लफडेबाजीतून मित्रांनी केली मित्राची गोळ्या झाडून हत्या.! दोघांना अटक, अकोले तालुक्यातील भयानक घटना.!

सार्वभौम अकोले :- 

 अकोले तालुक्यातील पेढेवाडी शिवारात लफडेबाजीतून दोघांनी आपल्या मित्राचीच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात भोरु सोमा कातोरे (वय ३२, रा. दगडवाडी, ता. अकोले)  याने दोस्तीत गद्दारी केल्याने दोन मित्रांनी मिळुन याला ठार मारले आहे. ही घटना दि. १२ ऑक्टोंबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात धोंडु सोमा पथवे (रा. दगडवाडी, ता. अकोले) व नवनाथ नारायन कुलाळ (रा. पेढेवाडी, ता. अकोले) अशा दोघांना अकोले पोलिसांनी अटक केली आहे. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मयत भोरु कातोरे आणि या घटनेतील आरोपी धोंडु पथवे व नवनाथ कुलाळ हे तिघे चांगले मित्र आहेत. मात्र, यातील मयत व्यक्ती भोरु याने आरोपींच्या जवळच्या नात्यातील मुलीसोबत प्रेम संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार कुटुंबाच्या संपर्कात येणे, घरात येऊन बसणे किंवा कारणानिमित्त जवळीकता साधने अशा अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून भोरुकडून सुरू होत्या. त्याची धारणा अशी होती. की, आपण जे कृत्य करतो आहे. त्याबाबत सर्वजन अनभिज्ञ आहेत. मात्र, त्याच्या हलचालींवर आरोपींची बारीक नजर होती.

दरम्यान, मयत भोरु कातोरे याच्या गद्दारीबाबत आरोपी धोंडु पथवे व नवनाथ कुलाळ यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी भोरुला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, माझे कोणासोबत प्रेम संबंध नाही, कोठेही आणि कोणाशी गद्दारी केली नाही असे म्हणाला. तरी देखील एक मित्र म्हणून भोरुला समज देण्यात आली होती. मात्र, त्याच्या वागण्यात कोणताही बदल झालेला लक्षात आला नाही. गावात लफडेबाजीची चर्चा ऐकू येण्यास सुरुवात झाल्यामुळे आरोपींच्या मनावरचा ताबा सुटत चालला होता. त्यामुळे काहीही झाले तरी भोरुचा काटा काढायचा असा त्यांनी कट रचला. 

दरम्यान, भोरुला कोणत्याही प्रकारची चुनूक न लागता आरोपी दोघांनी गाडी काढली आणि भोरुला देखील एका ठिकाणी गाडीवर येण्यास सांगितले.  या तिघांनी मिळुन एका ठिकाणी मद्य प्राशण केले. त्यानंतर पेढेवाडी शिवारात घनदाट जंगलात भोरु याला घेऊन गेले. त्याला त्याच्या चुकीची जाणीव करुन दिली आणि या दोघांनी त्याला मारहाण करीत त्याच्यावर गावठी पद्धतीच्या बंदुकीने बरगडीच्या खाली गोळ्या झाडून त्याची हत्या केली. आता ही घटना कोणाला कळता कामा नये म्हणून या दोघांनी भोरूचे प्रेत जंगलात नेवून टाकले. त्याच्यावर पाला पाचोळा पसरुन दिली. मात्र, भोरुची गाडी आहे त्याच ठिकाणी बेवारस पडून राहिली. या दोघांनी आपल्या मित्राला ठार मारल्यानंतर ते तेथून पसार झाले.

दरम्यान, दोन दिवस झाले तरी भोरु घरी आला नाही. त्यामुळे, त्याचा भाऊ मनाजी सोमा कातोरे (रा. दगडवाडी, ता. अकोले) यांनी अकोले पोलिसांना भोरु गायब असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मिसिंग दाखल करुन घेतली. या मिसिंगचा तपास करताना अकोले पोलिसांना काही संशयीत गोष्टी हाती लागल्या होत्या. त्यानुसार त्यांनी तपास केला असता त्यांना पहिल्यांदा गाडी मिळून आली, त्यानंतर भोरु गायब झाला त्याच दिवशी काही व्यक्तींनी आरोपी धोंडु पथवे व नवनाथ कुलाळ याच्यासोबत भोरु कातोरे याला पाहिले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला असता ती दोघे घरी मिळुन आली नाही. त्यामुळे, पोलिसांचा संशय अधिक बळावला. तसेच मयत भोरु याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही हत्या असल्याचे निश्‍चित झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली आहे. त्याच्याकडून कसून चौकशी सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक  संदिप कोळी करीत आहेत.