अशोकराव भांगरे यांचा प्रवास विधानसभेकडे.! आता मुंबई दुर नाही, पवार कुटुंबाची उतराई.!


- सागर शिंदे

सार्वभौम विशेष :- 

              सन १९९० साली अशोकराव भांगरे यांच्या राजकीय कार्यकीर्दीला सुरूवात झाली. तेव्हापासून जर त्यांच्या पराभवाची कारणे पाहिली. तर, त्यांना आदिवासी पट्ट्यातून फार मोठा सपोर्ट झाला आहे. म्हणजे १९९५ साली तर अपक्ष आणि २००९ साली मनसेकडून लढले. तरी देखील २४ ते २६ हजार मतांची व्होटबँक त्यांची फिक्त दिसत होती. तर, आज देखील कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी आदिवासी पट्ट्यातून प्रचंड मतांचे लिड सहकार्‍यांना दिले आहे. यात सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा-जेव्हा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तेव्हा-तेव्हा त्यांना मुळा, आढळा आणि प्रवरा पट्ट्यातून कमी मते मिळली आहेत. का? तर, त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नव्हती, तालुक्यात जनतेशी व शेतकर्‍यांशी नाळ जुळण्यासाठी प्रभावी साधन नव्हते. त्यामुळे, आढळा आणि मुळा या भांगमध्ये तरी त्यांना फार सपोर्ट दिसला नाही. आज ते अगस्ति कारखान्यावर व्हा-चेअरमन झाले आहे. मुलगा जिल्हा बँक आणि पत्नी जिल्हा परिषदेवर. त्यामुळे, संपुर्ण कुटूंब जनतेशी एकनिष्ठ झाले आहे. विशेष करुन त्यांच्यावरील पक्षबदल आणि तडजोडीचे राजकारण हा शिक्का पुसला आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात त्यांची वाटचाल ही शंभर टक्के विधानसभेकडे असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

खरंतर, काल झालेल्या अगस्ति कारखान्याच्या निवडणुकीनंतर चेअरमन पदाहून जरा देखील वाद नव्हता. मात्र, व्हा.चेअरमन व्हायचे कोणी? हा महत्वाचा मुद्दा होता. एकंदर आदिवासी बांधवांचे देखील निवडणुकीत फार मोठे योगदान आहे. त्यामुळे, त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळावे ही अनेकांची ईच्छा होती, म्हणून भांगरे साहेबांचे नाव पुढे आहे. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांच्या रथाचे सारथ्य केले होते. त्यात त्यांनी कधी हातचा राखून काम केले नाही. म्हणून त्यांच्यावर असणारे अनेक आरोप त्याच दिवशी गंगेत वाहून गेले. कारण, अपराजित पिचड कुटूंबाला पराभूत करण्यात जनतेसोबत भांगरे साहेबांचा देखील सिंहाचा वाटा होता. मात्र, त्यानंतर भांगरे आणि डॉ. लहामटे यांच्यात एकवाक्यता राहिली नाही हे वारंवार दिसून आले. त्याचे उत्तम उदाहारण म्हणजे अकोले नगरपंचायतीची निवडणुक होय.!!

दरम्यान भांगरे कुटूंबाने शरद पवार साहेबांचा शब्द पाळला. त्याचे फलित म्हणून अमित भांगरे यांना जिल्हा बँकेत घेतले. त्यानंतर आता कारखान्यात अनेकांच्या नाराजी नाट्यावर पांघरुन घालुन भांगरे साहेबांना संधी देणारे पावर कुटूंबच आहे. त्यामुळे, २०१९ च्या विजयाचे हे गिफ्ट आहे. मात्र, आता हा विजयी रथ येथेच थांबणार नाही. तो विधानसभेकडे आगेकुच करणार आहे. कारण, भांगरे कुटूंबाला मुळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार यात मुळीच रस नाही. त्यांना १९५२ साली गोपाळराव भांगरे आणि त्यानंतर १९६२ आणि १९७२ ते ७९ पर्यंत यशवंतराव भांगरे यांचा इतिहास कायम करायचा आहे. त्यामुळे, स्थानिक पातळीवर त्यांनी कधी फार हस्तक्षेप केला नाही. परंतु, मानसाला माणूस जोडणे आणि एक-एक कार्यकर्ता उभा करणे ही त्यांची पद्धत त्यांचे राजकारण जिवंत ठेवून गेली आहे. आता विधानसभा गाठायची असेल तर त्यांना कारखाना हा फार महत्वाची भुमिका बजावणार आहे. त्यामुळे, त्यांचे व्हा-चेअरमन पद हे भांगरे कुटूंबाला थेट विधानसभेत नेवू शकते असे अनेकांना वाटते.

खरे पाहता स्व. यशवंतराव भांगरे साहेबांनी अकोल्याची तीन वेळा आमदारकी उपभोगली आहे. त्यांचा स्वभाव हा अगदी सामान्य होता. कोणाच्याही काळजाला सहज स्पर्श करील अशी वागणुक होती. त्यामुळे, १३ वर्षे ते आमदार राहिले. त्यानंतर अशोकराव भांगरे साहेबांनी विरोधकांना जोरदार टक्कर दिली. मात्र, यश आले नाही. त्यांना मतांचे विभाजन आणि पक्षबदलाचा नेहमी फटका बसत गेला. २०१९ मध्ये मात्र जेव्हा पिचड साहेब भाजपात गेले तेव्हा खर्‍या अर्थाने भाजपात असताना नव्हे.! पण राष्ट्रवादीत आल्यानंतर भांगरे कुटूंबाला आच्छे दिन आले. सर्वात पहिल्यांदा त्यांना जिल्हा बँकेत संचालक म्हणून बहुमान मिळाला, त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष म्हणून निवडी सुरू होत्या तेव्हा स्वत: भांगरे साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला आणि आता ते व्हा.चेअरमन देखील झाले. म्हणजे त्यांची उभी हयात जिल्हा परिषद अध्यक्ष वगळता प्रचंड संघर्षमय गेल्याचे पहायला मिळते. परंतु, जेव्हा आपण एक पाऊल मागे घेतो तेव्हा जी काही झेप घेतो ती नक्कीच यशदायी असते हे भांगरे कुटूंबाच्या बाबत पहायला मिळाले आहे.

खरंतर आता भांगरे साहेबांचा शेतकर्‍यांशी थेट संपर्क येणार आहे. येणार्‍या काळात ते जितके काम करतील तितका जनसंपर्क वाढेल आणि उद्या जेव्हा कधी विधानसभा निवडणुका लागतील तेव्हा जो काही पक्षाचा क्रायटेरीया ठरेल, त्यानुसार निर्णय होईल. २०१९ मध्ये जरा वेगळे वातावरण होते. डॉक्टर हे नवखे उमेदवार होते, साहेबांचा भाजपा प्रवेश जनतेने नाकारला होता. कारणे निमित्त तालुक्यात परिवर्तनाची लाट होती. त्यामुळे, विजय फार सुलभ झाला होता. उद्याची विधानसभा तशी मुळीच नसणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. कारण, आत्ता जे-जे लोक २०१९ साली थांबले होते. त्यातील ९० टक्के व्यक्तींना पश्‍चाताप झाल्याचे ते स्वत: व्यक्त होतात. तर, अजून निवडणुका तोंडावर आल्यानंतर नेमकी काय वातावरण तयार होते, कोणा-कोणाची युती होते, बडे-बडे नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे, वेट ऍण्ड वॉच या भुमिकेत फार काही दडले आहे. त्यात भांगरे कुटूंबाला आता ही नामी संधी असणार आहे. आदिवासी पट्ट्यातून त्यांनी लिड घेतले तर मुळा, आढळा आणि प्रवरा पिंजुन काढण्यासाठी फार काळ आहे. त्यामुळे, त्यांचे व्हा.चेअरमन होणे ही एका अर्थाने नांदी आहे. तर, उद्या जिल्हा परिषदेत भांगरे कुटूंबातून देखील अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे, एकदा का पडता काळ सुरू झाला की तो उजरत नाही आणि एकदा का विजय झाला तो थांबता थांबत नाही अशी म्हण आहे. ती भांगरे कुटूंबाला लागू होते. त्यामुळे, आता विधानसभा दूर मुळीच नाही.!!!