पुन्हा दुधाच्या टँकराला धडकून शिक्षकासह दोघे जागीच ठार.! याच आठवड्यात सात जणांचा मृत्यू.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यात पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. आज शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांचे आंदोलन मिटते कोठे नाहीतर आपले काम आटपून घराकडे निघालेल्या शिक्षकांचा आणि पिकअप चालकाचा संगमनेर शहरालगत असणार्या सायखिंडी फाट्यावर अपघात झाला. ही घटना सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी सायंकाळी घडली. यात अजय चंद्रभान नन्नवरे (वय ३६, रा. सायखिंडी, ता. संगमनेर) व विलास रविंद्र ठोंबरे (वय २३, रा. शिवलवाडी, ता. मंचर) अशी दोघे मयत झाली आहेत. या अपघातामुळे संगमनेर पुन्हा हदरले आहे. कारण, गेल्या दोन दिवसापुर्वी चिखलीच्या तिघा तरूणांचा अपघातात मृत्यू झाला होता. तर, त्यापुर्वी खराडी वाघापूर येथील एका पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, गेल्या आठवडाभरात सात जणांचा अपघाती मृत्यु झाला आहे. ही संख्या अधिक असू शकते मात्र कमी नाही. त्यामुळे, एकीकडे वाहतुकीचा बेशिस्तपना आणि बेजबाबदारपणे वाहणे चालविण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजय चंद्रभान नन्नवरे हे पुर्वी नाशिक तालुक्यातील कळवण येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी आत्ताच संगमनेर तालुक्यातील पिंपारणे येथे आपली बदली करुन घेतली होती. काल आंदोलन झाल्यानंतर आज नन्नवरे सर हे आपल्या शाळेवर आपल्या मित्रासोबत गेले होते. दोघेही शिक्षक असल्यामुळे एकाच गाडीवर गेले आणि शाळेचे काम आटोपल्यानंतर माघारी फिरले होते. मित्राला त्याच्या घराकडे सोडल्यानंतर नन्नवरे सर सायखिंडी येथे चालले होते. ते सायखिंडी फाट्यावर असताना नाशिक येथून एक दुधाचा छोटा टँकर पुण्याकडे चालला होता. वा वाहनाचा इतका वेग होता. की, त्याने डिव्हायडर (दुभाजक) तोडून विरुद्ध बाजुने चाललेल्या नन्नवरे सरांच्या गाडीला जोराची धडक दिली.
दरम्यान, काही कळण्याच्या आत किंवा सावध होण्यापुर्वीच एम.एच १४ एच यु ००५५ हा टँकर आला आणि नन्नवरे सरांचा जीव घेऊन गेला. हा अपघात इतका भयानक होता. की, संबंधित दुधाचा टँकर तीन ते चार पलट्या खावून थेट शेजारी दहा ते पंधरा फुट खोल असणार्या खड्ड्यात जाऊन पडला. यात टँकरचा चालक विलास रविंद्र ठोंबरे याचा देखील जागीच मृत्यू झाला. हा प्रकार तेथील काही व्यक्ती आणि प्रवासी यांना पाहिला असता एकाच पाळापळ झाली. उपस्थित व्यक्तींनी पळापळ केली. दोघांवर उपचार करण्यासाठी ऍम्ब्युलन्स देखील बोलविली. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. ठोंबरे यांच्या मृतदेहाची फारच वाईट स्थिती झाली होती. तर, नन्नवरे सरांना शहरातील एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. ही घटना तालुक्यात अगदी वार्यासारखी पसरली. अनेकांनी याबाबत फार खेद व्यक्त केला.
दरम्यान, संगमनेरात गेल्या आठ दिवसात सात जणांचा अपघाती मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. अगदी दोन दिवसांपुर्वी संगमनेर तालुक्यातील चिखली येथे राहणारे ऋषीकेश उमाजी हासे (वय २०), सुयोग बाळासाहेब हासे (वय २१), निलेश बाळासाहेब सिनारे (वय २६) या तिघांना प्रभात दुधाच्या टँकरे उडवून दिले होते. त्यात तिघे जागीच ठार झाले होते. तर, संदिप कोरे हा जखमी झाला होता. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील खराडी वाघापूर येथे राहणार पोलीस कर्मचारी गोरक्ष साहेबराव जाधव यांचा मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाला होता. त्यात ते मयत झाले होते. तर, आता अजय चंद्रभान नन्नवरे व विलास रविंद्र ठोंबरे यांचा अपघात होऊन दोघे जागीच ठार झाले आहेत. तर अन्य एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. एकंदर, मद्यपान करुन वाहणे चालविणे, स्टण्टबाजी करणे, बेजबाबदारपणे वाहणे चालविणे, सुसाट रस्ता पाहून अवाजवी वेगाने वाहणे चालविणे अशी अनेक कारणे अपघातास कारणीभूत आहेत. तर, सर्वात महत्वाचे म्हणजे संगमनेर ते नाशिक या महामार्गावर अशी काही ठिकाणे आहेत. जेथे अचानक मोठमोठी खड्डे असून अगदी भंपर देखील खाली टेकतात इतके ते खोल आहेत. परंतु मुर्दाड टोलनाके आणि गेंड्याच्या कातडीचे राजकारणी यांना मानसे मेली तरी चालतील. मात्र त्यांचे हाप्ते वेळीच पोहच झाले पाहिजे. असल्या मानसिकतेचे नेते एक दिवस तरी असल्या खड्ड्यात जातील असा तळतळाट सामान्य मानसांनी व्यक्त केला आहे.