प्रेयसीने प्रियकराचा गळा दाबून मारले, तिच्यासह तिघे अटक.! भेटायला गेला तो मेला व हे तिघे जेेलात.!

    

सार्वभौम (अकोले) :-

      प्रेयसिला भेटायला गेलेल्या प्रियकराला रंगेहाथ पकडल्यामुळे तिघांनी मिळुन त्याचा गळा आवळून ठार केले. या घटनेची उकल होऊ नये म्हणून त्यास अंधार्‍या रात्री घराच्या काही अंतरावर शेतात बांधाच्या खाली फेकून दिले. मात्र, कालांतराने हा मृतदेह एका व्यक्तीने पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय अहवालात समोर आले. की, आत्महत्या किंवा अपघात नसून ही हत्या आहे. त्यानंतर अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन घेतला आणि याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ही घटना अकोले तालुक्यातील मुठेवाडी येथे ०३ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली असून त्याची उकल तब्बल ७ दिवसांनी म्हणजे १० जुलै २०२३ रोजी झाली आहे. उमेश मुठे (रा. सातेवाडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, अकोले तालुक्यातील सातेवाडी, मुठेवाडी परिसरात उमेश मुठे हा तरुण रहात होता. त्याचे सुनिता सोबत प्रेम संबंध होते. ती दोघे एकमेकांना भेटत होते, त्यांच्यात चर्चा होती, सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्यात संपर्क होत होता. मात्र याबाबत कोणाला काही कल्पना नव्हती. गेल्या महिन्यात त्यांच्यात काहीतरी चालु असल्याची कुणकुण सुनिता हिच्या नातेवाईकांना लागली होती. त्यामुळे, दोन कुटुंबात प्रचंड तणावाचे वातावण निर्माण झाले होते. एकदा का होईना उमेश कचाट्यात सापडला पाहिजे, त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही अशी कठोर भुमिका नातेवाईकांची होती. दुर्दैवाने तो काळ फार काही दुर नव्हता.

  सोमवार दि. ०३ जुलै २०२३ रोजी रात्री उमेठ मुठे हा सुनिता हिला भेटण्यासाठी आला होता. मात्र, तो दिवस हा त्याचा अंतीम असेल असे त्याला वाटले नव्हते. त्याने आपली प्रेयसी सुनिता हिच्या घरात प्रवेश केला. या दरम्यान आरोपी सुनिता युवराज दिघे, वाळीबा पांडुरंग दिघे (दोघे रा. सातेवाडी, ता. अकोले) व संपत बारकु मुठे (रा. मुठेवाडी) या तिघांनी त्याच्यावर झडप मारली. काही समजण्याच्या आत त्याचा गळा आवळला आणि तिघांनी मिळुन उमेशला कायमचे संपविण्याचा चंग बांधला. तिघांच्या ताकदीपुढे उमेश हतबल झाला आणि त्याने प्राण सोडले. तो मरण पावला आहे का? याची दोघांनी खात्री केली आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने तिघांना घाम फुटला. कारण, त्यांनी दुष्मण मारला खरा.! पण, त्याची विल्हेवाट लावायची कशी? हा फार मोठा प्रश्‍न त्यांच्या समोर होता.

दरम्यान, या तिघांनी रात्र अधिक गडद होऊ दिली. संपुर्ण सातेवाडी सुम झोपेत असताना त्यांनी उमेश मुठे याचा मृतदेह घरातून बाहेर काढला. एकीकडे कोणी येत तर नाही ना? कोेणी आपल्याला पहात तर नाही ना? या भितीने प्रचंड भेदरलेल्या आवस्थेत तिघांनी मृतदेह घरापासून काही अंतरावर असणार्‍या मोठ्या बांधावर नेला आणि तेथून खाली ढकलुन दिला. या दरम्यान तिघांना कोणी पाहिले नव्हते. त्यामुळे आपण केलेला गुन्हा हा दबला जाईल असे त्यांना वाटत होते. गेल्या काही तास तिघे जितके घाबरलेले होते. तितकेच ते संयमाने अजुबाजुस काय घडते आहे हे देखील पहात होते. पण, कानून के हाथ लंबे होते हैं.! याची त्यांना कल्पना नव्हती. संबंधित मृतदेहाबाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि त्याची एक आमस्मात मृत्यु म्हणून नोंद झाली.

दरम्यान, पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांना या घटनेबाबत शंका होती. त्यामुळे, कायदेशिर त्यांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि काही अन्य वैद्यकीय चाचण्या देखील केल्या. त्यानंतर लक्षात आले. की, ही आत्महत्या किंवा अपघात नाही, तर ही नियोजनपुर्वक केलेली हत्या आहे. त्यानंतर पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयीत आरोपींच्या भोवती तपास सुरू झाला. सावित्राबाई कुशाबा मुठे (रा. मुठेवाडी, ता. अकोले) यांच्या फिर्यादीहुन अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपी सुनिता युवराज दिघे, वाळीबा पांडुरंग दिघे (दोघे रा. सातेवाडी, ता. अकोले) व संपत बारकु मुठे (रा. मुठेवाडी) या तिघांनी प्रेम संबंधाच्या कारणाहुन उमेश मुठे याचा खून केल्याचे निच्छित झाले. या गुन्ह्याच्या तपासामुळे अकोले पोलिसांचे कौतुक होत आहे.