ या स्पर्धेतून सेमी फायनलला बाद झाल्यामुळे सपोर्ट कोणाला करायचा असा प्रश्न समोर होता. ज्या इंग्रजांनी भारतावर दिडशे वर्षे राज्य केले, त्यांचा पुन्हा जयघोष मनाला पचनी पडत नव्हता. म्हणून, शांत, संयमी खेळी करणाऱ्या न्युझीलंडला सपोर्ट करायचा असे ठरले. पण, का कुणास ठाऊक. गर्दीतून एक आवाज आला. ज्या इंग्रजांनी १०८ वर्षे कधी न फुटणारं, कोणत्याही खेकडाला पोखरणं अशक्य आहे असे धरण बांधून दिले. ज्यावर आख्खा उत्तर नगर जिल्हा आणि अकोले तालुक्यातील प्रत्येक शेतकरी आत्महत्या करण्यावाचून अलिप्त राहिला. अशा इंग्लंडला  आपण साथ का देऊ नये ? "इंग्लंड आय एम वीत यू" न्युझीलंडने आपल्याला काय दिले ? या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या ! जय हो इंग्लंड....!!!
        खरंतर क्रिकेट हा भारतीय खेळ नाही. पण इंग्रजांनी तो इथे रुजविला. दुर्दैवाने भारतीय लोक हाॅकी कमी आणि क्रिकेटला अवाजवी महत्व देतात.  २०११ मध्ये धोनीच्या टिमने विश्वकप भारतात आणला. पण यावर्षी कोहली अपयशी ठरला. अर्थात या स्पर्धेत भारत असता तर श्वास गुद्मरस्तोवर तिरंग्याला सपोर्ट केला असता. पण ते भाग्य आपल्या नशिबी पडले नाही. म्हणून न्युझीलंड व इंग्लंड यांच्या सामन्यात भारतीय चाहते कोणाचे ?  हा मोठा प्रश्न होता. खरंतर इंग्रज भारतात व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले. त्यांना हुसकावून लावताना अनेकांनी प्राणाची आहुती दिली तर कोणी तुरुंग भोगले. हे कोणीच विसरू शकणार नाही. राज्य करताना त्यांच्याकडून नकळत विकासही झाला. रेल्वे, इमारती, रस्ते ही त्यांचीच देण आहे. अणखी एक सांगायचे झाले तर, डाॅ.  बाबासाहेब सांगतात इंग्रजांच्या काळात मागासवर्गीयांची जास्त उन्नती झाली, तितकी अधोगती या स्वातंत्र्य भारतात जाती व्यवस्थेने केली. म्हणजे अजून काही दिवस "गोरे" भारतात असते तर, मागासवर्गीयांची स्थिती वेगळी असती. तसेही भारताच्या टिममध्ये होतं तरी कोण, कोणत्या मराठमोळ्या किंवा मागासवर्गीय खेळाडूला स्थान देण्यात आले.? विश्वकपमध्ये सर्वाधिक  विकेट घेणाऱ्या महंमद शामीला अचानक आराम देण्यात आला. विनोद कांबळी स्वत: त्यांची जातीयवाद आणि क्रिकेट खेळ अशी कथा सांगताे. त्यामुळे भारत हारला नाही. तर श्रीमंतांची मुले हारली. असे म्हटल्यास काही वावघे नाही. जोवर सिमेवर आपला जवान पहारा देतोय, आणि या देशातला किसान जिवंत आहे, तोवर भारत कधीच हारू शकत नाही. या मतावर मी ठाम आहे.  बीसीसीआय ही एक खाजगी संस्था आहे. हे विसरू नका. क्रिकेटने तुम्हाला अंधळे केले आहे. त्याचा तुम्ही सखोल अभ्यास करा.
      असो..!  आता जगाचं सोडा हो, आपण अकोल्याचा विचार करू. नगर दक्षिण जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागते. पडिक शेती, नापिक जमीन,  पाण्याचा प्रश्न त्यामुळे श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी चोऱ्या, दरोडे, लुटमार असे धंदे तेजीत चालतात. इतकेच काय तर या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. या तुलनेत उत्तर भाग पाहिला तर श्रीरामपूर वगळता गुन्हेगारी मोठी नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथे शेतकरी आत्महत्या करीत नाही. एक बिघाभर का होईना बळीराजा पाेटापुरते कमवितो व स्वाभिमानाने जगतो. राज्य दुष्काळाने होरपळत असताना तालुक्यात टोमॅटोचे पिक जोमात होते. त्यावर शेतकऱ्यांचा खिसा भरला व आनंद द्विगुणीत झाला. शेती पिकली समाधान लाभले. ही पुण्याई प्रवरामाईची आहे. पण, जी प्रवरामाई आपल्या सगळ्यांची काळजी उरात बाळगते त्या काळजारुपी भंडारदारा धरणाला विसरून कसे चालेल ?
       काल तिवरे धरण फुटले ते बांधकाम २० वर्षापुर्वीचे होते. फोडले कोणी तर म्हणे खेकडांनी. पण १०८ वर्षे उलटली तरी भंडारदरा सह्याद्रीसारखा ताठ उभा आहे. येथील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठीशी. म्हणून ज्या इंग्रजांनी आपल्याला धरण बांधून दिले. त्यांचा तुरतास जय हो ! म्हणायला काय हरकत आहे. अन्नदाता सुखी भव हेच आपले ब्रिद आहे ना !.
      भारत वर्सेस इंग्लंड सामना असता तर "गो बॅस सायनम" नारा हा आमचा पहिला  असता यात शंका नाही. पण विश्वकप स्पर्धेत सपोर्ट कोणाला करायचा असा प्रश्न समोर आला तर "इंग्लंड, आय एम वीथ यु" असेच म्हणावे लागेल. हे तरुणांनी मान्य केले आहे. निव्वळ  तरुणांच्या तु तू मै मै मधून विश्वकप ते भंडारदरा या लेखाची निर्मिती झाली आहे.
           दरम्यान एक गोष्ट मानावी लागेल. आजवर विश्वकप सामन्यात कधी नव्हे इतका रोमहर्षक सामना पहावयास मिळाला. चक्क मॅच टाय झाली. इतकेच काय तर सुपर ओव्हर खेळूनही सामना पुन्हा टाय झाला. शेवटी गेंड्यासारख्या झुंजनाऱ्या दोन्ही संघांना वल्डकप शरण आला आणि अखेर नियमांच्या बळाचा वापर करुन इंग्लंडने पहिल्यांदा वल्डकपवर आपले नाव कोरले. आणि खऱ्या अर्थाने कप मायदेशी परतला. मात्र असा सामना पुन्हा  होणे नाही.
------------------
महेश जेजुरकर
एस. एस. शिंदे