सुशिक्षित पँथर हरपला
संगमनेर (प्रतिनिधी) :-
ते १९७० चे दशक होते. अगदी दुष्काळाचेच. चांगल्या बागाईतदारांच्या हाताला काम नव्हते तर मागासवर्गीय लोकांना कोठून काम मिळणार. डॉ. बाबासाहेब १९५६ ला निर्वाण झाल्यानंतर त्यांच्या प्रेरणेने सबंध दलित समाज अगदी पेटून उठला. अन्याय सहन करायचा नाही, कोणाची गुलामी सहन करायची नाही, कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही, मरण आलं तरी बेहत्तर पण शिक्षण सोडायचे नाही, कितीही संकटे येवोत धैर्य सोडायचं नाही, संघटन सोडून रहायचं नाही, संघर्षाशिवाय जगायचं नाही अशा अनेक शिकवणी डॉ. बाबासाहेबांनी दलित करुणांच्या रक्तात उतरविल्या होत्या. त्यातूनच उभा राहिला तो एक "भास्कर सुकाजी घोलप" (रा. वाघापूर, ता. संगमनेर जि. अ. नगर)
घरची परिस्थिती अगदी बेताची होती. पण बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ते प्रत्येकाने प्याले पाहिजे. म्हणून भास्कर हे त्या तेजस्वी सुर्यासारखे नेहमी तळपत राहिले. मजुरी करून का होईना त्यांनी त्याकाळी बीएची पदवी घेतली. आपण शिकलो तसा समाज शिकला पाहिजे या उदात्त हेतूने त्यांनी अनेक तरुणांना मदत करून शिक्षणासाठी सहाय्य केले. दलित पँथरसारख्या संघटनेत खारीचा वाटा उचलून आंदोलने, मोर्चे यांचा अवलंब करून न्यायासाठी रस्त्यावर उतरुन झेंडा हाती घेतला. उभी हयात त्यांनी चळवळीचे विचार पसरविण्यात घातली. त्यांचे शिक्षण ७० साली बीए होते तेव्हा आपल्याला बळच सरकारी नोकरी लागत होती. पण घोलप यांनी सरकारी गुलामी पत्करली नाही. त्यांच्या अंगी खूप कला होत्या त्या माध्यमातून त्यांनी स्वत:ची गुजरान केली. ते इंजिनिअर नव्हते पण, त्या शिक्षणालाही लाजवेल अशी घरांची बांधणी व आराखडा त्यांच्या बुद्धीत होता. ते सुतार नव्हते पण लाकडाला हवा तसा आकार द्यायची कला त्यांच्या हाताला अवगत होती.
चळवळीत त्यानी स्वत:ला व्यतीत करून आपला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यानंतर मुलगा संदिप घोलप व विनोद घोलप यांनी सामजकारणाची धुरा संभाळली. संदिप सर यांनी दोनवेळा खासदारकी लढविली. एक बाैद्ध खासदार झाला पाहिजे, समाज उन्नतीसाठी संसदेत कोणीतरी आवाज उठविला पाहिजे. म्हणून ते नेहमी धडपडत असतात. त्यांच्या प्रामाणिक पणावर व समाजिक तळमळीमुळे त्यांनी स्वत:चा चांगला ठसा उमटविला आहे. त्यात त्यांच्या पत्नीचा त्यांना मोठा मदतीचा हात असतो.
तर विनोद घोलप हे देखील स्थानिक ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. काँग्रेसचे ते पदाधिकारी असून आ. बाळासाहेब थोरात यांच्या विश्वासातले आहेत. खरंतर राजकारण नाही तर फक्त समाजकारण हाच हेतू दोन्ही भावांचा असतो. विशेष म्हणजे ही दोन्ही मुले सुशिक्षित असून स्वत: काम धंदा करून समाजकारण करता. त्यामुळे त्यांचे काैतुक होते.
भास्कर घोलप यांनी अखेरचा श्वास घेतला. पण समाज्याला त्यांनी दोन हिरे अर्पित केले आहे. मंगळवार दि. १६ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम होणार आहे. तरी सबंध मित्र परिवार, नातेवाईक, चळवळीतील नेते कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे अशी विनंती घोलप परिवाराकडून करण्यात आली आहे.