अकोले तालुक्यातील तांभोळ येथे देखील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सत्तानाट्य
सार्वभौम (अकोले) :-
राज्यात शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असा सत्तासंघर्ष सुरू असताना अकोले तालुक्यातील तांभोळ येथे देखील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सत्तानाट्य पहायला मिळाले. सरपंच-उपसरपंच पदाच्या वाटाघाटी सुरू असताना ठरल्याप्रमाणे दोन वर्षानंतर राष्ट्रवादीच्या सरपंचाने राजिनामा दिला आणि दुसरा सरपंच निवडीच्या आत शिवसेनेच्या गटाने सदस्य गायब केले आणि थेट मतदानाला हजर केले. त्यामुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि जी गाडी गुवाहटी मार्गे थेट तांभोळमध्ये अवतरली त्या गाडीवर थेट दगडफेक झाली. गाडीवर हल्ला होताच गर्दी जमली आणि पुढे काही अनर्थ होण्याच्या आत तेथे उपस्थित असणार्या पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामुळे, तांभोळचे वातावरण चांगलेच तणावपुर्ण झाले होते. यावेळी ९ सदस्यांपैकी एक गैरहजर राहिला त्यामुळे, आठ समांतर सदस्य झाले. म्हणून एका लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढून मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर जयश्री माने ह्या सरपंचपदी विराजमान झाल्या...!!