लोखंडेंच्या व्यासपिठाहून दोन नेते गायब.! आमदारास एकाची तर विखेंची दुसर्यास ऍलर्जी.! आजी माजी आमदारांच्या घोषणांची जुगलबंदी.!
सार्वभौम (अकोले) :-
दि. १७ जून २०२२ रोजी नितीन गडकरी साहेब अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीसाठी अकोल्यात आले होते. सोबत महसुमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सोबत होते. कारखाना पिचड साहेबांच्या ताब्यात द्या, असे म्हणून गेले आणि झाले काय? २२-० असा पराभव पदरी पडला. त्यामुळे, भुसे आले काय आणि पुन्हा विखे आले काय.! ज्यांचे तालुक्यासाठी काहीच योगदान नाही. त्यांनी तालुक्यात कितीही बैठका आणि सभा घेऊद्या त्याचा परिणाम शुन्य होतो असे अकोल्याचा इतिहास सांगतो. अशात आमदार लहामटे यांनी लोखंडे यांना तंबी दिली होती. मी ज्या व्यासपिठावर असेल तेथे कोणाची बाजीरावकी चालणार नाही. त्यामुळे, आमदारांच्या दृष्टीकोणातून स्टेज दहशतमुक्त दिसले. तर, आठवले यांचे तिकीट कापण्यात राधाकृष्ण विखे यांनी महत्वाची भुमिका बजावली असे वाकचौरे यांचे मत आहे. त्यामुळे, विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे यांच्यासह रिपाईचा एक सुद्धा नेता महायुतीच्या स्टेजवर दिसला नाही. एकंदर एकमेकांचा विरोध, ऍलर्जी आणि आजी-माजी आमदारांच्या घोषणांच्या जुगलबंदीत सभा संपन्न झाली.
प्रचंड विरोध असताना देखील विखे पाटलांनी लोखंडे यांना तिकीट आणले. मात्र, त्याचा रोष आज फार मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे. जेथे विखे तेथे आम्ही जाणार नाही अशी भुमिका रिपाईची तर जेथे गुंडागर्दी करणारी मानसे तेथे आमचा सपोर्ट नाही अशी डॉ. लहामटे यांची भुमिका. त्यामुळे, धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती लोखंडे यांची झाली आहे. मात्र, याचा तोटा विखेंना देखील सोसावा लागणार आहे. जर विखे व्यासपिठावर आले म्हणून रिपाईच्या नेत्यांनी तेथे जाणे पसंत केले नाही. त्यामुळे, हा तोटा अर्थात लोखंडे यांचा आहे. परंतु, याची झळ दक्षिणेत बसणार आहे. त्यामुळे, लोखंडे यांनी उमेदवार म्हणजे विखेंसाठी पणोती ठरु नये म्हणजे झाले.
इतकी नामुष्की ओढवली.!
सदाशिव लोखंडे यांच्या रथाचा सारथी ज्या व्यासपिठावर असेल तेथे मी येणार नाही अशी भुमिका आमदार डॉ. लहामटे यांनी घेतली होती. त्यावर उत्तम आणि रामबाण उपाय म्हणून तो नेता स्वत:च्या तालुक्यात आपल्या नेत्याची मोठी सभा असून सुद्धा व्यासपिठावर येऊ शकला नाही. तेथेच कोठेतरी आजुबाजूला थांबून सभा ऐकावी लागली आणि जेव्हा डॉ. लहामटे व्यासपिठाहून खाली आले व बाजुला गेले. तेव्हा अचानक यांचे दर्शन लोकांना घडले. तेव्हा मात्र, तो आला, तो आला अशी कुजबूज लोकांमध्ये ऐकायला मिळाली. त्यामुळे, आमदांनी दिलेली तंबी सार्थ ठरली असून त्याचे तंतोतंत पालन लोखंडे यांनी केल्याचे दिसते आहे. अन तसे झाले नाही. तर, आमदारांनी बी प्लॅन देखील तयार ठेवला असून त्याचा तोटा लोखंडे यांना झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, लोखंडे यांच्याकडून आज राजकीय शहाणपण पहायला मिळाले. अन्यथा काही काळात हॉल खाली झाल्याचे पहायला मिळाले असते.
तर मी लोखंडे यांना मदत करेल.!
गेल्या ४० वर्षात तालुक्याने इतका निधी आणि विकास कामे पाहिली नाही. तितकी कामे झाल्याचे दिसते आहे. मात्र, तोलार खिंड फोडणे असेल, शहापूर मार्गे मुंबई रस्ता असेल, एमआयडीसी असेल, बिताका सारखी धरणे असतील अशी मोठी कामे येणार्या काळात नितीन गडकरी यांच्याकडून करुन घेणे अपेक्षित आहे. जर, तालुक्यातील ही काम करण्यास मदत झाली. तर, मी लोखंडे यांना फुल सपोर्ट करेल अशी भुमिका डॉ. लहामटे यांनी मांडली. आता हे त्यांचे हे प्रांजळ मत असेल तरी गेली १० वर्षे लोखंडे खासदार होते. त्यांना अकोले तालुक्यातील ७० टक्क्यापेक्षा जास्त मतदार ओळखत नाही. त्यांनी आदिवासी भागात काहीच काम केले नाही. त्यामुळे, १० वर्षे मानसिकता नसणार्या व्यक्तीला आणखी पाच काय ५० वर्षे दिली तरी काहीच होणार नाही. अशा प्रतिक्रिया मतदारांनी दिल्या.
आजी-माजी आमदारांच्या घोषणांची जुगलबंदी.!
आज गेल्या कित्तके वर्षानंतर एक वेगळे चित्र तालुक्याला पहायला मिळाले. एकमेकांची जणू मुंगूसा-सापाची दुष्मणी असणारी मंडळी एकाच व्यासपिठावर पहायला मिळाली. कळत नकळत एकमेकांना चिमटे काढणे सहाजिक होते. मात्र, आजी-माजी आमदारांपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्याचे पहायला मिळाले. डॉ लहामटे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं.! ही घोषणा येते कोठे, नाहीतर वैभव भाऊ तुम आगे बडो.! हम तुम्हारे साथ हैं.! या दोन घोषणांनी हॉल दुमदुमून गेला होता. पत्रकार परिषदेत आवाज जाईना म्हणून कार्यकर्त्यांना शांत करण्याची वेळ आली. अर्थात अकोल्यात फक्त स्थानिक नेत्यांना भाव दिला जातो. त्यांचे दोन शब्द ऐकले जातात, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला जातो. त्यांना काळजात स्थान दिले जाते. अन्यथा बाहेरचे आले काय आणि गेले काय.! येथील मतदार आणि मतदान यात फारसा फरक पडत नाही. अन्यथा कारखाना ताब्यात द्या म्हणणार्या गडकरी साहेबांच्या शब्दाला नामोहरम होण्याची वेळ आली नसती.
रिपाईची ताठर भुमिका कायम.!
दादा भुसे यांनी रिपाईचे उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांच्याशी संपर्क केल्याची माहिती मिळाली. भुसे यांनी सदाशिव लोखंडे यांचा प्रचार करण्याची विनंती केली. मात्र, आमची लोखंडे आणि विखे या दोघांवर नाराजी असल्याचे स्पष्ट सांगितले. आमचे नेतृत्व रामदास आठवले यांना डावलल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कोणताही नेता व कार्यकर्ता युतीच्या स्टेजवर जायला तयार नाही. तुम्हाला जर रिपाईची मदत हवी असेल तर तुम्ही शिर्डीच्या जागेचा पुनर्विचार करावा अन्यथा रामदास आठवले यांच्याशीच चर्चा करावी असे विजय वाकचौरे म्हणाले. त्यामुळे रिपाई ही तिठर भुमिका शेवटपर्यंत घेते की मध्येच यांचे मनोमिलन होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमश: भाग 6