मामाच्या मुलीला पहायला गेला अन भलतीलाच पळुन घेऊन गेला, ती गरोदर राहिली पण हा म्हणतो तो पराक्रम माझा नाही.! ठोकल्या बेड्या.!

 

सार्वभौम (घारगाव) :- 

                      बोटा येथे पीडितेच्या मामाच्या मुलीला पाहण्यासाठी मुलगा आला. तिच्याकडे मोबाईल नंबर नाही म्हणुन 16 वर्षीय नात्यातील मुलीचा नंबर दिला. मात्र, जिला पाहण्यासाठी आला तीला सोडुन जीचा नंबर मिळाला तिथे टाका जुळला. मग काय.! हाय, हॅलो बोलणे सुरू झाले. या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची साद घालुन तिच्यावर वेळोवेळी संभोग केला. यातुन ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि सर्व बिंग फुटले. जेव्हा ती गर्भवती असल्याचे तरुणाला सांगितले. तेव्हा तुझा आणि माझा काही संबंध नाही. हे माझं आहे याचा काही पुरावा आहे का. असे बोलुन तो अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. पिडीत मुलीने सर्व हकीगत आपल्या आई वडीलांना सांगितली असता त्यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांपुढे कथन केला. यावरून प्रवीण सावळेराम जाधव (रा.आंबेगव्हान, ता.जुन्नर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो सारखे गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे. 

             खरंतर, संगमनेर तालुक्यात महिला दिनी इव्हेंट करणारे अनेक महिला नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मात्र, शालेय अल्पवयीन मुली गर्भवती राहतात, वारंवार बलात्कारासारखे प्रकार घडताय मात्र यावर पुढे येऊन बोलायला कोणी ही तयार होत नसल्याचे दिसते. त्यामुळे, येथे महिला आयोगाची सदस्या देखील आहे ते पद निव्वळ मिरवायला नसुन त्या पिडीत मुलींना न्याय देण्यासाठी असते. ग्रामीण भागातील शाळा वाडी-वस्ती शहरातील कॉलेज येथे जाऊन जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. पण, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. राज्यातील घटनेचे येथे पडसाद उमटतात पण, आपल्या तालुक्यात दिवसागणिक बलात्कार होतात याकडे कोणाचे लक्ष नाही का? असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे बोटा येथे इयत्ता 9 वी पर्यंत शिक्षण झाले. आई वडील मजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. पिडीत मुलीच्या चुलत मामाकडे मुलीला पाहण्यासाठी आरोपी प्रवीण जाधव व त्याचे नातेवाईक बोटा परिसरात आले होते. मामाच्या मुलीने प्रवीणशी बोलण्यासाठी पिडीत मुलीचा नंबर दिला होता. त्यानंतर पिडीत मुलीच्या फोनवर प्रवीणचा फोन येऊ लागला. त्यांचे बोलणे सुरू झाले. प्रवीण कधीही फोन करत असल्याने पिडीत मुलीने फोन करत जाऊ नको असे सांगितले. मात्र, तरी देखील आरोपी प्रवीण फोन करत असल्याने मामाच्या मुलीला सोडुन पिडीत मुलीशी जवळीकता वाढली. आरोपी प्रवीण हा जुन्नर तालुक्यातुन पिडीत मुलीला भेटण्यासाठी बोटा येथे येऊ लागला. तेथे पिडीत मुलीला घरी नेऊन लग्नाचे अमिश दाखवुन जबरदस्तीने संभोग करीत होता. दि. 9 जुन 2023 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास  आरोपी प्रवीण जाधव याने पिडीत मुलीला फोन केला व म्हणाला की, मी घरा बाहेर आलो आहे. तु घराबाहेर लवकर ये. मला तुझ्याशी बोलायचे आहे. पिडीत मुलगी घरा बाहेर आली व आरोपी प्रवीणला भेटली. तेव्हा आरोपी प्रवीण म्हणाला की, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तु माझ्या सोबत चाल. त्यावेळेस पिडीत मुलगी म्हणाली की, माझे वय पूर्ण नाही मी तुझ्या सोबत येणार नाही. असे म्हणताच आरोपी प्रवीण म्हणाला की, तु जर माझ्या सोबत आली नाही तर मी तुला ही जगु देणार नाही आणि मी पण जगणार नाही. असे बोलुन त्याने पिडीत मुलीला ब्राम्हणवाडा मार्ग आंबेगव्हान   जुन्नर तालुक्यात नेले.

             दरम्यान, आंबेगव्हाण येथे नेवून आरोपी प्रवीण याने राहत्या घरात पिडीत मुलीशी वारंवार संभोग केला. दि. 4 जुलै 2023 रोजी पिडीत मुलीचे आई वडील हे मुलीला शोधत आंबेगव्हान येथे आले. तेथे येताच आरोपी प्रवीण म्हणाला की, मला पिडीत मुलीशी लग्न करायचे आहे. तुम्ही येथुन निघुन जा. असे म्हणुन तो पिडीत मुलीच्या आई वडीलांवर धाऊन गेला. पिडीत मुलगी आई वडीलांबरोबर बोटा येथे आली. मात्र, पिडीत मुलीला आरोपी प्रवीण पासुन दिवस गेले. पिडीत अल्पवयीन मुलगी जेव्हा आरोपी प्रवीणला सांगण्यासाठी गेली तेव्हा आरोपी प्रवीण म्हणाला की, तुझा माझा काय संबंध. मी जे काय केले याचा तुझ्याकडे काय पुरावा. असे बोलुन जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. त्यांनी नातेवाईक बोलावून थेट पोलीस ठाणे गाठले व पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण सावळेराम जाधव (रा.आंबेगव्हान, ता. जुन्नर) याच्यावर बलात्कारासह पोक्सो गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.